ओळख विन्डोज रेजिस्ट्रीची…

महत्वाची सुचना:

जरी तुम्हाला थोडेफार पूर्वज्ञान आणि माहिती असेल की तुम्ही नेमके काय करत आहात आणि त्यामुळे काय होईल, तरी रेजिस्ट्री सोबत काम करणे (खेळणे!) हे खुप धोकादायक असू शकते. रेजिस्ट्रीमध्ये चुकीचे बदल केल्याने तुमच्या विन्डोज संगणकामध्ये अनेक प्रकारचे तांत्रिक बिघाड येऊ शकतात, जे पुनःप्रस्थपित केल्याशिवाय व्यवस्थित होऊ शकत नाहीत. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की, जर तुम्हाला यासंबंधी योग्य व सखोल माहिती नसेल तर ह्या लेखामध्ये सांगितलेल्या गोष्टी तुमच्या विन्डोज संगणकावर करून पाहू नका. आणि जरी तुम्हाला याबद्दल थोडीफार माहिती असली तरीही तुम्ही नेमके काय करता आहात आणि ते केल्याने पुर्वीच्या तुलनेने काय बदल होऊ शकतात, याची योग्य माहिती हाताशी ठेऊन काळजीपूर्वक रेजिस्ट्री फाईल्स हाताळा.

या लेखामध्ये मी विन्डोज एक्स पी मधील रेजिस्ट्रीसह कसे काम करावे, ते सांगणार आहे. शिवाय यामध्ये योग्य जागी (आवश्यक असल्यास) चित्रासंह मार्गदर्शन केलेले आहे. ह्या लेखाद्वारे तुम्ही रेजिस्ट्री फाईल्स आयात व निर्यात कशा करू शकाल, रेजिस्ट्रीमधील मुळ व्हॅल्यूज कशा बदलू शकाल, नविन व्हॅल्यूज आणि कीज कशा जोडू शकाल, आणि शेवटी रेजिस्ट्री फाईल्स कशा लिहिल्या जातात, यांबद्दल तुम्हाला माहिती मिळेल.

रेजिस्ट्री एडिटर उघडणे:

या पायरीमध्ये रेजिस्ट्री एडिटर कसे उघडावे, ते आपण पाहू.
खालीलपैकी कोणत्याही एका पर्यायाने रेजिस्ट्री एडिटर उघडता येईल:
१) स्टार्ट मेन्यूमधील “Run” वर क्लिक करून काही क्षणांत “Run” विन्डो उघडेल. त्यात regedit असे टाईप करून “ओके” वर क्लिक करा.
२) Winkey (विन्डोज कळ) + R दाबूनही “Run” विन्डो उघडेल, त्यात regedit टाईप करून “ओके” क्लिक करा.
३) Ctrl + Shift + Esc किंवा Ctrl + Alt + del यांपकी एका कॉम्बिनेशनने “Task Manager” विन्डो उघडेल. त्यात फाईल ड्रॉपडाऊन मेन्यूमधून “New task” वर क्लिक करून उघडलेल्या नविन विन्डोमध्ये regedit टाईप करून “ओके” क्लिक करा.

रेजिस्ट्री एडिटरबद्दल माहिती:

वरील पायरीत ओके दाबल्यानंतर खालील चित्रात दिसत असल्यासारखी विन्डो उघडेल, यालाच रेजिस्ट्री एडिटर म्हणतात.
या एडिटर मध्ये तुम्हाला डाव्या बाजूच्या पॅनेलमध्ये HKEY_CLASSES_ROOT, HKEY_CURRENT_USER, HKEY_LOCAL_MACHINE, HKEY_USERS, and HKEY_CURRENT_CONFIG हे फोल्डर्स दिसत असतील, या मुख्य पाच फोल्डर्संना “hives” आणि त्यामधील सबफोल्डर्संना “keys” असे म्हणतात. खालील चित्रामध्ये मी HKEY_CURRENT_USER\Software\Microsoft या ठिकाणी आहे.

तर अशाप्रकारे तुम्ही रेजिस्ट्री एडिटर मध्ये कोठेही नॅव्हिगेट करू शकता.

रेजिस्ट्री कीज निर्यात करणे.

कोणत्याही किंवा सर्वच रेजिस्ट्री कीजमध्ये बदल करण्याअगोदर त्या निर्यात (एक्पोर्ट) करता येतात.

यामुळे तुम्ही केलेले बदल मुळ स्थितीत (पहिले होते तसे) आणायला एकदम सोपे जाते.

जी की (key) तुम्हाला निर्यात करायची असेल, त्यासाठी त्या “की”वर राईट क्लिक करून Export हा पर्याय निवडा.

वरीलप्रमाणे Export हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला जे लगेच लक्षात येईल, असे नाव देऊन इच्छित ठिकाणी सेव्ह करा. खालील चित्रामध्ये मी उदाहरणादाखल HKCU_Software_Microsoft हे एक्पोर्ट केलेल्या “की”ला नाव दिले आहे.

रेजिस्ट्री फाईल्स आयात करणे.

समजा तुम्ही एक्पोर्ट केलेल्या की मध्ये काही बदल केले आणि तुम्हाला ते पुसून पुर्वीसारखे करायचे आहे (म्हणजेच मुळस्थितीत आणायचे आहे), त्यासाठी तुम्ही निर्यात (एक्स्पोर्ट) केलेली रेजिस्ट्री की फाईल (या आधीच्या पायरीमध्ये पहा) आयात (इंपोर्ट) कशी करायची, हे देखील तुम्हाला माहीत असायला हवे.

जर तुम्ही त्या एक्पोर्ट केलेल्या की मध्ये काहीही बदल केलेले नसतील, तर त्या की फाईलवर डबल क्लिक केल्याने ती रेजिस्ट्रीमध्ये आपोआप मर्ज होते.

नाहीतर त्या रेजिस्ट्री की फाईलवर राईट-क्लिक करून Merge हा पर्याय निवडा.

अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या व्हॅल्यूज बदलणे.

आतापर्यंत तुम्हाला रेजिस्ट्रीमधील निरनिराळ्या कीज मध्ये कसे नॅव्हिगेशन करावे आणि त्यांच्यामध्ये काही बदल करण्याअगोदर त्या कशा बॅकअप घेतल्या जातात, हे तुम्ही शिकलात.

निश्चितच आता हे बदल नेमके कसे केले जातात, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल.

रेजिस्ट्री व्हॅल्यूज (व्हॅल्युज) मुख्यत्वे तीन प्रकारच्या असतात, ज्यांच्यासह तुम्ही यानंतर काम करणार आहात:
STRINGS, DWORDS, आणि BINARY व्हॅल्यूज…
इतरही अनेक व्हॅल्यूज आहेत, पण त्या सर्वांपैकी या तीन किंमतींसह तुम्ही अगदी ९९% काम करणार आहात.

* अगोदरच असलेली STRING व्हॅल्यू बदलण्यासाठी, तीच्यावर डबल क्लिक करा आणि Value data मध्ये तुम्हाला हवी असलेली व्हॅल्यू टाका.

* अगोदरच असलेली DWORD व्हॅल्यू बदलण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय असतात, हेक्जाडेसिमल (१६ अंकी) आणि डेसिमल (दशमान) पद्धत…
येथे मात्र लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्या पद्धतीचा वापर करून व्हॅल्यूज भरता आहात,
उदा. हेक्जाडेसिमल मधील २०० ही व्हॅल्यू डेसिमल पद्धतीमध्ये २५६ आहे, आणि डेसिमल मधील २०० साठी हेक्जाडेसिमल मधील c8 ही व्हॅल्यू आहे.

* बायनरी (द्विमान) व्हॅल्यूज बदलणं तसं जरा अवघड काम आहे, कारण त्या व्हॅल्यूज हेक्जाडेसिमल मध्ये लिहिलेल्या असतात. आवश्यक व्हॅल्यूज या दोन अंकी असतात आणि त्यांचा फॉर्मेट 00 01 02 0F FF असा काहीसा असतो आणि प्रत्येकीसोबत वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतात. खालील चित्रातून तुम्हाला ह्याबद्दल थोडीशी कल्पना येईलच.


01 ते 00 किंवा 00 ते 01 अशा किंमतींशिवाय इतर बायनरी व्हॅल्यूज बदलण्याची प्रक्रिया किंचितच वापरली जात असेल.

नविन व्हॅल्यूज जोडणे

जुन्या (अगोदरच अस्तित्वात) असलेल्या व्हॅल्यूज बदलण्यासारखीच ही प्रक्रिया आहे, फक्त येथे तुम्हाला त्या जोडलेल्या किंमतीला नाव द्यावे लागते.

रेजिस्ट्री एडिटर मधील तुमच्या उजव्या बाजूला दिसणार्‍या मोकळ्या जागेत राइट-क्लिक करून New > String Value किंवा तुम्हाला हवी असलेली व्हॅल्यू निवडा.

आणि त्यानंतर तुम्हाला हवे असलेले नाव टाका.

त्यानंतर तुम्ही त्यात तुम्हाला हवी असलेली व्हॅल्यू टाकू शकता, जे की आपण मागील एका पायरीमध्ये पाहिले आहे (अगोदर असलेल्या व्हॅल्यूज बदलणे.), या पायरीतील प्रक्रियेप्रमाणे तुम्हाला हवी असलेली नविन व्हॅल्यू टाका.

नविन कीज जोडणे

नविन व्हॅल्यूज जोडण्याबरोबरच, जर तुम्ही रेजिस्ट्रीद्वारे ग्रुप पॉलिसी व्हॅल्युज जोडण्यासाठी प्रयत्न करीत असाल, तर ही माहिती तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल.
तुम्हाला हव्या असलेल्या बहुतेक कीज बाय-डिफॉल्ट तेथे नसतात.

तर समजा तुम्हाला HKEY_CURRENT_USER\Software\Policies\Microsoft यामध्ये एक “की” जोडायची आहे, ती कशी जोडाल?

अगदी सोप्पं आहे, डाव्या बाजुला दिसणा‍र्‍या पॅनेलमधील फोल्डर ट्री मधील HKEY_CURRENT_USER\Software\Policies\Microsoft यावर राइट-क्लिक करून New > Key हा पर्याय निवडा.

आता तुम्हाला हवे असलेले नाव त्या “की”ला द्या.

व्हॅल्यूज आणि कीज उडवणे

सर्वात पहिले एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कीज किंवा व्हॅल्यूज उडवता, तेव्हा त्या कायमच्या उडवल्या जातात, कारण तेथे कोणत्याही प्रकारची रीसायकल बीन नसते, उडवलेल्या फाइल्स रीस्टोअर करण्यासाठी!! 😉

की किंवा व्हॅल्यू उडवण्यासाठी त्यांच्यावर राइट-क्लिक करून Delete हा पर्याय निवडावा.
अजुन एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखादी “की” डिलीट करता, त्यावेळी त्या “की”च्या सब-कीज सुद्धा उडवल्या जातात!

रेजिस्ट्री फाइल्स लिहिणे

आता आपण थेट .reg फाइल्स लिहिण्याच्या आणि उडविण्याच्या प्रक्रियेकडे वळतो आहोत.
या प्रक्रियेसाठी शक्यतो नोटपॅड किंवा वर्डपॅड वापरा, फाइल लिहिल्यानंतर किंवा त्यात बदल केल्यानंतर ती फक्त .reg या एक्स्टेन्शनने सेव्ह करा.

XP किंवा 2000 या स्वादांसाठी रेजिस्ट्री फाइलची सर्वांत पहिली ओळ खालीलप्रमाणे असते.

Windows Registry Editor Version 5.00

सुचना: विन्डोज 98, ME, NT 4.0 यांसाठी वरील ओळीच्या ऐवजी खालील ओळ लिहावी.

REGEDIT4

आता Windows Registry Editor Version 5.00 या ओळीच्या आणि खालील ओळीच्या मध्ये एक मोकळी ओळ (एन्टर दाबून) सोडावी.
खालील ओळीमध्ये तुम्हाला बदल करावयाची असलेली “की” डिक्लेअर करावी लागेल, त्यासाठी ती ब्रॅकेट्स मध्ये लिहावी.
जर तुम्ही टाकलेल्या ठिकाणी ती “की” अगोदरपासून अस्तित्वात नसेल, तर तेथे ती नविन “की” जोडली जाते.

[HKEY_CURRENT_USER\Key\Subkey]

खालील ओळ जर “String 1” अस्तित्वात नसेल तर “String 1” बरोबर “String 2” अशी स्ट्रिंग तयार करेल, किंवा “String 1″ कडील व्हॅल्यू ” Value 1″ साठी बदलली जाईल.

"String 1"="Value 1"

खालील ओळीतील “Default 1” ही एक स्ट्रिंग आहे आणि त्यासाठी तुम्ही “ऍट” चिन्ह वापरू शकता.

@="Default 1"

जर तुम्ही DWORD व्हॅल्यूज बदलू किंवा नविनतम जोडू इच्छित असाल, तर तुम्हाला त्या हेक्जाडेसिमल मध्ये कशा लिहिल्या जातात, हे माहित असायला पाहिजे.
खालील ओळ “Dword 1” ही DWORD व्हॅल्यू डेसिमल मधील २० एवढी करेल. (येथे डेसिमल २० म्हणजेच आपण dword:00000014 असे लिहिले आहे.); ह्म्म, पण जर “Dword 1” जर अगोदरपासूनच अस्तित्वात असेल, तर ती स्वतःची व्हॅल्यू डेसिमल मधील २० एवढी बदलून घेईल!
या ठिकाणी फक्त एवढंच लक्षात ठेवा, dword:00000009 म्हणजे डेसिमल मधील ९, dword:0000000a म्हणजे डेसिमल मधील १०,….., dword:0000000f म्हणजे डेसिमल मधील १५, dword:00000010 म्हणजे डेसिमल मधील १६,…. आणि क्रमशः…. अशाप्रकारे…!

"Dword 1"=dword:00000014

आता आपण बायनरी व्हॅल्यूज बद्दल पाहू. खालील ओळ, “Binary 1” ही बायनरी व्हॅल्यू, 01 AA 05 55 एवढी करेल.

"Binary 1"=hex:01,AA,05,55

तर आतापर्यंत आपण HKEY_CURRENT_USER\Key\Subkey या ठिकाणी, रेजिस्ट्री फाइलमध्ये स्ट्रिंग, डिफॉल्ट, ड्वॉर्ड आणि बायनरी व्हॅल्यू कशा जोडाव्यात, ते पाहिले, त्याचा एक ओव्हरव्ह्यू खालीलप्रमाणे:


Windows Registry Editor Version 5.00

[HKEY_CURRENT_USER\Key\Subkey]
“String 1″=”Value 1″
@=”Default 1”
“Dword 1″=dword:00000014
“Binary 1″=hex:01,AA,05,55

आता अशा रेजिस्ट्री फाइल्सच्या मदतीने व्हॅल्यूज किंवा कीज कशा उडवल्या जातात ते आपण पाहू.

जर तुम्हाला एखादी “की” उडवायची असेल, तर त्यापुढे (कीच्या सुरूवातीलाच) फक्त एक हायपेन/डॅश/मायनस (-) फाइलमध्ये लावावे.

[-HKEY_CURRENT_USER\Key\Subkey]

जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू उडवायची असेल (मग ती कोणत्याही प्रकारची असेल), तर त्यासाठी रेजिस्ट्री फाइलमध्ये त्या व्हॅल्यूला मायनस (-) ही व्हॅल्यू असाइन करावी.


"String 1"=-

@=-

“Dword 1″=-

“Binary 1″=-

आता उदाहरणासाठी जर तुम्हाला एका रेजिस्ट्री फाइलमधील, HKEY_CURRENT_USER\Key\Subkey1 या “की”मधील “Dword 1” या ड्वॉर्ड ची व्हॅल्यू डेसिमल मधील १ अशी करायची आहे आणि “String 1” ही व्हॅल्यू उडवायची आहे; तसेच, HKEY_CURRENT_USER\Key\Subkey2 ही “की” उडवायची आहे, खालील कोडींगवरून तुम्हाला ह्या गोष्टी आणखी चांगल्या प्रकारे समजू शकतील:


Windows Registry Editor Version 5.00

[HKEY_CURRENT_USER\Key\Subkey1]
“Dword 1″=dword:00000001
“String 1″=-

[-HKEY_CURRENT_USER\Key\Subkey2]

आता शेवटची गोष्ट, रेजिस्ट्री फाइलमध्ये कमेंट कशी द्यावी, जेणेकरून तुम्ही नंतर भविष्यात कधी ती फाइल पुन्हा एडिट कराल, तेव्हा तुम्हाला काय लिहिले आहे, ते कळायला पाहिजे ना!

कमेन्ट देण्यासाठी त्या ओळीच्या सुरूवातीला सेमीकोलन (;) द्यावा, ज्यामुळे ती ओळ रेजिस्ट्री फाइलमध्ये इग्नोअर केली जाते, म्हणजेच एकप्रकारे कमेंटसारखीच काम करते.


Windows Registry Editor Version 5.00

[HKEY_CURRENT_USER\Key\Subkey1]
;This changes the dword to equal 1 (ही एक कमेंट आहे.)
“Dword 1″=dword:00000001
;This deletes the string value (ही सुद्धा एक कमेंट आहे.)
“String 1″=-

;This deletes the key Subkey2 (आणि ही सुद्धा!)
[-HKEY_CURRENT_USER\Key\Subkey2]

धन्यवाद!

3 thoughts on “ओळख विन्डोज रेजिस्ट्रीची…”

 1. एक सांगू का दादा….
  तुम्ही registry ची पूर्ण माहिती का देत नाही? म्हणजे माझ्यासारख्या लोकांना जरा निट समजेल.. मी का सांगतोय तुम्ही लेखाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. कि तुम्हाला माहित नसेल करू नका…
  माफ करा मी तुम्हाला सुचना देत आहे..

 2. “रेजिस्ट्रीमध्ये चुकीचे बदल केल्याने तुमच्या विन्डोज संगणकामध्ये अनेक प्रकारचे तांत्रिक बिघाड येऊ शकतात, जे पुनःप्रस्थपित केल्याशिवाय व्यवस्थित होऊ शकत नाहीत.”

  यासाठी एक सोप्पा उपाय आहे. रेजिस्ट्रीमध्ये कोणताही बदल करण्या-आधी आत्ताची रेजिस्ट्री बॅक-अप करुन ठेवावी. म्हणजे, चुकून काही गडबड झालीच तर आपल्याला आधीच्या सगळ्या व्हॅल्युज परत आणता येतील.

  जिथे बदल करणार आहोत ती ’रेजिस्ट्री की’ उजवीकडच्या ट्रि-व्ह्यु मधुन सिलेक्ट करावी. File मेनु मध्ये जाऊन Export सिलेक्ट करावे. आपल्याला पाहिजे त्या नावाने हि रेजिस्ट्री जपुन ठेवावी. गडबडीच्या काळात याच लेखात दिलेली पद्धत वापरुन आधीच्या व्हॅल्युज परत मिळवीता येतील.

 3. चैतन्य,

  एका दृष्टीने तुझं म्हणणं योग्य आहे, “हे करू नका” ही सुचना मी मुद्दामहून यासाठीच दिली आहे की, काहींना माहिती न वाचताच चित्रात जसं सांगितलंय तसं लगेच करून पाहायची सवय आहे. जर योग्य माहिती नसेल, तर त्याच्या संगणक प्रणालीच्या नियमित स्वभावामध्ये अनिष्ट बदल घडू शकतात, व त्यामुळे एखादेवेळी प्रणाली फॉर्मॅट करण्याची गरज सुद्धा पडू शकते. त्यामुळे ही सुचना आधीच देणे मला गरजेचे वाटले.

  हा लेख विन्डोजमधील रेजिस्ट्रीबद्दलची योग्यप्रकारे ओळख व्हावी यासाठी मी लिहिलेला आहे. तुझ्या विन्डोज असलेल्या संगणकावर तुला थेट न दिसणारे किंवा उपलब्ध नसणारे बदल तुला रेजिस्ट्रीद्वारे करता येतात, त्यासाठी तुला या महाजालावर अनेक उदाहरणे सापडतील, जसे की स्टार्ट मेन्यूवरील “Start” हे अक्षर बदलणे, किंवा तुझ्या “My Computer” च्या विन्डोमध्ये दिसणारे निरर्थक “My shared documents” चे आयकॉन्स उडवणे, किंवा तुझ्या डेस्कटॉपवर दिसणार्‍या “recycle bin” ला रीनेम करून त्याजागी तुला हवे असलेले नाव टाकणे जसे की trash, bin इत्यादी, प्रकार तुला सहजासहजी करता येत नाहीत, पण रेजिस्ट्री एडिट करून मात्र तुला यासाठी ऍक्सेस मिळतो.

  पण हे सर्व करण्याआधी रेजिस्ट्रीची तोंडओळख तरी असावी, यासाठी हा लेख प्रत्येकाने वाचणे गरजेचे आहे, मी जसे सांगितले आहे, अगदी तसेच जर तुसुद्धा करून बघितलेस तरी चालेल, तुझ्या संगणकाला कसलीही हानी पोहोचणार नाही, जर कुठे चुक झालीच, तर बॅक-अप साठीसुद्धा मी या लेखात माहिती नमूद केलेली आहे!

  आणखी काही अडचणी, शंका?

  धन्यवाद!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत