प्रोजेक्ट ब्रेन – मेड इन इंडिया

आऊटसोर्सिंग म्हणलं की फ़क्त आय़टी आणि सॉफ़्ट्वेयर एवढ्यापुरतंच मर्यादित असेल असा सर्वसामान्य समज असतो. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बुद्धीमत्तेची ओळख पटायला लागल्यानंतर आऊटसोर्सिंगची बरीच कवाडं आपल्याला खुली झाली आणि आता त्यात सिंहाचा वाटा इंजिनीयरींग आऊट्सोर्सिंगने मिळवला आहे. कुठल्याही मोठ्या इंजिनीयरींग जॉबचं बेसिक डिझाईन ’मेड इन इंडिया’ असण्यापासून ते थेट आपले इंजिनीयर्स काही महिन्यांसाठी ऑन साईट बोलावुन एक्झिक्युशन करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा ह्यात समावेश होतो. अश्याच प्रकारचं काम करणार्या एका पुण्यातल्या ’निलसॉफ़्ट’ नावाच्या कंपनीत मला ओवरसीज कामाचा बराच अनुभव मिळाला. त्यातल्याच एका प्रोजेक्टविषयी थोडी माहिती इथे शेयर करत आहे.

स्विडन… युरोपातल्या प्रमुख देशांपैकी एक. भौगोलिक परिस्थिती आणि हवामान ह्या कारणांनी लोकसंख्या प्रमुख शहरात एकवटल्यामुळे ट्राफ़ीकची समस्या सतत समोर आ वासुन उभी. त्यात युरोपीय मानसिकता म्हणजे प्रॉब्लेम पुरता सुरु होण्याआधीच उपाय योजना करायला सुरुवात. प्रोजेक्ट्स केले जातात तेही पुढच्या शंभर वर्षाच्या प्लानिंगने. स्विडनमध्ये भुमिगत रेल्वे, रस्ते आणि सर्विस टनेल्स अशी मिळून असंख्य टनेल्स आहेत. अगदी एकावर एक अशी काही मजलीसुद्धा. सुदैवाने चांगल्या प्रतिचा खडक सगळीकडेच आहे. आमच्या स्विडीश प्रोजेक्ट manager च्या मते Stockholm हे जमिनीखाली एखाद्या चीझ ब्लॉकप्रमाणे आहे. पोकळ नळ्यांची छिद्र असलेला चीझचा ठोकळा…!!

एकदा टनेल्स आली की त्यांचं बांधकाम आणि पुढे मेंटेनंन्स आलाच. इथे अजुन एक मोठी भेडसावणारी समस्या म्ह्णजे ह्या टनेल्समध्ये खडकातुन सतत झिरपणारं पाणी. आपल्या कात्रजच्या बोगद्यात वर्षानुवर्ष पाणी झिरपतय आणि त्या अंधार्या पाण्याच्या डबक्यातुन आपण प्रवास करतोच आहोत. पण स्विडनमध्ये ते झिरपलेलं पाणी उणे अंश थंडीमध्ये गोठतं आणि रस्त्यावर अतिशय घसरडा असा पट्टा निर्माण होतो. कार घसरुन एकमेकावर आदळून टनेल ब्लॉक झाल्याचे मोठे अपघात ह्या ठिकाणी झालेले आहेत. ह्या समस्येवर उपाय़ म्हणुन खडकात खोदून काढलेल्या टनेल्सला कॉंक्रीट लायनिंग करण्याचा प्रोजेक्ट आम्हाला मिळाला होता. स्विडनमधुन तीन आणि भारतातुन पंधरा इंजिनीयर्स अशी टीम ह्या प्रोजेक्टवर काम करत होती.

ह्या खडकातुन खोदलेल्या टनेलमध्ये जिथे खडक लुज झाला आहे किंवा होण्याची शक्यता आहे त्या-त्या तीनशे ठिकाणी anchor बोल्ट ठोकण्यात आले होते. लायनींगला खडकापासुन काही अंतरावर धरुन ठेवण्यासाठी आठ हजार बोल्ट्स लावायचे होते. लायनींग आणि खडकाच्या मधून झिरपलेलं पाणी वाहून जावं अश्या पद्धतीने हे लायनींग आधीच खोदून काढलेल्या खडकात कसे बसेल…? त्यासाठी हे बोल्ट्स कुठे लावता येतील…? नवीन बोल्ट्स आधीच लावलेल्या तीनशे anchor बोल्टसला clash होतील का…? हा सगळा अभ्यास साईटवर आयत्या वेळी न करता व्हर्च्युल मॉडेलवर आधीच करुन BIM टेक्नोलॉजीवर हे clashes आधीच सोडावायचं जटिल काम आमच्या कंपनीमध्ये झालं. आमच्या गृपमधल्या 3D एक्सपर्ट रघूला ह्याचं मॉडेल करण्याचं संपुर्ण  श्रेय जातं. स्विडनहून खोदकाम झालेल्या रॉक प्रोफ़ाईलचा संपुर्ण स्कन डाटा पॉईंट क्लाऊड स्वरुपात आम्हाला पाठवण्यात आला. तो AutoCAD, नेव्हिस वर्क्स आणि इतर 3D सॉफ़्टवेयरमधून BIM मॉडेल करत हळू-हळू एकेक clashes शोधण्यात आले. प्रत्येक दीड मीटरवर सेक्शन्स घेऊन जवळ-जवळ दोन किलोमीटर लांबीच्या टनेलचे डिटेल्ड drawings बनवण्यात आले. त्यात लायनींग आणि बोल्ट डिझाईनचं काम आमच्या स्ट्रक्चरल डिझाईन गृपकडून करण्यात आलं.

सगळ्यात कहर म्हणजे  ह्या टनेलमध्ये बसवले जाणारे आठ हजार बोल्ट्स रघूने 3D मॉडेलमध्ये टाकले. ह्यातुन नुसते clashing लोकेशन्स मिळाले नाहीत तर त्या सगळ्या बोल्ट्सचे दोन्ही टोकाचे ग्लोबल कॉंर्डिनेट्स मॉडेलमधून मिळाले. ह्यावर आमचा स्विडीश क्लायंट बेहद्द खुष झाला. त्याचं निम्मं काम झाल्यात जमा होतं. तिथे ऑटो-ऑपरेटेड ड्रिलींग मशिन्स असतात आणि ती वेब बेस्ड असल्याने क्लायंटने आम्हाला डायरेक्ट मशिनलाच ग्लोबल कॉंर्डिनेट्स टाकण्याची विनंती केली. म्हणजे विचार करा… “पुण्यात ऑफ़िसात बसून इंजिनीयर कॉंपुटरवर कॉंर्डिनेट् डाटा फ़िड करणार आणि त्याच वेळेस ते ड्रिलींग मशीन तिथे स्विडनमधल्या टनेलमध्ये ड्रिल करणार. ऑपरेटर फ़क्त सगळं सुरळीत चालू आहे ह्यासाठी मशिनमध्ये बसलेला असणार…!!”

आमच्यासाठीच नव्हे तर स्विडीश इंजिनीयर्ससाठी देखिल हा प्रोजेक्ट एक प्रयोग होता आणि सुदैवाने… सुदैवाने म्हणण्यापेक्षा सगळ्यांच्या कष्टाने तो यशस्वी झाला. तिथल्या युनिवर्सिटीमध्ये स्टडी केस म्हणून दाखल झाला. खालील लिंकवरुन त्याचा डिटेल व्हिडीओ बघता येईल. (https://www.youtube.com/watch?v=kbjEniKybc0 किंवा युट्यूबवर ‘Skanska NL11’ असे सर्च केल्यास ३ मिनीट ४४ सेकंदाचा ह्या प्रोजेक्टचा व्हिडीओ येतो. लेखाचा अंदाज येण्यासाठी तो जरुर बघा.)

परदेशात जाणार्या किंवा परदेशी प्रोजेक्ट्सवर काम करणार्या इंजिनीयर्सना एक कुत्सित प्रश्न नेहमी विचारला जातो. ”हेच knowledge जर तुम्ही भारतीय प्रोजेक्ट्सवर वापरलं तर देशाला त्याचा फ़ायदा होऊ शकेल.” पण ह्यावर एक मोठ्या व्यक्तीचा दाखला देता येईल. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये स्वा. सावरकर जरी इंग्रजांच्या प्रखर विरोध करत असले तरी भारतीय तरुणांना ब्रिटीश फ़ौजेमध्ये सामील होऊन युद्ध करण्याचा सल्ला ते नेहमी देत. ह्यामुळे भारतीय तरूणांना शस्त्रांची चांगली जाण मिळेल आणि भारतालाच त्याचा स्वातंत्र्यलढ्यासाठी उपयोग होईल ह्यासाठी. आऊटसोर्सिंगची कामं करणार्या भारतीय तरुणांना नेमका हाच फ़ायदा आहे. अश्या कामातुन येणारा अनुभव त्यांना भारताच्या बांधणीसाठी नक्की उपयोगी पडेल ह्यात शंका घेण्याचं कारण नाही. This is example of ‘Design Made in India… but this will definitely help to ’Make’ future of India.’

प्रणव जतकर

प्रोजेक्ट कोर्डीनेटर
वनस्टील रिइनफोर्सिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *