एस.एम.एस इलो रे इलो sss

पहाटे दहाच्या सुमारास ‘अमोल’ ची झोप उडाली. अमोल अर्थात ‘अमल्या’ ची सकाळ अकरा ते साडे अकरा दरम्यान सुरु होत असे. तो पहाटे नऊचा अलार्म लावून नेहमीच्या सवयी नुसार रात्री दीड दोनच्या सुमारास tv सुरु ठेवूनच झोपी जात असे. उठल्या उठल्या त्याने मोबाईल हाती घेतला व लगेच पेड एस.एम.एस सेर्विस कडून मिळवलेल्या वेगवेगळ्या विषयावरील एक हझार रेडीमेड मेसेज पैकी निवडून पाच सहा मेसेज.. गुड मोर्निंग इत्यादी, पाच सहा मित्रांना पाठविले.दिवसाची सुरुवात झाली होती.तेवढ्यात घर गड्याने बेड टी आणला, चहाचा घोट घेता घेता त्याने मोबाईल वरील इनकमिंग मेसेज वाचण्यास सुरुवात केली.काही मेसेज लगेच स्वतः च्या नावानी इतरांना फोरवर्ड केले.काही डिलीट केले.गड्याने आणलेला फालतू बेचव नाश्ता त्याने अर्धावट खाल्ला व मोबाईलवर खास व्यक्तीशी बोलणे – chatting फ्लीर्तिंग चालू ठेवले. मोबाईल, एस.एम.एस हे अमोलच्या जीवनाचे अविभाज्य घटक झाले होते. ‘भरभरून ‘ एस.एम.एस पाठविण्यात त्याचा कोणी हात धरू शकत नव्हते.त्याची बोटे मोबाईल बटनावर अतिशय सफाईने व स्पीडने चालत. पाहता पाहता  एस.एम.एस type होऊन ‘सेंड’ होत असे.

बेड टी ब्रेंक्फास्त घेतल्यावर त्याने बेसिन समोर आरशात बघून टूथ ब्रश दातावर घासणे सुरु केले न केले तोच मोबाईलची रिंग वाजली, तोंडातील फेस व ब्रश तसाच ठेवून त्याने मोबाईल कानाला लावला, समोरून बबन्या बोलत होता, “अमल्या अरे आहेस कुठे? अरे राजा कुल्कर्ण्याला म्हणजे त्याच्या बायकोला मुलगा झाला. आताच एस.एम.एस आला आहे.”

“काय, सांगतोस काय ?” अमोलच्या तोंडातून टूथ पेस्टच्या फेसाचे बबल उडाले, थोडा फेस हनुवटीवरून ओंघाळून पोटावर पडला. तो पुढे बोलला, ” मी आताच कुल्कर्ण्याला एस.एम.एस पाठवितो.”

ब्रश तोंडातच ठेवून त्याने एस.एम.एस टाईप केला, ” कौनग्रजूलेशनस, यु हाव गोत सन, हवू इज दी हेल्थ ऑफ द बोय ?”.  ब्रश तोंडात असल्यामुळे त्याने मोबाईल सर्चवर जाउन घाई गडबडीत आर. बी. कुलकर्णी ह्या नावावर प्रायरिती एस.एम.एस सेंड केला.

 

 

रामचंद्र व सीताकाकू कुलकर्णी हे दाम्पत्य, नातवाने दिलेल्या मोबाईलकडे कौतुकाने बघत होते, अचानक मोबाईल मधून एस.एम.एस आल्याची अलर्ट टोन वाजली. डोळ्यावरील चष्मा नीट पुसून दोघांनी आलेला एस.एम.एस वाचला, पुन्हा पुन्हा वाचला, मेसेज स्पष्ट होता… ” कौनग्रजूलेशनस, यु हाव गोत सन, हवू इज दी हेल्थ ऑफ द बोय ?”. रामचंद्रांना मुलगा झाल्याचा मेसेज होता व त्यात त्यांचे अभिनंदन केले होते. सीताकाकूनच्या कपाळावर आठ्या आल्या.त्यांनी ‘सत्तरी’ पार केलेल्या राम प्रभूंकडे संशयाने पहिले.रामचंद्र ओशाळले, नेमके त्याचवेळी दरवाज्यावरची बेल वाजली. काकूंनी दार उघडले, समोर बिल्डिंग मधील वाचमन उभा होता. त्याने त्यांच्या हातात पेढ्याची पुढी ठेवली व बोलला, ” सेकिंड फ्लोवर के उगन्तीस नंबर के फलेत मे रेह्नेवाली मेमसाब को लाडका हुवा इस्की मिठाई है.” वाचमन गेला. काकूंनी काही पुटपुटत दरवाजा बंद केला, धाडकन आवाज झाला व वादळापूर्वीची शांतता सुरु झाली.

शेवटी शांतता मोडून रामभाउच बोलले, ” अग कोण हा उपटसुंभ, हा काय एस.एम.एस मला पाठवतो आहे? मला तर काहीच उलगडा होत नाही.”

“कसा होणार? नेमका तुम्हालाच एस.एम.एस येतो आणि नेमका याच वेळी वाचमन पेढे आणतो, याचा अर्थ काय? हा निव्वळ योगायोग आहे काय?……..सीताकाकू एकदम कोपल्या. वीजच कडाडली.

“आग माझे वय काय? माझा अवतार बघ? तू सोडून कोणी माझ्याकडे ढुंकून तरी बघेल काय? आग माझ्या रामचंद्र नावाचा तरी आदर राख”….. ‘रामराजे’ वैतागून बोलले.

“त्या रामचंद्रचा काय दाखला देता. ते सतयुग होते. अहो अश्याप्रकारचा आळ आल्यावर त्यांनी ‘सीतेला’ अग्निदिव्य करावयास सांगितले होते.आता आळ संशय तुमच्यावर आहे. व  समोर एस.एम.एसचा पुरावा आहे.तुम्ही अग्निदिव्य कराल?”

“काय!! अग्निदिव्य आणि ते सुद्धा असल्या फालतू एस.एम.एस करिता!! अग अग्निदिव्य मी स्वतः कसे करणार? इति रामचंद्र.

“म्हणजे तुम्हाला काय म्हणावयाचे आहे”…. काकू.

” अग माझा प्रवास ‘तिरडी’ वरून स्मशानातील ‘सरणावर’ होणार व अग्नी देणारे दुसरेच असणार, मग मी स्वतः कसे अग्निदिव्य करणार.”

रामचंद्र कुल्कर्ण्याच्या तोंडचे हे उद्गार ऐकल्याबरोबर सीताकाकूंचा आवाज एकदम खालच्या पट्टीत आला. ” अहो तसं नव्हे. कोणीतरी हलकट मेल्याने चावटपणा करून तुम्हाला असला एस.एम.एस पाठविला आहे. आपल्या एक्कावन वर्षांच्या सुखी संसारात विष कालवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मेल्याचा सत्यानाश होवो. तुम्ही मनाला लावून घेऊ नका मला तुमच्याबद्दल खात्री आहे. मी चहा आणते.

 

 

सोसायती मधील श्री मेश्राम यांच्या घरी सर्व मंडळी चेहर्यावरील आनंद लपविण्याचा प्रयत्न करीत होती.व हळू हळू दबक्या आवाजात कुजबुज करीत होती.श्री मेश्राम यांच्या मोबाईलवर रात्री अडीच वाजता एस.एम.एस आला कि ‘नायजेरियात’ कुठल्यातरी लोटरीच्या मोबाईल न्म्बरांच्या लकी ड्राव मध्ये त्यांच्या मोबाईल नंबरावर एक लाख पन्नास हजार पौंड सोडत निघाली आहे, ह्या मोबाईल न्म्बरच्या मालकाचे ‘अभिनंदन’! लागोपाठ रात्री तीन वाजता पुन्हा मेसेज आला कि लोटरीची येत्या ‘सात दिवसात’ व पुढील लोटरीच्या  सोडतीच्या अगोदर वितरीत करणे आवश्यक आहे.अन्यथा हि रक्कम lapse होईल. पहाटे पाच वाजता तिसरा एस.एम.एस आला कि बक्षीसाची रक्कम मिळण्याकरिता आपले नाव कळवा व विजा फी, प्रोसेसिंग फी व एयर ट्राव्हेल, हॉटेल स्टे ह्या सर्व खर्चाकरिता खाली लिहिलेल्या अकाउंट नंबर वर ताबडतोब रुपये पन्नास हजार ट्रान्स्फर करावे. लोटरीची रक्कम दीड लाख पौंड म्हणजे एक कोटी रुपये पेक्षा जास्त होती त्यामुळे समस्त मेश्राम कुटुंब-कबिला हुरळून-सुखावून गेले होते, व गुप्तता बाळगून होते.श्री मेश्राम सकाळी आठ वाजताच पन्नास हजारांची व्यवस्था करून कळविलेल्या अकाउंट नंबर वर ट्रान्स्फर करण्यास गेले होते. तेथून परत येताना त्यांनी चांगल्या लोकेशन मधील एक ब्रांड न्यू घर ‘एक रकमी’ विकत घेण्याकरिता हेरून ठेवले होते.मात्र नियतीने त्यांच्या पुढे काय ताट वाढून ठेवले आहे त्याबद्दल समस्त मेश्राम कुटुंब अनभिग्न्य होते. ते सर्व पुढील येणाऱ्या एस.एम.एसची आतुरतेने वाट पाहत होते.

 

तिकडे कोकणात आडवळणाऱ्या गावात रिकाम टेकडा बाबल्या मटका जुगारात व लोत्तो लोटरी लावलेल्या आकड्या बाबत त्याच्या तालुक्यातील मित्राकडून येणारा एस.एम.एस वाचून बोलला, “आयला बबन्या थोडक्यात चुकले आकडे, दोघांचे चाळीस चाळीस रुपये गेले.पुढची लोटरी नक्की लागेल.

मोबाईल एस.एम.एस चे फॅड, हि नवीन जगरहाटी चालूच राहणार…..बाबल्या सारखे लोटरीबहाद्दर एस.एम.एस इलो रे इलो sss हि हाळी देताच राहणार.

दिनकर बाविस्कर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *