स्पेस रेस

जीवसृष्टीची निर्मिती  झाल्यापासून  माणसाला  अंतराळाविषयी  विलक्षण  कुतूहल  वाटत  आलेलं  आहे.  आकाशाकडे  बघितल्यावर  माणसाला  दर  वेळी  वेगळं  दृश्य  दिसत  असल्यामुळे  तो  कायमच  त्याकडे  काहीतरी  अद्भुत  बघितल्याच्या  भावनेनं  भारून  गेलेला  आहे.  कधी  निळंशार  आकाश  दिसावं  तर  कधी  पांढरफटक  आकाश  नजरेला  पडावं.  कधी  पावसाचे  काळे  ढग  दाटलेले  असावेत  तर  कधी  प्रखर  सूर्याकडे  बघणं  अशक्य  व्हावं.  रात्रीसुध्दा  किती  वैविध्यं  दिसावीत?  कधी  चांदण्यानं  भरलेलं  पांढरं  आकाश  दिसावं  तर  अमावस्येच्या  रात्री  चंद्र  नसल्यामुळे  एकदम  मोकळं  आकाश  दिसावं.  चंद्रसुध्दा  कधी  पूर्ण  तर  कधी  अर्धा.  कधी  त्याची  कोर  दिसावी  तर  कधी  तो  दिसूच  नये.  इतर  ग्रहतारेसुध्दा  चमचमताना  अगदी  दिमाखात  दिसावेत.  कित्येक  सहस्त्रकं  आकाशाविषयीची  ही  वैशिष्टयं  अचंबित  होऊन  बघण्यात  आणि  त्याविषयी  कविकल्पना  रचण्यातच  माणसानं  घालवली.  त्यानंतर  विज्ञानाचं  माणसाच्या  आयुष्यात  आगमन  झालं  आणि  आकाशामधल्या  या  चमत्कारांना  ठरावीक  नियमांमध्ये  बांधण्यासंबंधीच्या  संकल्पना  जन्मल्या.  इथून  पुढे  चमत्कार  घडत  गेले.  पृथ्वी  स्थिर  नसते  आणि  ती  फिरते;  इतकंच  नव्हे  तर  ती  सूर्याभोवती  फिरते  या  विधानामुळे  अनेक  शतकं  नुसता  गोंधळ  माजला.  तसंच  चंद्रसुध्दा  पृथ्वीभोवती  फिरतो  हेही  समजलं.  याखेरीज  इतर  सगळे  ग्रहताऱ्यांविषयी  विलक्षण  माहिती  मिळत  गेली.  दुर्बिणीचा  जन्म  झाल्यापासून  आणि  माणसानं  ती  आकाशाकडे  रोखल्यापासून  या  माहितीचा  स्फोट  झाला.  खगोलशास्त्र  या  अत्यंत  महत्त्वाच्या  शाखेचा  जन्म  झाला.

 

काही  शतकं  आकाशाकडे  बघून  अवकाशाविषयीची  माहिती  गोळा  करण्यावर  माणसाचा  भर  होता.  त्यानंतर  मात्र  अचानकपणे  अवकाशाकडे  बघण्याची  माणसाची  दृष्टी  पार  बदलली.  नुसतं  पृथ्वीवर  बसून  अवकाशाचं  निरीक्षण  करण्यापेक्षा  चक्क  अवकाशातच  एखादी  चक्कर  मारता  आली  तर;  या  विचारानं  काही  लोकांना  पार  भारून  टाकलं.  याला  विमानाचा  शोधसुध्दा  कारणीभूत  ठरला.  जमिनीवरून  जाणाऱ्या  वाहनांबरोबरच  हवेत  उडू  शकणाऱ्या  वाहनांमुळे  हे  घडलं.  जर  विमान  जमिनीपासून  थोडया  उंचीपर्यंत  जाऊ  शकत  असेल  तर  ते  आणखी  बरंच  वर  जाऊ  शकेल  आणि  थेट  अंतराळात  घुसू  शकेल  का  या  भन्नाट  विचारामुळे  हे  लोक  पार  वेडेच  झाले.  याला  युध्दांचीही  मदत  झाली.  कारण  युध्दकाळात  शत्रूच्या  ठिकाणांवर  बॉम्बहल्ले  करण्यासाठी  विमानांबरोबरच  रॉकेट्सही  बनवण्यात  आली.  विलक्षण  वेगानं  दूरपर्यंत  जाऊ  शकणारं  असंच  एखादं  रॉकेट  थेट  अंतराळापर्यंत  गेलं  तर  काय  बहार  येईल  ही  कल्पनाच  थरारक  होती.  अर्थातच  यासाठी  अनेक  प्रश्न  सोडवणं  भाग  होतं.  मुळात  अवकाश‘  नक्की  कुठे  असतं,  तिथे  जाण्यासाठी  नक्की  कशा  प्रकारचं  रॉकेट  लागेल,  त्यामध्ये  कुठलं  इंधन  वापरावं  लागेल,  तिथली  परिस्थिती  नक्की  कशी  असेल,  तिथे  माणसाला  जाणं  शक्य  होईल  का  अशा  असंख्य  प्रश्नांची  उत्तरं  मिळवण्यासाठीची  धडपड  सुरू  झाली.  या  धडपडीचा  सगळयात  चित्तथरारक  आणि  अभूतपूर्व  काळ  दुसऱ्या  महायुध्दानंतरच्या  सुमाराचा  होता.

 

अमेरिका  आणि  सोव्हिएत  युनियन  इथे  1957  ते  1969  या  बारा  वर्षांच्या  काळात  अंतराळावर  आपलं  वर्चस्व  निर्माण  करण्याच्या  संदर्भात  घडलेल्या  अत्यंत  रोमहर्षक  घडामोडींना  ढोबळमानानं  अंतराळशर्यत‘  (Space Race) असं  म्हटलं  जातं.  1957  सालच्या  ऑक्टोबर  महिन्यात  सोव्हिएत  युनियननं  अंतराळात  सोडलेल्या  स्पुटनिक‘  या  उपग्रहापासून  सुरू  झालेलं  हे  युध्द  1969  सालच्या  अमेरिकेच्या  अपोलो  11′  उपग्रहानं  चंद्रावर  उतरण्याच्या  वेळी  संपलं.  दुसऱ्या  महायुध्दानंतर  अमेरिका  आणि  सोव्हिएत  युनियन  यांच्यामध्ये  सुरू  झालेल्या  शीतयुध्दाचाच  हा  एक  भाग  होता.  या  अंतराळयुध्दामधल्या  तांत्रिक,  राजकीय,  सामाजिक  आणि  वैयक्तिक  घडामोडींचं  वर्णन  अत्यंत  चित्तथरारक  आहे  आणि  जागतिक  इतिहास  समजून  घेण्याच्या  दृष्टीनंसुध्दा  ते  खूप  महत्त्वाचं  आहे.

 

या  अंतराळशर्यतीचे  अनेक  हीरो‘  असले  तरी  त्यामधल्या  दोघांचा  आपल्याला  खास  उल्लेख  केलाच  पाहिजे.

 

जर्मनीत  जन्मलेला,  नाझी  राजवटीमध्ये  नाइलाजानं  हिटलरसमोर  शरणागती  पत्करून  ब्रिटिशांवर  बॉम्ब  टाकण्यासाठी  रॉकेट  तयार  करण्याचं  काम  करणारा  व्हर्नर  फॉन  ब्राऊन  हा  त्यामधला  पहिला  नायक  होता.  लहानपणापासून  रॉकेट  तयार  करण्यासाठी  धडपडणारा  आणि  अंतराळात  माणसाला  कधीतरी  पाठवण्याची  दुर्दम्य  आशा  बाळगणारा  फॉन  ब्राऊन  अत्यंत  हुशार  तर  होताच;  पण  कुठल्या  परिस्थितीत  कसं  वागायचं  याची  त्याला  चांगलीच  जाण  होती.  म्हणूनच  दुसऱ्या  महायुध्दात  जर्मनीचा  पाडाव  होत  असताना  अमेरिकेला  शरण  जाण्याचा  शहाणपणा  त्यानं  दाखवला.  विलक्षण  धोका  पत्करून  आपला  आणि  आपल्या  सहकाऱ्यांचा  जीव  वाचवत  आणि  रॉकेटसंबंधीची  गुप्त  कागदपत्रं  कशीबशी  सुरक्षित  ठेवत  फॉन  ब्राऊननं  अमेरिकेमध्ये  आपलं  बस्तान  बसवलं.  हा  प्रवासही  काही  सोपा  नव्हता.  अमेरिकेमध्ये  गेल्यावरसुध्दा  नाझी  जर्मनीमध्ये  क्रूर नरसंहाराला  काही  प्रमाणात  कारणीभूत  ठरल्याचा  आरोप  त्याच्यावर  ठेवण्यात  आला.  तसंच  त्याच्या  अंतराळभरारीच्या  स्वप्नांना  वारंवार  कात्री  लावण्यात  आली.  एखादा  माणूस  अशा  परिस्थितीत  पार  खचून  गेला  असता;  पण  फॉन  ब्राऊन  हे  रसायनच  काही  वेगळं  होतं.  सगळया  प्रतिकूल  परिस्थितीचा  सामना  करत  त्यानं  शेवटी  आपलं  स्वप्न  साकार  केलंच.

 

दुसरीकडे  सोव्हिएत  युनियनच्या  गळचेपी  करणाऱ्या  राजवटीमध्ये  सर्गई  पावलोव  कोरेलियॉव्ह  नावाचा  विलक्षण  माणूस  खितपत  पडला  होता.  अंतराळभरारीचं  स्वप्न  तोही  मनाशी  बाळगून  असला  तरी  आपल्याच  लोकांकडे  सातत्यानं  संशयाच्या  नजरेनं  बघणाऱ्या  सोव्हिएत  राजवटीमध्ये  तो  पार  पिचून  गेला  होता.  सोव्हिएत  युनियनच्या  छळछावणीमध्ये  कोरेलियॉव्हचा  शारीरिक  छळ  होई.  त्याच्यावर  खोटे  आरोप  ठेवण्यात  आले.  तो  सोव्हिएत  युनियनच्या  राजवटीच्या  विरोधात  कारवाया  करतो  असा  बनाव  रचण्यात  आला.  यामुळे  कोरेलियॉव्ह  पार  खचून  गेला.  तेवढयात  अचानकपणे  कोरेलियॉव्हच्या  आयुष्यातला  विझत  चाललेला  आशेचा  किरण  एकाएकी  प्रखर  झाला.  कोरेलियॉव्हचं  तांत्रिक  कौशल्य  किती  वादादीत  आहे  याची  सोव्हिएत  अधिकाऱ्यांना  जाणीव  झाल्यामुळे  त्याच्यावरचे  सगळे  आरोप  रद्दबातल  ठरवून  त्याला  रॉकेटनिर्मितीच्या  कामाचा  प्रमुख  नेमण्यात  आलं.

 

एकीकडे  फॉन  ब्राऊन  आणि  दुसरीकडे  कोरेलियॉव्ह  हेच  ते  दोन  महामानव  होते.  सगळया  अडचणींना,  निराशाजनक  परिस्थितीला,  अपमानांना,  हालअपेष्टांना,  कुचेष्टेला,  आर्थिक  कुचंबणेला  सामोरं  जात  या  दोघांनी  आपल्या  मनातली  जिद्द  सोडली  नाही.  एक  ना  एक  दिवस  माणूस  अंतराळावर  जाईलच  हा  त्यांचा  विश्वास  अचंबित  करून  सोडणारा  होता.  खरोखर  कुठून  येतं  हे  सगळं?’  असं  आपण  स्वत:ला  विचारून  अंतर्मुख  व्हावं  असं  या  दोन  माणसांचं  व्यक्तिमत्व  होतं.  आजूबाजूला  सगळीकडे  निराशा  दाटलेली  असताना  आपण  मात्र  आपल्या  लक्ष्यावर  सगळं  बळ  एकवटून  काम  करत  राहण्याचा  आणि  शेवटी  यश  मिळवण्याची  जिद्द  बाळगण्याचा  हा  अभूतपूर्व  प्रवास  होता.  या  प्रवासाची  कहाणी  थरारक  तर  आहेच;  पण  तिची  अनेक  वैशिष्टयंही  आहेत.  उदाहरणार्थ  फॉन  ब्राऊनच्या  कामाविषयी  अमेरिकेमध्ये  नेहमीप्रमाणेच  खूप  मोकळेपणानं  बोललं  जाई;  याउलट  कोरेलियॉव्हनं  इतिहास  घडवूनसुध्दा  त्याचा  मृत्यू  होईपर्यंत  त्याच्याविषयी  सोवट्ठवएत  युनियननं  पुरती  चुप्पी  साधली  होती.  म्हणजेच  फॉन  ब्राऊन  हा  आधीपासूनच  हीरो‘  ठरला  असला  तरी  जिवंतपणी  कोरेलियॉव्हकडे  काही  मोजक्या  सोव्हिएत  उच्चपदस्थांखेरीज  आणि  तंत्रज्ञांखेरीज  कुणीच  अशा  नजरेनं  बघितलं  नाही.  कोरेलियॉव्हच्या  मृत्यूनंतर  मात्र  जेव्हा  त्याच्याविषयीची  माहिती  सोव्हिएत  युनियननं  प्रसिध्द  केली  तेव्हा  गहजबच  झाला!  माणसांचा  महापूर  कोरेलियॉव्हच्या  मृतदेहाला  वंदन  करण्यासाठी  लोटला.  अर्थातच  हे  बघायला  कोरेलियॉव्ह  आता  होता  कुठे?  याखेरीज  सोव्हिएत  युनियन  अंतराळभरारीविषयीच्या  आपल्या  प्रगतीविषयी  प्रचंड  गुप्तता  बाळगत  असली  तरी  अमेरिका  या  संदर्भात  तितक्याच  खुलेपणानं  बोलत  असल्यामुळे  विलक्षण  ताणतणावाची  परिस्थिती  निर्माण  झाली.  अंतराळभरारीच्या  संदर्भात  आपला  शत्रू  आपल्यावर  मात  करणार  अशी  भीती  बाळगून  काम  सुरू  राही.  ही  शर्यत  जिंकण्यासाठी  दोघेही  सतत  धडपडत.  काहीही  करून  आपणच  ही  शर्यत  जिंकायची  यासाठी  फॉन  ब्राऊन  आणि  कोरेलियॉव्ह  सातत्यानं  प्रयत्न  करत.  यामध्ये  कधीकधी ईष्येची  भावना  असली  तरी  या  दोघांचा  मुख्य  हेतू  अंतराळामध्ये  माणसाला  पोहोचवण्याचा  होता.  हे  काम  आपल्याआधी  आपल्या  प्रतिस्पर्ध्यानं करू  नये  यासाठी  त्यांची  धडपड  सुरू  असली  तरी  त्यात  विज्ञानाचा  विजय  व्हावा  अशीच  त्यांची  कायम  इच्छा  असे.  कोरेलियॉव्हविषयी  तर  फॉन  ब्राऊनला  अर्थातच  माहिती  नव्हतं.  कोरेलियॉव्हच्या  मृत्यूनंतरच  आपण  कुणाचा  सामना  करत  होतो  हे  फॉन  ब्राऊनला  उमगलं  आणि  त्यानं  मनोमन  कोरेलियॉव्हला  सलाम  केला!  कोरेलियॉव्हला  मात्र  फॉन  ब्राऊनच्या  प्रगतीविषयी  सातत्यानं  समजत  राही  आणि  आपल्या  चाली  तो  त्या  दृष्टीनं  रचे.

 

ही  सगळी  कहाणी  एखाद्या  कादंबरीसारखी  आहे.  काही  वेळा  खरंच  एखादा  प्रसंग  घडला  असेल  का  असं  वाटेल  इतका  रोमांच  त्यात  आहे.  एखाद्या  लेखकानं  आपली  कल्पनाशक्ती  लढवून  रचलेल्या  असाव्यात  अशा  घटनाही  त्यात  आहेत.  कुठल्याही  माणसाला  स्फूर्ती  मिळावी  असे  अनेक  प्रसंग  त्यात  आहेत.  जिद्दीच्या  जोरावर  अत्यंत  निराशाजनक  परिस्थितीवरसुध्दा  कशी  मात  करता  येते  याचे  अनेक  दाखले  त्यात  आहेत.  आपल्या  आजूबाजूला  सगळे  आपल्या  विरोधात  असले  तरीसुध्दा  त्याकडे  साफ  दुर्लक्ष  करून  आपण  बघत  असलेल्या  स्वप्नाकडे  वाटचाल  करत  राहण्याचा  निर्धार  त्यात  पदोपदी  आहे.  विसाव्या  शतकातल्या  अत्यंत  रोमहर्षक  काळात  ही  अंतराळस्पर्धा  घडल्यामुळे  त्याला  आपोआपच  ऐतिहासिक,  सामाजिक  आणि  राजकीय  घडामोडींच्या  नाटयांचं  कोंदणही  लाभलेलं  आहे.  एकूण  काय  तर  हा  विषय  मती  गुंगवून  सोडणारा  आणि  अनेक  गोष्टींचं  भान  देणारा  आहे.

 

वेगळया  संदर्भातलं  आणि  वेगळया  विषयांवरचं  वाचन  सुरू  असताना  अचानकपणे  एके  दिवशी  माझ्या  हातात  डेबोरा  कॅडबरी  यांनी  लिहिलेलं  स्पेस  रेस‘  हे  पुस्तक  पडलं.  या  पुस्तकामधले  काही  ऐतिहासिक  संदर्भ  वापरावेत  या  अत्यंत  मर्यादित  हेतूनं  ते  पटापट‘  वाचण्यासाठी  म्हणून  हातात  घेतलं  आणि  भलतंच  काहीतरी  घडलं!  या  पुस्तकानं  माझी  पुरती  पकडच  घेतली.  मूळ  विषय  पार  बाजूला  पडला  आणि  हेच  पुस्तक  मी  अधाशाप्रमाणे  वाचून  काढलं.  अत्यंत  उत्कटपणे,  अंगावर  रोमांच  उठतील  अशा  प्रकारे  कॅडबरी  यांनी  अंतराळशर्यतीचं  केलेलं  वर्णन  वाचून  काही  दिवस  तर  नुसत्या  भारावलेल्या  अवस्थेतच  गेले.  पानोपानी  त्यांनी  या  प्रवासाचा  मांडलेला  लेखाजोखा  थक्क  करून  सोडणारा  होता.  हे  काहीतरी  अद्भुत  आहे  अशा  भावनेनं  मन  भरून  गेलं.  साहजिकच  या  विषयानं  मनाची  पुरती  पकड  घेतली.  त्यासरशी  या  विषयावर  शक्य  तितकं  वाचलं.  यूटयूबवर  त्यासंबंधीच्या  काही  उत्कृष्ट  डॉक्युमेंटरीज आहेत;  त्याही  बघितल्या.  काही  तांत्रिक  संकल्पना  नीटपणे  समजत  नसल्यामुळे  येत  असलेला  अस्वस्थपणा  जगलो  आणि  काही  काळानंतर  त्यांचा  उलगडा  झाल्यावर  होणारा  अपूर्व  आनंदही  अनुभवला.

 

याचबरोबर  डॉक्टर  श्रीराम  लागू  या  थोर  विचारवंत-अभिनेत्यानं  काही  वर्षांपूर्वी  केलेल्या  एका  भाष्याची  आठवणही  झाली.  लागूंनी  त्यांच्या  एका  वाढदिवसानिमित्त  देत  असलेल्या  प्रतिक्रियेमध्ये  विश्व  किती  महाप्रचंड  आहे,  त्यात  आपली  पृथ्वी  केवढीशी  आहे,  त्यात  आपलं  अस्तित्व  किती  अतिसूक्ष्म  आहे  याची  जाणीव  झाल्यानंतर  स्वत:विषयीच्या  सगळया  कल्पनांचे  मुखवटे  गळून  पडतात‘  अशा  अर्थाचं  विधान  केलं  होतं.  ते  किती  खरं  आहे  याची  जाणीव  तेव्हा  तर  झाली  होतीच;  पण  या  पुस्तकाच्या  लिखाणाच्या  निमित्तानं  त्याची  परत  एकदा  आठवण  झाली.  या  विश्वाच्या  अफाट  पसाऱ्यासमोर  नतमस्तक  होण्याशिवाय  आणि  त्यामधली  अद्भुत  रहस्यं  उलगडून  आपल्यासमोर  ठेवणाऱ्या  सगळया  थोर  शास्त्रज्ञांबरोबरच  फॉन  ब्राऊन  आणि  कोरेलियॉव्ह  यांच्यासारख्या  आधुनिक  काळातल्या  तंत्रज्ञांनाही  नव्यानं  सलाम  ठोकण्याखेरीज  दुसरं  आपण  काहीच  करू  शकत  नाही.  अनेक  सुटे  धागे  जुळवत,  असाध्य  कोडी  सोडवत,  असंख्य  शक्यतांमधून  निवडक  तेवढया  निवडून  त्यांच्या  आधारे  अफाट  कामगिरी  करून  दाखवत  या  दोघांनी  माणसाला  अंतराळात  नेण्याची  किमया  अखेर  करून  दाखवलीच.  आता  आपण  चंद्रावर  तसंच  मंगळावर  जाण्याच्या  मोहिमा  आखत  असलो  आणि  त्यात  यश  मिळवल्यावर  रास्तपणे  जल्लोष  करत  असलो  तरी  या  यशोगाथांची  मुहूर्तमेढ  कुणी  आणि  कशी  रचली  हे  आपण  वाचलं  तर  नक्कीच  थरारून  जाऊ!

 

थक्क  करून  सोडणारा  आणि  माणसाच्या  कल्पकतेला  सलाम  ठोकावा  असं  वाटायला  लावणारा  हा  रोमांचक  प्रवास  मराठी  वाचकांसमोर  शक्य  तितक्या  सोप्या  भाषेत  मांडावा  यासाठी  प्रामाणिकपणे  केलेला  हा  प्रयत्न  आहे.  वैज्ञानिक  संकल्पना  आणि  किचकट  माहिती  यांच्या  जंजाळात  स्वत:सकट  इतरांनाही  गुंतवत  जाण्यापेक्षा  आवश्यक  तेवढयाच  वैज्ञानिक  संकल्पना  मांडून  या  प्रवासामधली  जिद्द  सगळयांसमोर  आणणं  हा  या  पुस्तकाचा  मुख्य  उद्देश  आहे.  कदाचित  यातून  प्रेरणा  घेऊन  एखाद्या  छोटया  वाचकाला  आपणही  अंतराळभरारीच्या  संदर्भात  काहीतरी  करावं  असं  वाटलं  तर  फारच  उत्तम!

 

(‘मेहता  पब्लिशिंग  हाऊसतर्फे  लवकरच  प्रकाशित  होणाऱ्या  स्पेस  रेस‘  या  पुस्तकाची  प्रस्तावना)

 

  • अतुल  कहाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *