Monthly Archives: November 2015

भारतीय उद्योगांची नीतिमत्ता, अर्थात, बिझनेस एथिक्स!

१९९७-९८ सालातली गोष्ट. जपानच्या इस्टर्न इंजिनिअरिंगच्या* डायरेक्टर नोबुआकी बरोबर गप्पा चालल्या

होत्या. इस्टर्न च्या भारतात तेव्हा एकूण १६ शाखा होत्या. जपानी कंपन्यांची मेडिकल उपकरणे ते विकत.

दर ३ महिन्यांनी नोबू भारतात यायचा. या सोळा शाखांच्या प्रमुख टीम बरोबर मिटींग्ज घ्यायचा.

“तुला सांगू शिरीष?”, नोबू सांगत होता, “मला या भारतीय लोकांचा एक मजेशीर अनुभव आहे. मी जेव्हा

विचारतो की कसा आहे बिझनेस, तेव्हा सगळे म्हणतात, ‘उत्तम’!…एनी प्रोब्लेम?.. ‘नो प्रोब्लेम’! आणि याच

उत्तरांनी माझी काळजी जास्त वाढते….!”

भारतीय उद्योगांबाबत हा आणि असे अनुभव अनेकदा आणि अनेक परकीय कंपन्यांना येतात. नोबूचा

अनुभव दोन गोष्टींवर भाष्य करतो. एक, उद्योगांची पारदर्शकता. आणि दोन, त्यातून जाणवणारी

उद्योगांची विश्वासार्हता. परिस्थिती जशी आहे तशी सादर न करणे बहुतेक वेळी धोकादायक ठरू शकते.

हां, काही वेळा संपूर्ण चित्र स्पष्ट होईपर्यंत आणि अनुकूल परिणामांची खात्री असताना, दरम्यानचा काही

काळ, जशी आहे तशी, ‘तात्पुरती बिघडलेली’ परिस्थिती सादर करणे, ग्राहकाच्या मनात किंवा बाजारात

अकारण भीती निर्माण करू शकते. अशा वेळी ‘परसेप्शन’ सांभाळण्यासाठी थोडी ‘झाकपाक’ करावी लागत

असेल तर ठीक. पण बहुतेकदा, समोरच्याला विश्वासात घेऊन ही तात्पुरती पडझड देखील सांगून टाकणे

हेच जास्त फायद्याचे असते. कारण अनेकदा, ‘अनुकूल परिणामांची खात्री’ धोका देते आणि ही ‘थोडीशी

झाकपाकच’ गळ्याशी येते! उदा. आपल्या सर्वांचे लाडके, सत्यम चे जंटलमन, रामलिंगा राजू!

म्हणूनच, ‘मेक इन इंडिया’ राबवताना, ‘उद्योगांची नीतिमत्ता’, अर्थात, ‘बिझनेस एथिक्स’ हा पैलू आज

टेक्नोलॉजीच्या बरोबरीनेच हाताळावा लागतोय.

कायदा आणि अर्थव्यवस्था यांच्याबाबत कोणते मार्ग स्विकारले जातायत, उद्योजक त्यांच्या ग्राहकांबाबत,

कर्मचाऱ्यांबाबत आणि भागीदारांबाबत कितपत पारदर्शी व्यवहार करतायत, हे पैलू आता जास्त महत्वाचे

ठरतायत. यावर अनेक चर्चाही झडतायत. या चर्चांचा एक सूर, व्यावसायिक स्पर्धा, सरकारी नियम, कायदे

आणि कारभार यांना जबाबदार धरणारा, तर दुसरा, फक्त ‘नीतिमत्ता’ या संकल्पनेचे निकष लावत त्यात

गांधी, मंडेला, विवेकानंद यांना ओढत एकूणच अध्यात्मिक तत्वज्ञान सांगणारा!

पण मला असं वाटतं, की बिझनेस एथिक्सला ‘शास्त्र’ म्हणून समजून घ्यायला हवं, ‘धर्म’, तत्व किंवा

कर्तव्य म्हणून नव्हे. कारण नीट पाहिलं, तर कुठलाही उद्योग व्यावसायिक यश, व्यावसायिक यशातील

सातत्य आणि व्यावसायिक पत, या तीन घटकांवरच चालतो. आणि याचं उद्दिष्ट कसं साधायचं याचे

नियम एथिक्स सांगतात.

उदाहरणार्थ, माझा ‍प्रोडक्ट विकल्यावर, वचन दिल्यानुसार, मी ग्राहकाला विक्रीपश्चात सेवा नीट दिली

नाही, तर माझा त्या सेवेचा खर्च वाचून मला जास्त फायदा मिळेल. पण तो ग्राहक माझ्याकडे परत येणे

टाळेल. म्हणजेच, एकदा मिळालेल्या यशाचं सातत्य मला राखता येणार नाही. तेव्हा, ‘ग्राहकाला देलेला शब्द

पाळावा’ हे तत्व न राहता, तो व्यावसायिक नीतिचा एक नियम बनतो.

अशा अनेक नियमांना समजून घेता घेताच , उद्योग-नीतिमत्ता एक शास्त्र म्हणून शिकता येईल.

किंबहुना, ‘सायन्स ऑफ बिझनेस एथिक्स’, अर्थात, ‘उद्योगांचे नीतिशास्त्र’ अशी संज्ञा रूढ व्हायलाही

हरकत नाही!

आणि हे घडायला लागेल, तेव्हाच ‘मेक इन इंडिया’ अगदी दूरपर्यंत राबवता येईल!

*नांव बदललेलं

शिरीष कुलकर्णी,
बी.ई (इलेक्ट्रोनिक्स) आणि इंडस्ट्रीअल कौन्सेलर

ब्लॉगिंग हे करियर होऊ शकतं का?

ब्लॉगिंग हे करियर होऊ शकतं का? हा प्रश्न काही वर्षापूर्वी विचारला

असता तर कदाचित याच उत्तर ‘नाही’ हेच असतं पण आजच्या तंत्रज्ञानाच्या आणी

डिजिटल युगात याचं उत्तर ‘होय’ हेच आहे.

 

मागच्या काही वर्षात इंटर्नेटचा वापर जगभरात प्रचंड प्रमाणात वाढला.

इंटर्नेटवर व्यक्त होणार्यांची संख्या वाढतच जाऊ लागली. आता लोकांना

व्यक्त होण्यासाठी, लिहिण्यासाठी वेगळं व्यासपीठ हवं होत ते ब्लॉगिंग या

संकल्पनेन लोकांना दिलं. मग लोक ब्लॉगिंग करू लागले. पूर्वी छंद किवा आवड

म्हणून चालणारं ब्लॉगिंग नंतर पैसा मिळवून देऊ लागले आणी त्यामुळेच काही

ब्लॉगवेड्यांनी चक्क उत्तम पगाराची नौकरी सोडून पूर्णवेळ ब्लॉगिंग

करण्याचा निर्णय घेतला आणी आता ते त्याद्वारे चांगला पैसा आणी नाव कमावीत

आहे.

 

भारतातही आता पूर्णवेळ ब्लॉगिंग करणाऱ्याची संख्या वाढू लागली आहे.

ब्लॉगलेखकांमध्ये इंग्रजी ब्लॉग लेखक आघाडीवर आहे. काही लोक आपल्या

मातृभाषेत का होईना परंतु लिहू लागले आहे, व्यक्त होऊ लागले आहे. यात

हिंदी, बंगाली, मराठी, तेलगु, तमिळ ई. भाषिक ब्लॉग्स आघाडीवर आहे.

 

आज ब्लॉग विश्वात ब्लॉगर आणी वर्डप्रेस या मोफत ब्लॉग सुविधा पुरविणाऱ्या

वेबसाईटची चलती आहे. वरील दोन्ही साईटद्वारे तुम्ही रजिस्टर करून आपला

ब्लॉग मोफत सुरु करू शकता. एकदा ब्लॉग लिहीन सुरु केलं कि मग महत्वाचा

प्रश्न उरतो तो हा कि आपल्या ब्लॉग ला वाचक कसे लाभणार.? यावर सोपा उपाय

म्हणजे आपला ब्लॉग, ब्लॉग अग्रेगेटरवर जोडणे.(ब्लॉग अग्रेगेटर म्हणजे

ब्लॉग्सच संकलन करणारी वेबसाईट.) एकदा आपला ब्लॉग, ब्लॉग अग्रेगेटर जोडला

कि त्या ब्लॉग अग्रेगेटरवरील वाचक आपल्या ब्लॉगवर पोस्ट झालेला लेख सहज

वाचू शकतात.

 

अमित अगरवाल, अभिषेक भटनागर, आशिष सिन्हा, अंशुल तिवारी, मनीष चौहान,

अरुण प्रभुदेसाई ई. हि अशी काही तरुण मंडळी आहेत जी पूर्णवेळ ब्लॉगिंग

करतात आणी त्याद्वारे चांगला पैसाही कमवितात.

आता प्रश्न आहे कि ब्लॉगद्वारे पैसा मिळवायचा कसा.? याचं उत्तर आहे

‘जाहिरातीद्वारे’.  इंटरनेटद्वारे प्रचंड प्रमाणात जाहिरात होते आणी

‘ब्लॉग्स’ हि त्याला अपवाद नाही. आपण जो कोणता ब्लॉग लिहित असू त्यावर

आपण जाहिरात प्रसिद्ध करून पैसे मिळवू शकतो.

 

‘गुगल एडसेन्स’ हे आज आपल्या ब्लॉगवर जाहिरात लावण्याच सर्वात मोठ माध्यम

आहे. या सेवेद्वारे तुमच्या ब्लॉगवर जाहिराती दिसतील आणी त्या जाहिरातीवर

जसजशे लोक क्लिक करत जातील तसंतशे तुम्हाला पैसे मिळत जातील. त्याच

प्रमाणे ‘एफिलेट मार्केटिंग’ हा जाहिरातीचा उत्तम पर्याय ब्लॉगलेखकांसमोर

उपलब्ध आहे. या द्वारे आपण आपल्या ब्लॉगवर हव्या त्या वस्तूच्या जाहिराती

दाखवू शकता आणी जर एखाद्याने त्या वस्तूच्या साईटवर जाऊन ती वस्तू खरेदी

केली तर त्या वस्तूच्या किमतीच्या 5% ते 25% पर्यंतच कमिशन तुम्ही मिळवू

शकता.

 

त्यामुळे नक्कीच ब्लॉगिंग हे पूर्णवेळ करियर होऊ शकते. पण त्यासाठी

तेवढ्याच मेहनतीची आणी दर्जेदार लिखाणाची गरज आहे. वाचकांना परत परत

आपल्या ब्लॉगला भेट द्यायला लावणे आणी त्याला ब्लॉगवर जास्त वेळ खिळवून

ठेवणे जरुरी असते, त्यासाठी दर्जेदार लेखन करने आवश्यक असते. जो हे करू

शकतो त्यासाठी ब्लॉगिंगसारखं उत्तम करियर त्याची वाट पाहत आहे.

अनिकेत भांदककर.

मोदींच्या फेसबुक भेटीचा अर्थ

डिजीटल इंडिया प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच अमेरिका दौरा केला. त्यातच त्यांनी फेसबुकच्या कार्यालयासही भेट दिली. तेथील सिलीकॉन व्हॅलीला दिलेल्या भेटीत व्हॅलीतील काही बड्या कंपन्यांच्या प्रमुखांबरोबर (CEOs) काही मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. भारतात इंटरनेटचा वापर वाढवणे हा सुद्धा यातील एक मुद्दा होता असे वाटते. पण यातील मोदींची फेसबुक (किंवा झुकेरबर्ग) बरोबरची ही भेट याची जरा जास्तच चर्चा झाली. काही अतिउत्साही मंडळी, सोशल मिडीया व इतर काही माध्यमे यांच्याकडून ही भेट अशा प्रकारे रंगविली गेली की आपण (किंवा मोदी)  फेसबुकला एकप्रकारे जणू विकले गेलो आहोत आणि इंटरनेटचा वापर म्हणजे फेसबुकचे internet.org . मोदी स्वत: जरी फेसबुकवर असले तरीही या भेटीचा अशा प्रकारे अर्थ लावणे हा पंतप्रधान व त्यांचे सहकारी यांच्यावर अऩ्याय केल्यासारखे होईल असे वाटते. भारतातील इंटरनेट वापरकर्ते व इंटरनेट पुरवठादार कंपन्या यांच्याबाबत पंतप्रधान व त्यांचे सहकारी पुरेसे संवेदनशील आहेत. उदा. गेल्या वर्षात त्यांनी IT ACT मधले कलम 66अ त्याचा गैरवापर टाळण्यासाठी रद्द केले. (या कलमात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकुर टाकणा-यांना अटक करण्याचे अधिकार होते.) याशिवाय IT ACT संबंधी इतरही काही कायदे रद्द करणे किंवा त्यात बदल करणे, इंटरनेट गव्हर्नन्स मध्ये असू शकणा-या मल्टीस्टेक होल्डर्स विषयी काही भुमिका घेणे इत्यादी.

धोरणे करताना, बदलताना क्वचित प्रसंगी त्यातील एखाद्या धोरणात काही चुका असू शकतील. पण वरील उदाहरणांवरून असेही म्हणता येईल की भारतात इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपन्या, वापरकर्ते यांच्यात असाही विश्वास आहे की भारतात इंटरनेटची वाढ होण्यासाठी काय करावे लागेल याची त्यांनाही कल्पना आहे. या विषयावरील लोकांकडून येणा-या उपयुक्त मतांचा बारकाईने विचार होत असतो. यात नेट न्युट्रलिटि हा महत्वाचा मुद्दा सुद्धा आहेच. त्यामुळे फेसबुकच्या जाळ्यात पंतप्रधान अडकले व नेट न्युट्रलिटिच्या मुद्द्यावर ते तडजोड करतील असा निष्कर्ष काढणे अपरिपक्वपणाचे ठरेल.

सिलीकॉन व्हॅलीतील उद्योजकांचा डिजीटल इंडियाला पाठिंबा मिळवणे, त्यासाठी त्यांना भारतात गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे आणि ती गुंतवणुक भारतात प्रत्यक्षात कशी आणता येईल हा मोदींच्या अमेरिका भेटीचा एक प्रमुख उद्देश होता. यात भारताच्या या भावी गुंतवणुकदारांचे प्रश्न, अटी, समस्यांवर चर्चा झाली असेल. “आम्ही गुंतवणुक करु इच्छितो पण ….”  असा सुर सुद्धा या भावी गुंतवणुकदारांकडून कदाचित निघाला असेल.

पण याचा असा अर्थ असाही नाही की परत आल्यावर वरील चर्चेच्या संदर्भाने यासाठीच्या धोरणांमध्ये घाईने बदल केले जातील. आपल्याला माहित आहे की एखाद्या धोरणविषयक गोष्टींचे काम अशाप्रकारे होत नसते. त्यात असणा-या कलमांमध्ये, मुद्यांमध्ये काही विरोधाभास तर नाही ना हे सुध्दा बघावे लागते. प्रत्येक कलमाचा, मुद्याचा जास्तीत जास्त सकारात्मक परिणाम व इंटरनेट वापरकर्त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा विचार या विषयावरील धोरणे ठरवताना नक्कीच केला जाईल, कारण ते आवश्यकच आहे.

याच दौ-यात पंतप्रधानांनी व्हॅलीतील 35 मोठ्या भारतीय स्टार्ट अप्सच्या प्रमुखांबरोबर सुध्दा बातचीत केली. पण याचा गवगवा फार झाला नाही. तो व्हायला हवा होता. ही बातचीत नेट न्युट्रॅलिटी, भारतात नव्याने स्टार्ट अप्स चालु करण्यासाठी कशाची गरज आहे? अशा विषयांवर झाली. याशिवाय भारत सरकारने मार्च पासुन नेट न्युट्रॅलिटीबाबत देशभर झालेल्या भरपुर चर्चेनंतर TRAI ला याबाबत एक सर्वसमावेशक रिपोर्ट देण्यास सांगितले आहे व याबाबतच्या धोरणाची रुपरेषाही आखली आहे. तत्वतः सरकार नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने आहे.

या संबंधातील परिपत्रात स्थानिक VOIP चे नियमन, टेलिकॉम कंपन्यांना त्यांचे नेटवर्क अधिक परिणामकारक वापरण्यासाठीचे स्वातंत्र्य, इंटरनेट कंपन्यांची नियंत्रकांची भूमिका न करणे या संदर्भातील सूचना आहेत. इंटरनेट वापरकर्त्यांचे काही गट, इंडस्ट्रीतील याच्याशी संबंधित काही महत्वाच्या संस्था यांच्या या वरच्या प्रतिक्रीया अशा आहेत – a) VOIP चे कोणत्याही स्वरुपात नियमन होऊ नये. b) टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कचा परिणामकारक वापर होताना त्याचा गैरवापर होऊ नये.  c) मोठ्या इंटरनेट कंपन्यांप्रमाणे टेलिकॉम कंपन्यांनीसुध्दा नियंत्रकाची भूमिका बजावू नये.

मोदींची फेसबुक (किंवा झुकेरबर्ग) बरोबरची ही भेट फारतर सेमी सोशल म्हणता येईल. या भेटीपेक्षा सरकारचे नेट न्युट्रलिटी बाबतचे धोरण, नेट न्युट्रलिटी निर्धारित करणा-यावरील प्रतिक्रिया यांच्याकडे आपण जास्त लक्ष देण्याची गरज आहे. या दौ-याचा उद्देशांबरोबरच, जगभरातील अद्यापही न जोडले गेलेले 800 मिलीयन भारतीयांना कसे जोडता येईल ? व हे जोडणे खाजगी कंपन्यांच्या मदतीने लवकर होईल का ? हे बघणे हा एक प्रामाणिक उद्देश असु शकतो.

जरी Internet.org भारतात काही खासगी कंपन्यांद्वारे आले असले तरी  internet.org च्या भारतात येण्याच्या विचारांपासून, सेवा देण्याबाबत भारत सरकारने आपल्याला अधिकृतपणे दुरच ठेवले आहे. खरेतर आता भारतात नेट न्युट्रलिटीचा मुळ उद्देश, तत्वे या बाबत तडजोड न करता इंटरनेट सेवा देणे या करता एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे.

याच बरोबर भारतात नवे स्टार्ट अप्स कसे चालु होतील हे बघणे, त्या साठीचे अनुकूल वातावरण तयार करणे या विषयावर सुध्दा मंथन होणे आवश्यक आहे. ज्या मुळे इथल्या नव्या स्टार्ट अप्स मधे इंटरेस्ट असणा-या लोकांना जास्त माहिती मिळेल.

हेमंत खळदकर

एस.एम.एस इलो रे इलो sss

पहाटे दहाच्या सुमारास ‘अमोल’ ची झोप उडाली. अमोल अर्थात ‘अमल्या’ ची सकाळ अकरा ते साडे अकरा दरम्यान सुरु होत असे. तो पहाटे नऊचा अलार्म लावून नेहमीच्या सवयी नुसार रात्री दीड दोनच्या सुमारास tv सुरु ठेवूनच झोपी जात असे. उठल्या उठल्या त्याने मोबाईल हाती घेतला व लगेच पेड एस.एम.एस सेर्विस कडून मिळवलेल्या वेगवेगळ्या विषयावरील एक हझार रेडीमेड मेसेज पैकी निवडून पाच सहा मेसेज.. गुड मोर्निंग इत्यादी, पाच सहा मित्रांना पाठविले.दिवसाची सुरुवात झाली होती.तेवढ्यात घर गड्याने बेड टी आणला, चहाचा घोट घेता घेता त्याने मोबाईल वरील इनकमिंग मेसेज वाचण्यास सुरुवात केली.काही मेसेज लगेच स्वतः च्या नावानी इतरांना फोरवर्ड केले.काही डिलीट केले.गड्याने आणलेला फालतू बेचव नाश्ता त्याने अर्धावट खाल्ला व मोबाईलवर खास व्यक्तीशी बोलणे – chatting फ्लीर्तिंग चालू ठेवले. मोबाईल, एस.एम.एस हे अमोलच्या जीवनाचे अविभाज्य घटक झाले होते. ‘भरभरून ‘ एस.एम.एस पाठविण्यात त्याचा कोणी हात धरू शकत नव्हते.त्याची बोटे मोबाईल बटनावर अतिशय सफाईने व स्पीडने चालत. पाहता पाहता  एस.एम.एस type होऊन ‘सेंड’ होत असे.

बेड टी ब्रेंक्फास्त घेतल्यावर त्याने बेसिन समोर आरशात बघून टूथ ब्रश दातावर घासणे सुरु केले न केले तोच मोबाईलची रिंग वाजली, तोंडातील फेस व ब्रश तसाच ठेवून त्याने मोबाईल कानाला लावला, समोरून बबन्या बोलत होता, “अमल्या अरे आहेस कुठे? अरे राजा कुल्कर्ण्याला म्हणजे त्याच्या बायकोला मुलगा झाला. आताच एस.एम.एस आला आहे.”

“काय, सांगतोस काय ?” अमोलच्या तोंडातून टूथ पेस्टच्या फेसाचे बबल उडाले, थोडा फेस हनुवटीवरून ओंघाळून पोटावर पडला. तो पुढे बोलला, ” मी आताच कुल्कर्ण्याला एस.एम.एस पाठवितो.”

ब्रश तोंडातच ठेवून त्याने एस.एम.एस टाईप केला, ” कौनग्रजूलेशनस, यु हाव गोत सन, हवू इज दी हेल्थ ऑफ द बोय ?”.  ब्रश तोंडात असल्यामुळे त्याने मोबाईल सर्चवर जाउन घाई गडबडीत आर. बी. कुलकर्णी ह्या नावावर प्रायरिती एस.एम.एस सेंड केला.

 

 

रामचंद्र व सीताकाकू कुलकर्णी हे दाम्पत्य, नातवाने दिलेल्या मोबाईलकडे कौतुकाने बघत होते, अचानक मोबाईल मधून एस.एम.एस आल्याची अलर्ट टोन वाजली. डोळ्यावरील चष्मा नीट पुसून दोघांनी आलेला एस.एम.एस वाचला, पुन्हा पुन्हा वाचला, मेसेज स्पष्ट होता… ” कौनग्रजूलेशनस, यु हाव गोत सन, हवू इज दी हेल्थ ऑफ द बोय ?”. रामचंद्रांना मुलगा झाल्याचा मेसेज होता व त्यात त्यांचे अभिनंदन केले होते. सीताकाकूनच्या कपाळावर आठ्या आल्या.त्यांनी ‘सत्तरी’ पार केलेल्या राम प्रभूंकडे संशयाने पहिले.रामचंद्र ओशाळले, नेमके त्याचवेळी दरवाज्यावरची बेल वाजली. काकूंनी दार उघडले, समोर बिल्डिंग मधील वाचमन उभा होता. त्याने त्यांच्या हातात पेढ्याची पुढी ठेवली व बोलला, ” सेकिंड फ्लोवर के उगन्तीस नंबर के फलेत मे रेह्नेवाली मेमसाब को लाडका हुवा इस्की मिठाई है.” वाचमन गेला. काकूंनी काही पुटपुटत दरवाजा बंद केला, धाडकन आवाज झाला व वादळापूर्वीची शांतता सुरु झाली.

शेवटी शांतता मोडून रामभाउच बोलले, ” अग कोण हा उपटसुंभ, हा काय एस.एम.एस मला पाठवतो आहे? मला तर काहीच उलगडा होत नाही.”

“कसा होणार? नेमका तुम्हालाच एस.एम.एस येतो आणि नेमका याच वेळी वाचमन पेढे आणतो, याचा अर्थ काय? हा निव्वळ योगायोग आहे काय?……..सीताकाकू एकदम कोपल्या. वीजच कडाडली.

“आग माझे वय काय? माझा अवतार बघ? तू सोडून कोणी माझ्याकडे ढुंकून तरी बघेल काय? आग माझ्या रामचंद्र नावाचा तरी आदर राख”….. ‘रामराजे’ वैतागून बोलले.

“त्या रामचंद्रचा काय दाखला देता. ते सतयुग होते. अहो अश्याप्रकारचा आळ आल्यावर त्यांनी ‘सीतेला’ अग्निदिव्य करावयास सांगितले होते.आता आळ संशय तुमच्यावर आहे. व  समोर एस.एम.एसचा पुरावा आहे.तुम्ही अग्निदिव्य कराल?”

“काय!! अग्निदिव्य आणि ते सुद्धा असल्या फालतू एस.एम.एस करिता!! अग अग्निदिव्य मी स्वतः कसे करणार? इति रामचंद्र.

“म्हणजे तुम्हाला काय म्हणावयाचे आहे”…. काकू.

” अग माझा प्रवास ‘तिरडी’ वरून स्मशानातील ‘सरणावर’ होणार व अग्नी देणारे दुसरेच असणार, मग मी स्वतः कसे अग्निदिव्य करणार.”

रामचंद्र कुल्कर्ण्याच्या तोंडचे हे उद्गार ऐकल्याबरोबर सीताकाकूंचा आवाज एकदम खालच्या पट्टीत आला. ” अहो तसं नव्हे. कोणीतरी हलकट मेल्याने चावटपणा करून तुम्हाला असला एस.एम.एस पाठविला आहे. आपल्या एक्कावन वर्षांच्या सुखी संसारात विष कालवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मेल्याचा सत्यानाश होवो. तुम्ही मनाला लावून घेऊ नका मला तुमच्याबद्दल खात्री आहे. मी चहा आणते.

 

 

सोसायती मधील श्री मेश्राम यांच्या घरी सर्व मंडळी चेहर्यावरील आनंद लपविण्याचा प्रयत्न करीत होती.व हळू हळू दबक्या आवाजात कुजबुज करीत होती.श्री मेश्राम यांच्या मोबाईलवर रात्री अडीच वाजता एस.एम.एस आला कि ‘नायजेरियात’ कुठल्यातरी लोटरीच्या मोबाईल न्म्बरांच्या लकी ड्राव मध्ये त्यांच्या मोबाईल नंबरावर एक लाख पन्नास हजार पौंड सोडत निघाली आहे, ह्या मोबाईल न्म्बरच्या मालकाचे ‘अभिनंदन’! लागोपाठ रात्री तीन वाजता पुन्हा मेसेज आला कि लोटरीची येत्या ‘सात दिवसात’ व पुढील लोटरीच्या  सोडतीच्या अगोदर वितरीत करणे आवश्यक आहे.अन्यथा हि रक्कम lapse होईल. पहाटे पाच वाजता तिसरा एस.एम.एस आला कि बक्षीसाची रक्कम मिळण्याकरिता आपले नाव कळवा व विजा फी, प्रोसेसिंग फी व एयर ट्राव्हेल, हॉटेल स्टे ह्या सर्व खर्चाकरिता खाली लिहिलेल्या अकाउंट नंबर वर ताबडतोब रुपये पन्नास हजार ट्रान्स्फर करावे. लोटरीची रक्कम दीड लाख पौंड म्हणजे एक कोटी रुपये पेक्षा जास्त होती त्यामुळे समस्त मेश्राम कुटुंब-कबिला हुरळून-सुखावून गेले होते, व गुप्तता बाळगून होते.श्री मेश्राम सकाळी आठ वाजताच पन्नास हजारांची व्यवस्था करून कळविलेल्या अकाउंट नंबर वर ट्रान्स्फर करण्यास गेले होते. तेथून परत येताना त्यांनी चांगल्या लोकेशन मधील एक ब्रांड न्यू घर ‘एक रकमी’ विकत घेण्याकरिता हेरून ठेवले होते.मात्र नियतीने त्यांच्या पुढे काय ताट वाढून ठेवले आहे त्याबद्दल समस्त मेश्राम कुटुंब अनभिग्न्य होते. ते सर्व पुढील येणाऱ्या एस.एम.एसची आतुरतेने वाट पाहत होते.

 

तिकडे कोकणात आडवळणाऱ्या गावात रिकाम टेकडा बाबल्या मटका जुगारात व लोत्तो लोटरी लावलेल्या आकड्या बाबत त्याच्या तालुक्यातील मित्राकडून येणारा एस.एम.एस वाचून बोलला, “आयला बबन्या थोडक्यात चुकले आकडे, दोघांचे चाळीस चाळीस रुपये गेले.पुढची लोटरी नक्की लागेल.

मोबाईल एस.एम.एस चे फॅड, हि नवीन जगरहाटी चालूच राहणार…..बाबल्या सारखे लोटरीबहाद्दर एस.एम.एस इलो रे इलो sss हि हाळी देताच राहणार.

दिनकर बाविस्कर

मेक इन इंडिया साठी इलेक्ट्रोनिक्स

आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे कि आता ते राज्य गेले आहे आणि आत्ताचे आपणच निर्माण केलेले हे नवे कोरे राज्य आले आहे. आणि या नव्याराज्याचा मंत्र, जो खरा तर खूप जुना स्वातंत्र्य पूर्व काळापासूनचा विदेशी मालाच्या होळीतून निर्माण झालेला, जो गेली अनेक वर्ष विस्मृतीतगेलेला होता, परंतु आजही अत्यावश्यक असा कालातीत मंत्र आहे, आणि तो आहे मेक इन इंडिया.

आपल्याला हे कदाचित माहिती नसेल परंतु हे सत्य आहे की गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या एकूण आयाती पैकी पेट्रोलियम उत्पादनानंतरदुसरा क्रमांक हा इलेक्ट्रोनिक वस्तू व सल्लग्न सेवांचा आहे. आपल्या देशामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता व साधनसंपत्ती असूनही केवळ राजकीयइच्छाशक्तीचा अभाव, चुकीच्या समजुती व त्यानुसार झालेली चुकीची धोरणे व त्यांचे नियोजन, विदेशी वस्तूंचेच उदात्तीकरण व त्यामुळे निर्माणझालेले त्याचे आकर्षण व त्याची प्रतिष्ठा, ह्यालाच दुर्दैव म्हणावे लागेल. ह्यामुळे आजही आपण मोठ्या प्रमाणात,  अल्प ते प्रगत तंत्रज्ञानअसलेल्या अनेक उत्पादने व सेवांच्या बाबतीत विदेशी कंपन्यांवर अवलंबून आहोत ज्याची परिणती म्हणून आपण आपले अमुल्य विदेशी चलन खर्चीघालत आहोत. उदा. अनेक घरगुती / औद्योगिक उत्पादने, त्यांचे सुटे भाग (मोबाईल – तंत्रज्ञान अमेरिकन (ब्रेन ड्रेन), उत्पादन – चीन, तैवानइ.), LED च्या माळा, Defence ला लागणारी अनेक उत्पादने, अनेक प्रकारचे raw मटेरीअल. उदा. हजारो इलेक्ट्रोनिक components , IC’s, सर्व प्रकारचे SMD components, Copper Clad, सोल्डर मेटल इ.

मेक इन इंडिया चळवळ भारतातील रोजगार निर्मिती वाढीला नक्कीच पूरक आहे. ज्याचे स्वागतच आहे, पण हा विचार करायची गरज आहे कीआपल्याला स्वस्त निर्मिती करणारा दुसरा चीन बनायचं आहे, की स्वतःची निर्मिती व ओळख निर्माण करणारे राष्ट्र बनायचे आहे. आपले राष्ट्रम्हणजे केवळ त्याच्या चतु : सीमा नसून, त्यातील १२५ कोटी लोक व त्यांची संस्कृती आहे. आपल्याकडे १२५ कोटींचे सामर्थ्य आहे ज्यातूनअशी एकही गोष्ट नाही की जी आपण भारतात बनवू शकणार नाही. आपल्या समोर असे एक उदाहरण (product) आहे की जे भारतीयबुद्धिमत्तेचा एक अप्रतिम नमुना आहे, त्याचे निकाल आपल्याला माहीतच आहेत. ते म्हणजे आपल्या इस्रो ने बनवलेले मंगलयान. नासा ला एखादाउपग्रह बनवायला जो खर्च येतो त्याच्या एक पंचमौंश किमतीत मंगलयान तयार झाले, एक KM अंतर कापायला येणारा मंगलयानाचा खर्च हाएक KM अंतर कापायला रिक्षा ला लागणाऱ्या खर्चापेक्षाही कमी आहे. म्हणजे आपल्याकडे सामर्थ्य नक्किच आहे. जर आपण मंगलयान करूशकतो तर आपण काहीही करू शकतो, हे नव्याने सिद्ध करायची गरज नाही. आता गरज आहे ती स्वत:ला सर्व बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्याची.

मेक इन इंडिया प्रमाणेच मेड इन इंडिया, सारखी चळवळ उभी राहण्याची गरज आहे. भारतात उद्योजकता वाढीस लागण्याची गरज आहे. वत्याप्रमाणे आपल्याला आपली धोरणे त्वरेने बदलली व आखली पाहिजेत, एखादा उद्योग सुरु करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करून, त्याआपल्याला कश्या दूर करता येतील यावर काम केले पाहिजे. बँकांनी एखाद्या व्यावसायिकाला त्वरित लोन कसे उपलब्ध करून देत येईल यावरकाम केले पाहिजे. विविध सरकारी परवानग्या मिळवताना लागणारा वेळ कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत.

नवनवीन कल्पना लढवून, गरज ओळखून उत्पादने तयार करण्याची गरज आहे. प्रत्येक आयात होणारे उत्पादन /वस्तूची आपण प्रतीअभियांत्रिकी (Reverse Engineering) करून त्यात value addition करून त्याचे भारतीयीकरण करण्याची गरजआहे. वर्षानुवर्षांच्या चुकीच्या धोरणांमुळे व अनेक वस्तूंच्या अनुपलब्धतेमुळे अनेक प्रक्रियांमध्ये वाया गेलेले / जात असलेले असंख्यनिरर्थक man hours आता वाचवण्याची गरज आहे. या कार्यात embedded इलेक्ट्रोनिक्स तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केलापाहिजे. ह्या दिशेने जर आपण आपली धोरणे बदलली व निर्णायक प्रयत्न केले तर त्यातून होणारी प्रगती ही चिरकाळ टिकेल व वाढेल यात शंकानाही.

राजेंद्र फाटक

इनहाउस  इलेक्ट्रोनिक्स

संपादकीय

नमस्कार ,

टेक मराठीचा हा अंक प्रस्तूत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आज तंत्रज्ञान हा आपल्या वैयक्तिक आयुष्याचा नव्हे तर सामाजिक आयुष्याचा देखील अविभाज्य घटक होत आहे. आपण सगळीकडे स्मार्ट सिटीज्, स्मार्ट सिस्टीम्स असे शब्द सहजपणे कानांवर येतात. भारतामध्ये आपल्या माननीय पंतप्राधानांनी “डीजिटल इंडिया” आणि “मेक इन इंडिया” ह्या उपक्रमाची घोषणा करून साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतातही ह्याची अनेक स्तरांवर अनेक मतप्रवाह आहेत.मात्र, या सगळ्यामुळे अधिकाधिक जागृती, परिवर्तन होणार हे नक्की! याचा फायदा किती आणि तोटा किती हे येणारा काळच ठरवेल.

या वर्षी याच संकल्पनेवर आधारीत दिवाळी अंक काढावा असे योजले आणि हा प्रयत्न आज आपल्यासमोर मांडत आहोत. या वर्षीच्या अंकात आपल्याला अनेक विषयांवर आधारित लेख वाचायला मिळतील. मेक इन इंडियासाठी इलेक्ट्रोनिक्स, स्मार्ट सिटी साठी सिस्टीम्स् थिंकिंग असे विविध विषय आमच्या लेखकांनी हाताळले आहेत. हा अंक संपूर्णपणे ऑनलाईन प्रकाशित करीत आहोत जेणेकरुन आपल्या प्रतिक्रिया आपण सहज नोंदवू शकता.

हा प्रयत्न आपल्याला आवडेल अशी आशा आहे. आपल्या प्रतिक्रिया हिच आम्हांस पोचपावती! हा दिवाळी अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही विनंती.

संपादक

टेक मराठी दिवाळी अंक २०१५

मोबाइल धारकांसाठी अतिशय उपयुक्त App – “ InTouchApp”

सध्याच्या मोबाइल फोन युगात सगळं जग जवळ आलं आहे . त्यातही हे मोबाइल फोन जास्तीत जास्त स्मार्ट होत आहेत आणि त्यात भर म्हणून आपणही ” स्मार्ट सिटीत ” राहणारे अति स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करीत आहोत . पण ह्या धांदलीत प्रत्येक मोबाइल धारकाचा प्रयत्न आपापली संपर्क यंत्रणा अद्ययावत कशी ठेवता येईल असाच असतो . मग तो एखादा व्यावसाईक असो लहान मोठा उद्योजक असो किंवा सामान्य नागरिक असो ! या प्रत्येकाला आपला ग्राहकवर्ग, मित्रवर्ग, नातेवाइक यांच्याशी संपर्क ठेवणे महत्वाचे असते . हे करताना तो व्हॉट्स अप , एस . एम एस . , नेहमीचे कॉल्स यांचा वापर करतो आणि त्यासाठी त्याची संपर्क यादी ( contact list ) महत्वाची ठरते . हे सर्व संपर्क अबाधित ठेवण्याची त्याची धडपड असते .पण जर मोबाइल हरवला तर काय करायचं ? तो पाण्यात पडला तर माझे संपर्क ( contacts ) गेले का ? मोबाइल मधून काही क्रमांक अचानकपणे  गायब झाले तर काय करायचं ? कुणाचे नंबर बदलले किंवा मी फोन बदलला तर माझ्या संपर्क यादीच काय होणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर ती देणारं ” InTouchApp”पुण्याच्या एका कंपनीने विकसित केले आहे . अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या   धोरणा नुसार भारतातच आणि तेही पुण्यात हे app विकसित केलं आहे .

अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर InTouchApp म्हणजे संपर्कासाठी असलेली Drop Box आहे . हे app तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये उतरवून घेतलत की तुमच्या सगळ्या संपर्कांबद्दल तुम्ही अगदी निश्चिंत रहायचं ! कारण त्यामुळे तुमच्या सगळ्या संपर्कांची एक यादीच तयार होते आणि ती एका ठिकाणी सुरक्षित राहते . तुमचा कोणताही मोबाइल असला (Android, iPhone, Blackberry, Windows phone, etc.) तरी तुमचा डेटा नष्ट न होता सर्व संपर्क क्रमांक सहजी उपलब्ध होतात . मोबाइल बदलला, हरवला ,मोडला तरीही तुमचे संपर्क अबाधित राहतात . एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त मोबाइल फोन वापरत असेल तरीही त्यातले सर्व क्रमांक असे सुरक्षित राहतात .

InTouchApp चा महत्वाचा फायदा म्हणजे तुमचे सर्व संपर्क सुरक्षित आणि सहजी उपलब्ध राहतात . त्याच्याशी संबंधित बदलांची नोंद ( म्हणजे क्रमांक , पत्ता ) आपोआप होते .त्यामुले तुमचे सर्व संपर्क अद्द्ययावत राहतात आणि त्यामुळे तुम्ही चिंतामुक्त राहता.

थोडक्यात काय तर InTouchApp तुमच्या मोबाइलवर टाका आणि तुमच्या सर्व संपर्क क्रमांकाबद्दल निर्धास्त रहा, म्हणजेच , ” लगे राहो ! विनातक्रार , विना अडचण ! म्हणून तर मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने विकसित केलेल्या InTouchApp चा वापर आज जगातले पंचवीस लाख लोक आनंदाने करीत आहेत .

InTouchApp साठी संपर्क : हे App सर्व App Store वर उपलब्ध आहे किंवा intouchapp.com  वर सुध्धा !

अरुण नूलकर

इंटरनेट अॅडिक्शन ..

न वेळेवर चहा

न वेळेवर जेवण

न वेळेवर कॉलेज

न अभ्यासात मन

 

न घरच्यांसाठी वेळ

न मित्रांसाठी वेळ

सतत मोबाईलमध्ये डोकावलेले

न कुठल्या कामात बसलेला मेळ

 

ती भूकही कमी झाली

ते वजनही कमी झाले

सतत बसून एका ठिकाणी

ते फिरणेही कमी झाले

 

रात्रीचं जागणं माझं वाढलं

काळ वर्तूळ डोळ्याखाली दाटलं

सोसून मानसिक ताण नेहमी

पाणी डोळ्यातच माझ्या साठलं

 

विचार केला मनाशी एक

की आता ऐकणार नेहमी मनाचे

सावरून स्वत:ला अॅडिक्शन मधून

नेहमी ऐकणार प्रियजनाचे

 

तो व्यायाम सूरू मी करणार

आहार दररोज नियमित मी घेणार

पुन्हा मिळवून जीवन माझे

अॅडिक्शनला राम राम मी करणार

 

चेतन ठाकरे

स्पेस रेस

जीवसृष्टीची निर्मिती  झाल्यापासून  माणसाला  अंतराळाविषयी  विलक्षण  कुतूहल  वाटत  आलेलं  आहे.  आकाशाकडे  बघितल्यावर  माणसाला  दर  वेळी  वेगळं  दृश्य  दिसत  असल्यामुळे  तो  कायमच  त्याकडे  काहीतरी  अद्भुत  बघितल्याच्या  भावनेनं  भारून  गेलेला  आहे.  कधी  निळंशार  आकाश  दिसावं  तर  कधी  पांढरफटक  आकाश  नजरेला  पडावं.  कधी  पावसाचे  काळे  ढग  दाटलेले  असावेत  तर  कधी  प्रखर  सूर्याकडे  बघणं  अशक्य  व्हावं.  रात्रीसुध्दा  किती  वैविध्यं  दिसावीत?  कधी  चांदण्यानं  भरलेलं  पांढरं  आकाश  दिसावं  तर  अमावस्येच्या  रात्री  चंद्र  नसल्यामुळे  एकदम  मोकळं  आकाश  दिसावं.  चंद्रसुध्दा  कधी  पूर्ण  तर  कधी  अर्धा.  कधी  त्याची  कोर  दिसावी  तर  कधी  तो  दिसूच  नये.  इतर  ग्रहतारेसुध्दा  चमचमताना  अगदी  दिमाखात  दिसावेत.  कित्येक  सहस्त्रकं  आकाशाविषयीची  ही  वैशिष्टयं  अचंबित  होऊन  बघण्यात  आणि  त्याविषयी  कविकल्पना  रचण्यातच  माणसानं  घालवली.  त्यानंतर  विज्ञानाचं  माणसाच्या  आयुष्यात  आगमन  झालं  आणि  आकाशामधल्या  या  चमत्कारांना  ठरावीक  नियमांमध्ये  बांधण्यासंबंधीच्या  संकल्पना  जन्मल्या.  इथून  पुढे  चमत्कार  घडत  गेले.  पृथ्वी  स्थिर  नसते  आणि  ती  फिरते;  इतकंच  नव्हे  तर  ती  सूर्याभोवती  फिरते  या  विधानामुळे  अनेक  शतकं  नुसता  गोंधळ  माजला.  तसंच  चंद्रसुध्दा  पृथ्वीभोवती  फिरतो  हेही  समजलं.  याखेरीज  इतर  सगळे  ग्रहताऱ्यांविषयी  विलक्षण  माहिती  मिळत  गेली.  दुर्बिणीचा  जन्म  झाल्यापासून  आणि  माणसानं  ती  आकाशाकडे  रोखल्यापासून  या  माहितीचा  स्फोट  झाला.  खगोलशास्त्र  या  अत्यंत  महत्त्वाच्या  शाखेचा  जन्म  झाला.

 

काही  शतकं  आकाशाकडे  बघून  अवकाशाविषयीची  माहिती  गोळा  करण्यावर  माणसाचा  भर  होता.  त्यानंतर  मात्र  अचानकपणे  अवकाशाकडे  बघण्याची  माणसाची  दृष्टी  पार  बदलली.  नुसतं  पृथ्वीवर  बसून  अवकाशाचं  निरीक्षण  करण्यापेक्षा  चक्क  अवकाशातच  एखादी  चक्कर  मारता  आली  तर;  या  विचारानं  काही  लोकांना  पार  भारून  टाकलं.  याला  विमानाचा  शोधसुध्दा  कारणीभूत  ठरला.  जमिनीवरून  जाणाऱ्या  वाहनांबरोबरच  हवेत  उडू  शकणाऱ्या  वाहनांमुळे  हे  घडलं.  जर  विमान  जमिनीपासून  थोडया  उंचीपर्यंत  जाऊ  शकत  असेल  तर  ते  आणखी  बरंच  वर  जाऊ  शकेल  आणि  थेट  अंतराळात  घुसू  शकेल  का  या  भन्नाट  विचारामुळे  हे  लोक  पार  वेडेच  झाले.  याला  युध्दांचीही  मदत  झाली.  कारण  युध्दकाळात  शत्रूच्या  ठिकाणांवर  बॉम्बहल्ले  करण्यासाठी  विमानांबरोबरच  रॉकेट्सही  बनवण्यात  आली.  विलक्षण  वेगानं  दूरपर्यंत  जाऊ  शकणारं  असंच  एखादं  रॉकेट  थेट  अंतराळापर्यंत  गेलं  तर  काय  बहार  येईल  ही  कल्पनाच  थरारक  होती.  अर्थातच  यासाठी  अनेक  प्रश्न  सोडवणं  भाग  होतं.  मुळात  अवकाश‘  नक्की  कुठे  असतं,  तिथे  जाण्यासाठी  नक्की  कशा  प्रकारचं  रॉकेट  लागेल,  त्यामध्ये  कुठलं  इंधन  वापरावं  लागेल,  तिथली  परिस्थिती  नक्की  कशी  असेल,  तिथे  माणसाला  जाणं  शक्य  होईल  का  अशा  असंख्य  प्रश्नांची  उत्तरं  मिळवण्यासाठीची  धडपड  सुरू  झाली.  या  धडपडीचा  सगळयात  चित्तथरारक  आणि  अभूतपूर्व  काळ  दुसऱ्या  महायुध्दानंतरच्या  सुमाराचा  होता.

 

अमेरिका  आणि  सोव्हिएत  युनियन  इथे  1957  ते  1969  या  बारा  वर्षांच्या  काळात  अंतराळावर  आपलं  वर्चस्व  निर्माण  करण्याच्या  संदर्भात  घडलेल्या  अत्यंत  रोमहर्षक  घडामोडींना  ढोबळमानानं  अंतराळशर्यत‘  (Space Race) असं  म्हटलं  जातं.  1957  सालच्या  ऑक्टोबर  महिन्यात  सोव्हिएत  युनियननं  अंतराळात  सोडलेल्या  स्पुटनिक‘  या  उपग्रहापासून  सुरू  झालेलं  हे  युध्द  1969  सालच्या  अमेरिकेच्या  अपोलो  11′  उपग्रहानं  चंद्रावर  उतरण्याच्या  वेळी  संपलं.  दुसऱ्या  महायुध्दानंतर  अमेरिका  आणि  सोव्हिएत  युनियन  यांच्यामध्ये  सुरू  झालेल्या  शीतयुध्दाचाच  हा  एक  भाग  होता.  या  अंतराळयुध्दामधल्या  तांत्रिक,  राजकीय,  सामाजिक  आणि  वैयक्तिक  घडामोडींचं  वर्णन  अत्यंत  चित्तथरारक  आहे  आणि  जागतिक  इतिहास  समजून  घेण्याच्या  दृष्टीनंसुध्दा  ते  खूप  महत्त्वाचं  आहे.

 

या  अंतराळशर्यतीचे  अनेक  हीरो‘  असले  तरी  त्यामधल्या  दोघांचा  आपल्याला  खास  उल्लेख  केलाच  पाहिजे.

 

जर्मनीत  जन्मलेला,  नाझी  राजवटीमध्ये  नाइलाजानं  हिटलरसमोर  शरणागती  पत्करून  ब्रिटिशांवर  बॉम्ब  टाकण्यासाठी  रॉकेट  तयार  करण्याचं  काम  करणारा  व्हर्नर  फॉन  ब्राऊन  हा  त्यामधला  पहिला  नायक  होता.  लहानपणापासून  रॉकेट  तयार  करण्यासाठी  धडपडणारा  आणि  अंतराळात  माणसाला  कधीतरी  पाठवण्याची  दुर्दम्य  आशा  बाळगणारा  फॉन  ब्राऊन  अत्यंत  हुशार  तर  होताच;  पण  कुठल्या  परिस्थितीत  कसं  वागायचं  याची  त्याला  चांगलीच  जाण  होती.  म्हणूनच  दुसऱ्या  महायुध्दात  जर्मनीचा  पाडाव  होत  असताना  अमेरिकेला  शरण  जाण्याचा  शहाणपणा  त्यानं  दाखवला.  विलक्षण  धोका  पत्करून  आपला  आणि  आपल्या  सहकाऱ्यांचा  जीव  वाचवत  आणि  रॉकेटसंबंधीची  गुप्त  कागदपत्रं  कशीबशी  सुरक्षित  ठेवत  फॉन  ब्राऊननं  अमेरिकेमध्ये  आपलं  बस्तान  बसवलं.  हा  प्रवासही  काही  सोपा  नव्हता.  अमेरिकेमध्ये  गेल्यावरसुध्दा  नाझी  जर्मनीमध्ये  क्रूर नरसंहाराला  काही  प्रमाणात  कारणीभूत  ठरल्याचा  आरोप  त्याच्यावर  ठेवण्यात  आला.  तसंच  त्याच्या  अंतराळभरारीच्या  स्वप्नांना  वारंवार  कात्री  लावण्यात  आली.  एखादा  माणूस  अशा  परिस्थितीत  पार  खचून  गेला  असता;  पण  फॉन  ब्राऊन  हे  रसायनच  काही  वेगळं  होतं.  सगळया  प्रतिकूल  परिस्थितीचा  सामना  करत  त्यानं  शेवटी  आपलं  स्वप्न  साकार  केलंच.

 

दुसरीकडे  सोव्हिएत  युनियनच्या  गळचेपी  करणाऱ्या  राजवटीमध्ये  सर्गई  पावलोव  कोरेलियॉव्ह  नावाचा  विलक्षण  माणूस  खितपत  पडला  होता.  अंतराळभरारीचं  स्वप्न  तोही  मनाशी  बाळगून  असला  तरी  आपल्याच  लोकांकडे  सातत्यानं  संशयाच्या  नजरेनं  बघणाऱ्या  सोव्हिएत  राजवटीमध्ये  तो  पार  पिचून  गेला  होता.  सोव्हिएत  युनियनच्या  छळछावणीमध्ये  कोरेलियॉव्हचा  शारीरिक  छळ  होई.  त्याच्यावर  खोटे  आरोप  ठेवण्यात  आले.  तो  सोव्हिएत  युनियनच्या  राजवटीच्या  विरोधात  कारवाया  करतो  असा  बनाव  रचण्यात  आला.  यामुळे  कोरेलियॉव्ह  पार  खचून  गेला.  तेवढयात  अचानकपणे  कोरेलियॉव्हच्या  आयुष्यातला  विझत  चाललेला  आशेचा  किरण  एकाएकी  प्रखर  झाला.  कोरेलियॉव्हचं  तांत्रिक  कौशल्य  किती  वादादीत  आहे  याची  सोव्हिएत  अधिकाऱ्यांना  जाणीव  झाल्यामुळे  त्याच्यावरचे  सगळे  आरोप  रद्दबातल  ठरवून  त्याला  रॉकेटनिर्मितीच्या  कामाचा  प्रमुख  नेमण्यात  आलं.

 

एकीकडे  फॉन  ब्राऊन  आणि  दुसरीकडे  कोरेलियॉव्ह  हेच  ते  दोन  महामानव  होते.  सगळया  अडचणींना,  निराशाजनक  परिस्थितीला,  अपमानांना,  हालअपेष्टांना,  कुचेष्टेला,  आर्थिक  कुचंबणेला  सामोरं  जात  या  दोघांनी  आपल्या  मनातली  जिद्द  सोडली  नाही.  एक  ना  एक  दिवस  माणूस  अंतराळावर  जाईलच  हा  त्यांचा  विश्वास  अचंबित  करून  सोडणारा  होता.  खरोखर  कुठून  येतं  हे  सगळं?’  असं  आपण  स्वत:ला  विचारून  अंतर्मुख  व्हावं  असं  या  दोन  माणसांचं  व्यक्तिमत्व  होतं.  आजूबाजूला  सगळीकडे  निराशा  दाटलेली  असताना  आपण  मात्र  आपल्या  लक्ष्यावर  सगळं  बळ  एकवटून  काम  करत  राहण्याचा  आणि  शेवटी  यश  मिळवण्याची  जिद्द  बाळगण्याचा  हा  अभूतपूर्व  प्रवास  होता.  या  प्रवासाची  कहाणी  थरारक  तर  आहेच;  पण  तिची  अनेक  वैशिष्टयंही  आहेत.  उदाहरणार्थ  फॉन  ब्राऊनच्या  कामाविषयी  अमेरिकेमध्ये  नेहमीप्रमाणेच  खूप  मोकळेपणानं  बोललं  जाई;  याउलट  कोरेलियॉव्हनं  इतिहास  घडवूनसुध्दा  त्याचा  मृत्यू  होईपर्यंत  त्याच्याविषयी  सोवट्ठवएत  युनियननं  पुरती  चुप्पी  साधली  होती.  म्हणजेच  फॉन  ब्राऊन  हा  आधीपासूनच  हीरो‘  ठरला  असला  तरी  जिवंतपणी  कोरेलियॉव्हकडे  काही  मोजक्या  सोव्हिएत  उच्चपदस्थांखेरीज  आणि  तंत्रज्ञांखेरीज  कुणीच  अशा  नजरेनं  बघितलं  नाही.  कोरेलियॉव्हच्या  मृत्यूनंतर  मात्र  जेव्हा  त्याच्याविषयीची  माहिती  सोव्हिएत  युनियननं  प्रसिध्द  केली  तेव्हा  गहजबच  झाला!  माणसांचा  महापूर  कोरेलियॉव्हच्या  मृतदेहाला  वंदन  करण्यासाठी  लोटला.  अर्थातच  हे  बघायला  कोरेलियॉव्ह  आता  होता  कुठे?  याखेरीज  सोव्हिएत  युनियन  अंतराळभरारीविषयीच्या  आपल्या  प्रगतीविषयी  प्रचंड  गुप्तता  बाळगत  असली  तरी  अमेरिका  या  संदर्भात  तितक्याच  खुलेपणानं  बोलत  असल्यामुळे  विलक्षण  ताणतणावाची  परिस्थिती  निर्माण  झाली.  अंतराळभरारीच्या  संदर्भात  आपला  शत्रू  आपल्यावर  मात  करणार  अशी  भीती  बाळगून  काम  सुरू  राही.  ही  शर्यत  जिंकण्यासाठी  दोघेही  सतत  धडपडत.  काहीही  करून  आपणच  ही  शर्यत  जिंकायची  यासाठी  फॉन  ब्राऊन  आणि  कोरेलियॉव्ह  सातत्यानं  प्रयत्न  करत.  यामध्ये  कधीकधी ईष्येची  भावना  असली  तरी  या  दोघांचा  मुख्य  हेतू  अंतराळामध्ये  माणसाला  पोहोचवण्याचा  होता.  हे  काम  आपल्याआधी  आपल्या  प्रतिस्पर्ध्यानं करू  नये  यासाठी  त्यांची  धडपड  सुरू  असली  तरी  त्यात  विज्ञानाचा  विजय  व्हावा  अशीच  त्यांची  कायम  इच्छा  असे.  कोरेलियॉव्हविषयी  तर  फॉन  ब्राऊनला  अर्थातच  माहिती  नव्हतं.  कोरेलियॉव्हच्या  मृत्यूनंतरच  आपण  कुणाचा  सामना  करत  होतो  हे  फॉन  ब्राऊनला  उमगलं  आणि  त्यानं  मनोमन  कोरेलियॉव्हला  सलाम  केला!  कोरेलियॉव्हला  मात्र  फॉन  ब्राऊनच्या  प्रगतीविषयी  सातत्यानं  समजत  राही  आणि  आपल्या  चाली  तो  त्या  दृष्टीनं  रचे.

 

ही  सगळी  कहाणी  एखाद्या  कादंबरीसारखी  आहे.  काही  वेळा  खरंच  एखादा  प्रसंग  घडला  असेल  का  असं  वाटेल  इतका  रोमांच  त्यात  आहे.  एखाद्या  लेखकानं  आपली  कल्पनाशक्ती  लढवून  रचलेल्या  असाव्यात  अशा  घटनाही  त्यात  आहेत.  कुठल्याही  माणसाला  स्फूर्ती  मिळावी  असे  अनेक  प्रसंग  त्यात  आहेत.  जिद्दीच्या  जोरावर  अत्यंत  निराशाजनक  परिस्थितीवरसुध्दा  कशी  मात  करता  येते  याचे  अनेक  दाखले  त्यात  आहेत.  आपल्या  आजूबाजूला  सगळे  आपल्या  विरोधात  असले  तरीसुध्दा  त्याकडे  साफ  दुर्लक्ष  करून  आपण  बघत  असलेल्या  स्वप्नाकडे  वाटचाल  करत  राहण्याचा  निर्धार  त्यात  पदोपदी  आहे.  विसाव्या  शतकातल्या  अत्यंत  रोमहर्षक  काळात  ही  अंतराळस्पर्धा  घडल्यामुळे  त्याला  आपोआपच  ऐतिहासिक,  सामाजिक  आणि  राजकीय  घडामोडींच्या  नाटयांचं  कोंदणही  लाभलेलं  आहे.  एकूण  काय  तर  हा  विषय  मती  गुंगवून  सोडणारा  आणि  अनेक  गोष्टींचं  भान  देणारा  आहे.

 

वेगळया  संदर्भातलं  आणि  वेगळया  विषयांवरचं  वाचन  सुरू  असताना  अचानकपणे  एके  दिवशी  माझ्या  हातात  डेबोरा  कॅडबरी  यांनी  लिहिलेलं  स्पेस  रेस‘  हे  पुस्तक  पडलं.  या  पुस्तकामधले  काही  ऐतिहासिक  संदर्भ  वापरावेत  या  अत्यंत  मर्यादित  हेतूनं  ते  पटापट‘  वाचण्यासाठी  म्हणून  हातात  घेतलं  आणि  भलतंच  काहीतरी  घडलं!  या  पुस्तकानं  माझी  पुरती  पकडच  घेतली.  मूळ  विषय  पार  बाजूला  पडला  आणि  हेच  पुस्तक  मी  अधाशाप्रमाणे  वाचून  काढलं.  अत्यंत  उत्कटपणे,  अंगावर  रोमांच  उठतील  अशा  प्रकारे  कॅडबरी  यांनी  अंतराळशर्यतीचं  केलेलं  वर्णन  वाचून  काही  दिवस  तर  नुसत्या  भारावलेल्या  अवस्थेतच  गेले.  पानोपानी  त्यांनी  या  प्रवासाचा  मांडलेला  लेखाजोखा  थक्क  करून  सोडणारा  होता.  हे  काहीतरी  अद्भुत  आहे  अशा  भावनेनं  मन  भरून  गेलं.  साहजिकच  या  विषयानं  मनाची  पुरती  पकड  घेतली.  त्यासरशी  या  विषयावर  शक्य  तितकं  वाचलं.  यूटयूबवर  त्यासंबंधीच्या  काही  उत्कृष्ट  डॉक्युमेंटरीज आहेत;  त्याही  बघितल्या.  काही  तांत्रिक  संकल्पना  नीटपणे  समजत  नसल्यामुळे  येत  असलेला  अस्वस्थपणा  जगलो  आणि  काही  काळानंतर  त्यांचा  उलगडा  झाल्यावर  होणारा  अपूर्व  आनंदही  अनुभवला.

 

याचबरोबर  डॉक्टर  श्रीराम  लागू  या  थोर  विचारवंत-अभिनेत्यानं  काही  वर्षांपूर्वी  केलेल्या  एका  भाष्याची  आठवणही  झाली.  लागूंनी  त्यांच्या  एका  वाढदिवसानिमित्त  देत  असलेल्या  प्रतिक्रियेमध्ये  विश्व  किती  महाप्रचंड  आहे,  त्यात  आपली  पृथ्वी  केवढीशी  आहे,  त्यात  आपलं  अस्तित्व  किती  अतिसूक्ष्म  आहे  याची  जाणीव  झाल्यानंतर  स्वत:विषयीच्या  सगळया  कल्पनांचे  मुखवटे  गळून  पडतात‘  अशा  अर्थाचं  विधान  केलं  होतं.  ते  किती  खरं  आहे  याची  जाणीव  तेव्हा  तर  झाली  होतीच;  पण  या  पुस्तकाच्या  लिखाणाच्या  निमित्तानं  त्याची  परत  एकदा  आठवण  झाली.  या  विश्वाच्या  अफाट  पसाऱ्यासमोर  नतमस्तक  होण्याशिवाय  आणि  त्यामधली  अद्भुत  रहस्यं  उलगडून  आपल्यासमोर  ठेवणाऱ्या  सगळया  थोर  शास्त्रज्ञांबरोबरच  फॉन  ब्राऊन  आणि  कोरेलियॉव्ह  यांच्यासारख्या  आधुनिक  काळातल्या  तंत्रज्ञांनाही  नव्यानं  सलाम  ठोकण्याखेरीज  दुसरं  आपण  काहीच  करू  शकत  नाही.  अनेक  सुटे  धागे  जुळवत,  असाध्य  कोडी  सोडवत,  असंख्य  शक्यतांमधून  निवडक  तेवढया  निवडून  त्यांच्या  आधारे  अफाट  कामगिरी  करून  दाखवत  या  दोघांनी  माणसाला  अंतराळात  नेण्याची  किमया  अखेर  करून  दाखवलीच.  आता  आपण  चंद्रावर  तसंच  मंगळावर  जाण्याच्या  मोहिमा  आखत  असलो  आणि  त्यात  यश  मिळवल्यावर  रास्तपणे  जल्लोष  करत  असलो  तरी  या  यशोगाथांची  मुहूर्तमेढ  कुणी  आणि  कशी  रचली  हे  आपण  वाचलं  तर  नक्कीच  थरारून  जाऊ!

 

थक्क  करून  सोडणारा  आणि  माणसाच्या  कल्पकतेला  सलाम  ठोकावा  असं  वाटायला  लावणारा  हा  रोमांचक  प्रवास  मराठी  वाचकांसमोर  शक्य  तितक्या  सोप्या  भाषेत  मांडावा  यासाठी  प्रामाणिकपणे  केलेला  हा  प्रयत्न  आहे.  वैज्ञानिक  संकल्पना  आणि  किचकट  माहिती  यांच्या  जंजाळात  स्वत:सकट  इतरांनाही  गुंतवत  जाण्यापेक्षा  आवश्यक  तेवढयाच  वैज्ञानिक  संकल्पना  मांडून  या  प्रवासामधली  जिद्द  सगळयांसमोर  आणणं  हा  या  पुस्तकाचा  मुख्य  उद्देश  आहे.  कदाचित  यातून  प्रेरणा  घेऊन  एखाद्या  छोटया  वाचकाला  आपणही  अंतराळभरारीच्या  संदर्भात  काहीतरी  करावं  असं  वाटलं  तर  फारच  उत्तम!

 

(‘मेहता  पब्लिशिंग  हाऊसतर्फे  लवकरच  प्रकाशित  होणाऱ्या  स्पेस  रेस‘  या  पुस्तकाची  प्रस्तावना)

 

  • अतुल  कहाते

स्मार्ट सिटी साठी सिस्टीम्स् थिंकिंग

” certification committee”  पैकी एक जण मंचावर येऊन बोलू लागला… कधी नव्हे ते प्रत्येकजण लक्षपूर्वक ऐकत होता….

प्रमाणपत्रात “नापास” हा शेरा पाहून सगळे चांगलेच वैतागले होते.४० जणांच्या गटामधे एकाच प्रमाणपत्रावर अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचं शिक्कामोर्तब, ही संपूर्ण गट आणि कंपनीसाठीही मोठीच नाचक्कीची आणि संतापाची बाब होती आणि म्हणूनच ” certification committee”  ला पाचारण करण्यात आले होते. वक्ता बोलत होता….

”  systems thinking ” , प्रणालिबद्ध व्यवस्थेची मानसिकता यावर आपण ३ महिने तांत्रिक शिक्षण घेतलं आणि तुम्ही सर्वच जण आम्हांला प्रभावीपणे ते वापराल अशी खात्री वाटत होती.  “system thinking ”  ह्या विषयाचा हरेक पैलू या गटाला इत्यंभूत कळला आहे अशी आमची शिक्षक म्हणून धारणा होती.परंतु तसं अजिबातच नसल्याचं परिक्षांच्या दरमन्यान आमच्या लक्षात आलं. नाही … मला साक्षर , निरक्षर हा वाद घालायचा नाहीये… साक्षर तुम्ही जरूर आहात पण ”  systems thinking ”  च्या बाबतीत तुम्ही सुशिक्षित होऊ शकला नाहीत म्हणून हा निकाल. “मेक इन इंडिया / डिजिटल इंडिया” हे आपलं स्वप्न असेल तर वैयक्तिक दृष्ट्या   “systems thinking ”  च्या तत्वांचा वापर आपण कसा करू शकू याचं उत्तर “हे तर प्रशासन, सरकार, अधिकारी, यंत्रणा, व्यवस्था यांचं काम आहे” हे मिळणं म्हणजे आम्हाला आमचाच पराभव वाटू लागला… म्हणून खरं तर हा सगळा उहापोह… आज एक व्यक्ती म्हणून परत एकदा आपण सगळ्या गोष्टिंचा थोडक्यात विचार करू आणि इथे सगळेच  IT  मधून असल्याने तिथून सुरू करू…. एखाद्या कामात चूक ( bug)  सापडते म्हणजे नक्की काय होतं तर रचनेमधल्या एक किंवा अधिक गोष्टी अपेक्षित काम अपेक्षित पद्धतीने किंवा ठराविक वेळेत करत नाहीत. मग आपण रचनेचा आराखडा, त्याची अंमलबजावणी या सगळ्या गोष्टींचा विचार छोट्या छोट्या भागांपुरता आणि शेवटी सामाईकपणे पूर्ण यंत्रणा म्हणून करून ही चूक सुधारतो. आता या  IT  मधल्या प्रणालीचा रोजच्या आयुष्यात काय संबंध असा प्रश्न सगळ्या चेहऱ्यांवर दिसतो आहे; तर असा विचार करा की आपण आपली गाडी घेऊन फिरायला निघतो , माहित नसलेलं एखादं ठिकाण बघायला…. अशा वेळी आजकाल आपला सगळ्यात जवळचा वाटणारा मित्र किंवा राजू गाईड म्हणू आपण कोण असेल तर  GPS Tracker;  हा राजू गाईड आपण थांबलो की थांबतो, आपण पळू लागलो की पळतो आणि नुसता पळत नाही तर अजून बाकी असलेलं अंतर, आपल्या वेगानुसार तिथे पोहोचायला लागणारा वेळ, ही सगळी माहिती विनासायास पुरवत राहतो… पण विनासायास आपल्याला… हे सगळं बिनबोभाट घडतं कारण आपला मोबाईल किंवा गाडीमधला  GPS Tracker  , लाखो किलोमिटर दूर वसलेला उपग्रह, या दोन्हीला जोडणारे दुवे आपापलं काम नेमक्या वेळात, ठरलेल्या पद्धतीने, अथकपणे करतात म्हणून… यापैकी कुणीही समन्वयाचे भान सोडले की आपलं “जाते थे जापान पोहोंच गये चीन” असं काहीतरी व्हायचं… असंच काहीसं आपल्याला आनंद देणाऱ्या सगळ्या सुविधा ,  infrastructure, social media  यांचही…. सगळं कसं छान आहे.. प्रत्येक ”  system”  सतत माझ्या सेवेला हजर आहे

पण तरीही रोजच्या ट्रॅफिक ने वैताग येतोच, प्रदूषणाने छातीची आणि भ्रष्टाचाराने डोक्याची चाळण होतेच, पाण्याची बोंब आणि शेतात हरवलेले कोंब, प्रत्येक सरकारी कामात एजंट नाहीतर येरझाऱ्याचं बालंट, शिक्षणाच्या नावाखाली पोरांचे हाल आणि  AC में बैठके भी झडते हुए बाल :) … पण माझं काय संबंध नाही का या सगळ्याशी? मी काय करणार यात…. या सगळ्याचा त्या  bug concept  शी काय संबंध?

तर डोळे आणि डोकं पूर्ण उघडे ठेवून रोजच्या ”  systems  चा विचार करुया आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे मी या  systems  चा कसा अविभाज्य घटक आहे याचा… ट्रॅफिक चा रोजचा विषय घेऊया… स्मार्ट ट्रॅफिक लाईट सिस्टीम आहे… पोलिसांची फौज तैनात आहेत… खड्डे असले तरी बऱ्यापैकी पक्के रस्ते आहेत…लेन ची शिस्त परिभाषित आहे… रेडिऒ ठराविक वेळाने शहरातले “ट्रॅफिक अपडेट” देत आहे… जवळ जवळ सगळ्या मुख्य रस्त्यांवर समांतर वाहनतळ व्यवस्था आहे… प्रत्येक रस्त्याची वेगमर्यादा नमूद केलेली आहे; एकेरी वाहतूक कुठे ,दुहेरी कुठे … सायकल मार्ग, पदपथ सगळं निश्चित आहे… तरीही रोज ट्रॅफिक सुरळीत नाही! मग ह्या  systems  मधे एवढे  bug  आले कुठून… कोणता घटक , कोणता दुवा गहाळ झालाय? याचं उत्तर ”  systems thinking ”  ची तत्वं वापरून शोधायचा प्रयत्न करूया…कधी गर्लफ्रेंड मागे बसली म्हणून तर कधी गाडीच लेटेस्ट आहे म्हणून..कधी ऑफिसला उशिर झाला म्हणून तर कधी वाऱ्याशी स्पर्धा करायची म्हणून हा “मी” कट मारतो…. उजवीकडे वळायचं  म्हणून डाव्या लेनमधून अचानक उजव्या लेनमधे घुसतो.रस्त्यात मित्र दिसला म्हणून गाडी हवी तिथे थांबवून गप्पा कुटतो. या गोष्टी “मी” वैयक्तिक पातळीच्या सुविधांसाठी केल्या तरी  system  म्हणून याचा परिणाम काय हा विचार “मी” करत नाही. यात एक घटकाने म्हणजे “मी” लेन या संसाधनाचा ( resource )  गैरवापर केल्याने इतर घटकांसाठी हे संसाधन योग्य प्रकारे उपलब्ध न झाल्याने यंत्रणेमधला समन्वय बिघडतो. याचा परिणाम म्हणून यंत्रणा अपेक्षेप्रमाणे चालत नाही आणि बिघडवणारा घटक “मी” मला सोडून यंत्रणेतील इतर सर्व घटकांना दोष देतो. रोजच्या आयुष्यामधल्या अगदी छोट्या गोष्टीचं हे उदाहरण आहे…

 

सहज आठवलं .. परवा एकदा एक चिमुकली बाबाच्या पाठीमागे बसून गुणगुणत होती …. “गंमत झाली, काल मला स्वप्न पडलं छानसं, हिरव्या लाल दिव्याचा आदेश पाळायला लागली माणसं”…पुढचं काही ऐकूच आलं नाही मग…. तर ह्याच “मी” ने  यंत्रणेचा भाग म्हणून “माझी” भूमिका चोख बजावली ..म्हणजे वेगळं काहीच नाही पण “माझी सोय” हा एकमेव विचार सोडून… ठरलेले नियम “माझ्यासाठी” आहेत म्हणून पाळले तर हेच चित्र अगदी उलट व्हायला किती वेळ लागेल? आणि मुळात वाहन चालवणे ही फक्त गरज पेक्षा आनंद देणारी कृती होईल असं वाटतंय का? माझा वेळ , इंधनासाठी लागणारा पैसा, मनाची शांती हे फक्त कुणीतरी केलेले नियम पाळल्याने मला मिळू शकतात.. इतकंच नाही तर माझ्याकडून अनाठायी वाया जाणारं इंधन वाचल्यामुळे जिथे पोहोचतच नाही अशा ठिकाणी कुणाला तरी मिळण्याची शक्यता माझ्यामुळे निर्माण होते… शहरासाठी बनवल्या गेलेल्या सुविधांचं आयुष्यमान वाढू शकतं… पर्यावरण रक्षण , भ्रष्टाचारावर रोख हे फायदे तर अगदी नाही बघितले तरी डोक्याचा भुगा करणारी वाळवी माझ्यातून काढली की कुठेच उरणार नाही हे तरी  “सिस्टीम्स थिंकर” म्हणवून घेणाऱ्या “मला” कळतंय का?

फक्त “प्रोफेशन” मधे नाही तर माझ्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक यंत्रणेचा “मी” हा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि नागरिक म्हणून, या समाजाचा घटक म्हणून प्रत्येक रचनेमधल्या “माझ्या” भूमिका “मी” डोळसपणे निभावतो आहे आणि प्रत्येक संसाधन जाणिवपूर्वक वापरतो आहे, हेच “स्मार्ट” असल्याचं लक्षण आहे… “स्मार्ट सिटी” या संकल्पनेमधे तज्ञ “वीज , पाणी, वेस्ट मॅनेजमेंट, स्वच्छता, ई-गव्हर्नंस आणि अशा कित्येक गोष्टींचा विचार करत आहेतच”… परंतु “माझ्यासाठी यंत्रणा” हा विचार बदलून “मी यंत्रणा” हा विचार प्रत्येक नागरिकाचा नसेल तर हे स्वप्न… कल्पनाविलासाच्या पलिकडे जाऊन साकारणं केवळ अशक्य आहे… ’पिंडी ते ब्रह्मांडी’ हा निसर्गनियम आहे… आपले अवयव आपापलं काम अविरत करत आहेत म्हणून आपण निरोगी आयुष्य जगतो आहे. तसंच “मी” समाजाचा अवयव आहे मग मी हातावरलं बोट आहे की धडामधलं पोट हा विचार गौण ठरतो…  systems thinking  ही सवय रक्तात भिनली तर स्मार्ट सिटी हेच आपलं प्रमाणपत्र असेल… नाही तर कागद मिळवून पुढे जाणं इतकचं या कोर्सचं स्वरूप होईल… शेवटी हातावरच्या १० बोटांवर  systems thinking  ची व्याख्या मांडता येईल “हे जर व्हायचं असेल तर हे “मला” च करावं लागेल” ….

गेल्या ३ महिन्यात जे कळलं नाही ते मागच्या ३० मिनिटात मांडायचा प्रयत्न ” certification committee” ने केला आणि पुढच्या प्रवासाचा  systems thinkers  वर सुपूर्त केला

प्रशांत मिरजकर.

प्रेसिडेंट, बायोऍनॅलिटिकल टेक्नोलॉजिज,पुणे.