तंत्रज्ञान आणि आपली मुले

फार मोठे कष्ट करून किंवा नशिबाचा मोठाच जुगार जिंकून एखादा परमेश्वरी वर मिळावा आणि प्रत्यक्ष वर अनुभवायला सुरवात केल्यावर हा वरदान की शाप असा प्रश्न पडावा – या अर्थाच्या अनेक गोष्टी आपण लहानपणी ( आणि कदाचित मोठेपणीही ) ऐकल्याच असतील. लहान मुले आणि त्यांच्या कुटुंबांबरोबर काम करताना मला अनेकदा हीच गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकायला मिळते आहे की काय असे वाटते.

 

इंटरनेट आणि संपर्क करण्याचे तंत्रज्ञान आपल्या सर्वांच्या घरात पोहोचून आता अनेक वर्षे झाली. घरात संगणक असण्याचे कौतुक आता शहरात तर मुळीच राहिले नाहीये. आज आई – बाप म्हणून वावरणारी पिढी शाळा – कॉलेज मध्ये असतांनाच भारतात इंटरनेट चा प्रसार व्हायला लागला होता.  त्यांचे शिक्षण संपून नोकरी लागेपर्यंत मध्यम वर्गाच्या हातात मोबाईल आले. आणि गेल्या पाच सात  वर्षात टच-स्क्रीन व इंटरनेट असलेल्या मोबाईल फोन चा प्रवेश आपल्या सर्वांच्या खिशात झाला आहे. पाश्चात्य देशातून तंत्रज्ञान भारतात यायला अनेक वर्ष लागायची , इंटरनेट आणि मोबाईल यांच्याशी संबंधित तंत्रज्ञान आता लगेचच आपल्यालाही भारतात उपलब्ध होते. अमेरिकेत किंवा युरोप मध्ये आलेली नवीन प्रणाली , संकल्पना तत्काळ आपल्याला वापरायला मिळते आणि तेही जवळजवळ फुकट अशी आता परिस्थिती आहे.

 

आपल्या दिवसेंदिवस लहान व संपन्न होत जाणाऱ्या कुटुंबात हे तंत्रज्ञान “स्मार्ट फोन ” म्हणून आलय  आणि त्याने चांगलेच बस्तान मांडलय . “आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक ” वगैरे शब्दांमध्ये वर्णन करता येईल एवढे महत्वाचे स्थान आपण या वस्तूला आता देऊ केले आहे. बाल मानसोपचार या विषयात काम करतांना स्मार्ट फोन नावाची अवदसा काय धमाल करतीये याचा रोजच अनुभव येतो. नेहमी दिसणारे प्रश्न आणि त्यांचे काही उपाय मी आपल्यासमोर मांडू इच्छितो.

 

बाळ वस्तू हातात पकडायला लागल की त्याच्या हातात फोन दिला जातो. हाताचा वापर करण्याची अक्कल यायच्या आतच गाणे ऐकणे आणि व्हिडिओ पाहणे या निमित्ताने बाळाची या वास्तूशी ओळख झालेली असतेच. ही वस्तू हातात पकडून आईबाप आपल्याकडे बघतात ( फोटो काढतात ) आणि नंतर याच वस्तूकडे बघून आनंदाने चित्कारतात याचा अनुभव बाळ जन्माला आल्यापासून घेते. येथेच त्याची नाळ या फोनबरोबर जुळते. आपण ही वस्तू हातात घेतली आणि खेळायला सुरवात केली की आईबाप आणि आजी आजोबा मंडळींच्या डोळ्यातून ( आणि शब्दातूनही ) कौतुक उतू जाते हा बहुतेक आता बालपणाचा प्राथमिक अनुभव झाला असेल. अर्थात आपला लंगोट कुठे आहे आणि त्याचा काय उपयोग असतो हे समजायच्या आत खिशातून मोबाईल कसा पळवायचा आणि त्याचे काय करायचे हे बाळ शिकते.

 

पुढचा टप्पा येतो जेवणाचा. अजूनतरी स्तनपान या पवित्र कृत्यात मोबईल शिरला नसेल अशी अपेक्षा होती  पण बाळाला पाजतांना स्टेटस अपडेट करणाऱ्या आया दिसायला लागल्या आहेतच. वरचे खाण्याची वेळ येते तेव्हा फोनची खरी कमाल दिसायला लागते. बाळाचे प्रत्येक जेवण हा चौरस आहारच असला पाहिजे या अंधश्राद्धेनुसार “जेवणासाठी वाट्टेल ते ” या निश्चयाने आया – आज्या – मावश्या रोज अनेकदा युद्धाला उतरतात. आणि त्यांचे सर्वात महत्वाचे शस्त्र असते फोन !  बाळाचे जेवण हे नर्सरी ऱ्हांइम नावाच्या गोष्टीच्या तालावर सुरु होते आणि आई बापच  काय आजी आजोबांचा उच्चार लय सुद्धा अमेरिकन व्हायला लागतो. आईच्या चेहऱ्याकडे बधून हावभाव वाचत, मातृभाषेतील बडबडगीते ऐकत, काऊ चिऊ च्या साक्षीने होणारे जेवण “कार्टून ” च्या संस्कारात सुरु होते आणि चालू राहते. डोळे आणि तोंड विस्फारुन फोन कडे बघणारे बाळ आणि त्याच्या तोंडात जात राहणारा चमचा हे  आता घराघरात दिसणारे दृश्य आहे.

 

यापुढच्या टप्प्यात,  बाळाचे मुल होण्याच्या आतच , समोर उभा राहणारा फोन हातात जातो आणि बाळ- मुल “गेम्स ” खेळायला सुरवात करते. आपले मुल किती सहजतेने हे तंत्रज्ञान वापरते आहे याचे कौतुक पुन्हा एकदा उतू जाते. कोणत्याही प्रकारची भीती किंवा काळजी नसेल तर आपण किती सहजतेने व वेगाने शिकू शकतो याचे प्रात्यक्षिक हे मुल सर्वांना देते. पण आपण ज्या वस्तूला जपून हात लावतो ती वस्तू लीलया वापरणारे मुल हे फारच बुद्धिमान असले पाहिजे अशा गैर समाजामध्ये सारे घर लोळण घेते. काही महिन्यांच्या मुलाला सहज वापरता येईल आणि स्वतःहून शिकता येईल अशी वस्तू बनविणाऱ्या तंत्रज्ञाचे कौतुक वाटण्यापेक्षा ते वापरणाऱ्या आपल्या मुलाचे कौतुकच चालू राहते. म्हणजे दारू बनवून, ती विकून पैसा मिळविणाऱ्यापेक्षा ती पिउन बेभान होणारा जास्त बुद्धिमान !

 

या फोनच्या संगतीतच मोठे होणारे मुल सहज ओळखू येते –

# स्क्रीन असलेल्याच वस्तू या मुलाला हव्याश्या वाटतात

# असल्या वस्तूंशिवाय पाच मिनिटे काही करणे त्यांना शक्य नसते. प्रवासात खिडकीबाहेर बघणे वगैरे गोष्टी त्यांना कंटाळवाण्या वाटतात.

# सार्वजनिक आणि कौटुंबिक समारंभात ही मुले फोन घेऊन त्यातच रममाण झालेली दिसतात. त्यांच्या हातातला फोन काढून घेतल्याशिवाय त्यांच्याशी बोलता येत नाही आणि संभाषण संपायच्या आताच त्यांचे डोके परत फोनमध्ये गेलेले असते

# फोन लॉक करून ठेवणे यावर त्यांचे पालकांशी वाद होतात

#  अभ्यास करतांना व झोपतांनाही फोन हाताशी लागतो

 

ही लक्षणे दिसायला लागली की आपले मुल हे फोन – व्यसनी झाले आहे असे समजावे.

 

वय वर्ष पाचच्या आत अती वापर करणारी मुले हस्ताक्षर , वाचन , संभाषण व शारीरिक वाढ यात मागे पडायला लागतात हे आता जगभर दिसायला लागले आहे. यापासून मुलांना वाचविण्याची गरज आहे यावर सर्व शास्त्रज्ञांचे जवळ जवळ एकमत आहे.

 

अशी परिस्थिती आपल्या कुटुंबात येऊ नये म्हणून काही प्रतिबंधात्मक उपाय शक्य आहेत। –

# मुल २-३ वर्षाचे होईपर्यंत हातात फोन देऊ नये. फोनवर गेम खेळून कोणताही बुद्धीविकास होत नाही. असल्या थापा मारणारे मात्र तुमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन पैसे व  वैयक्तिक माहिती गोल करत असतात

# जेवणासाठी फोनचा वापर करू नये. त्यामुळे मुले चव , स्वाद न बघताच खायची सवय लावून घेतात. लाखो वर्षे माणसे एकमेकांशी बोलत आंनदाने जेवत आली आहेत याचे भान सोडू नये

# मुलांना “बेबिसिटर” म्हणून फोन वापरू नये. त्यांचा स्वतःचा फोन हा वय वर्षे १३-१४ पर्यंत देणे टाळावे.

अनेक पालकांना या सूचना कदाचित भयंकर व जाचक वाटतील. त्यानी कदाचित हे स्वतंत्र मुलांना आधीच देऊनही टाकले असेल. ज्या वस्तूमुळे मुलाचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे अशी वस्तू जबाबदारीने वापरण्याइतकी  आपल्या बाळाची बौद्धिक व भावनिक वाढ झाली आहे का याचा पालकांनी शांतपणे विचार करायची वेळ आली आहे .

बहुसंख्य मुलांना हे मायाजाल सांभाळणे अशक्यच असते. वयात आलेली मुले तर अजूनच जास्त अवघड आणि जीवघेणे प्रश्न उभे करतात ( त्यावर वेगळा लेख लिहावा लागेल). आई बापांनी नियमांची व्यवस्थित चौकट आखून देणे आणि ती  कटाक्षाने पाळायला मुलांना मदत करणे हे पालकांचे कामच आहे. पालकत्वाचा अधिकार योग्यपणे न वापरल्यास पालकत्वच संकुचित होते. हे आपल्याला तंत्रज्ञानाने दिलेले आव्हान आहे. हे शिवधनुष्य आपल्याला पेलावेच लागेल , आपल्या मुलांसाठी आणि स्वतःसाठीही.

 

डॉ भूषण शुक्ल

बाल मानसोपचार तज्ञ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *