भारतीय उद्योगांची नीतिमत्ता, अर्थात, बिझनेस एथिक्स!

१९९७-९८ सालातली गोष्ट. जपानच्या इस्टर्न इंजिनिअरिंगच्या* डायरेक्टर नोबुआकी बरोबर गप्पा चालल्या

होत्या. इस्टर्न च्या भारतात तेव्हा एकूण १६ शाखा होत्या. जपानी कंपन्यांची मेडिकल उपकरणे ते विकत.

दर ३ महिन्यांनी नोबू भारतात यायचा. या सोळा शाखांच्या प्रमुख टीम बरोबर मिटींग्ज घ्यायचा.

“तुला सांगू शिरीष?”, नोबू सांगत होता, “मला या भारतीय लोकांचा एक मजेशीर अनुभव आहे. मी जेव्हा

विचारतो की कसा आहे बिझनेस, तेव्हा सगळे म्हणतात, ‘उत्तम’!…एनी प्रोब्लेम?.. ‘नो प्रोब्लेम’! आणि याच

उत्तरांनी माझी काळजी जास्त वाढते….!”

भारतीय उद्योगांबाबत हा आणि असे अनुभव अनेकदा आणि अनेक परकीय कंपन्यांना येतात. नोबूचा

अनुभव दोन गोष्टींवर भाष्य करतो. एक, उद्योगांची पारदर्शकता. आणि दोन, त्यातून जाणवणारी

उद्योगांची विश्वासार्हता. परिस्थिती जशी आहे तशी सादर न करणे बहुतेक वेळी धोकादायक ठरू शकते.

हां, काही वेळा संपूर्ण चित्र स्पष्ट होईपर्यंत आणि अनुकूल परिणामांची खात्री असताना, दरम्यानचा काही

काळ, जशी आहे तशी, ‘तात्पुरती बिघडलेली’ परिस्थिती सादर करणे, ग्राहकाच्या मनात किंवा बाजारात

अकारण भीती निर्माण करू शकते. अशा वेळी ‘परसेप्शन’ सांभाळण्यासाठी थोडी ‘झाकपाक’ करावी लागत

असेल तर ठीक. पण बहुतेकदा, समोरच्याला विश्वासात घेऊन ही तात्पुरती पडझड देखील सांगून टाकणे

हेच जास्त फायद्याचे असते. कारण अनेकदा, ‘अनुकूल परिणामांची खात्री’ धोका देते आणि ही ‘थोडीशी

झाकपाकच’ गळ्याशी येते! उदा. आपल्या सर्वांचे लाडके, सत्यम चे जंटलमन, रामलिंगा राजू!

म्हणूनच, ‘मेक इन इंडिया’ राबवताना, ‘उद्योगांची नीतिमत्ता’, अर्थात, ‘बिझनेस एथिक्स’ हा पैलू आज

टेक्नोलॉजीच्या बरोबरीनेच हाताळावा लागतोय.

कायदा आणि अर्थव्यवस्था यांच्याबाबत कोणते मार्ग स्विकारले जातायत, उद्योजक त्यांच्या ग्राहकांबाबत,

कर्मचाऱ्यांबाबत आणि भागीदारांबाबत कितपत पारदर्शी व्यवहार करतायत, हे पैलू आता जास्त महत्वाचे

ठरतायत. यावर अनेक चर्चाही झडतायत. या चर्चांचा एक सूर, व्यावसायिक स्पर्धा, सरकारी नियम, कायदे

आणि कारभार यांना जबाबदार धरणारा, तर दुसरा, फक्त ‘नीतिमत्ता’ या संकल्पनेचे निकष लावत त्यात

गांधी, मंडेला, विवेकानंद यांना ओढत एकूणच अध्यात्मिक तत्वज्ञान सांगणारा!

पण मला असं वाटतं, की बिझनेस एथिक्सला ‘शास्त्र’ म्हणून समजून घ्यायला हवं, ‘धर्म’, तत्व किंवा

कर्तव्य म्हणून नव्हे. कारण नीट पाहिलं, तर कुठलाही उद्योग व्यावसायिक यश, व्यावसायिक यशातील

सातत्य आणि व्यावसायिक पत, या तीन घटकांवरच चालतो. आणि याचं उद्दिष्ट कसं साधायचं याचे

नियम एथिक्स सांगतात.

उदाहरणार्थ, माझा ‍प्रोडक्ट विकल्यावर, वचन दिल्यानुसार, मी ग्राहकाला विक्रीपश्चात सेवा नीट दिली

नाही, तर माझा त्या सेवेचा खर्च वाचून मला जास्त फायदा मिळेल. पण तो ग्राहक माझ्याकडे परत येणे

टाळेल. म्हणजेच, एकदा मिळालेल्या यशाचं सातत्य मला राखता येणार नाही. तेव्हा, ‘ग्राहकाला देलेला शब्द

पाळावा’ हे तत्व न राहता, तो व्यावसायिक नीतिचा एक नियम बनतो.

अशा अनेक नियमांना समजून घेता घेताच , उद्योग-नीतिमत्ता एक शास्त्र म्हणून शिकता येईल.

किंबहुना, ‘सायन्स ऑफ बिझनेस एथिक्स’, अर्थात, ‘उद्योगांचे नीतिशास्त्र’ अशी संज्ञा रूढ व्हायलाही

हरकत नाही!

आणि हे घडायला लागेल, तेव्हाच ‘मेक इन इंडिया’ अगदी दूरपर्यंत राबवता येईल!

*नांव बदललेलं

शिरीष कुलकर्णी,
बी.ई (इलेक्ट्रोनिक्स) आणि इंडस्ट्रीअल कौन्सेलर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *