समाजाच्या पुढाकारानेच होईल समुचित कृषी तंत्रज्ञान प्रसार

सुनील शिंदे, जालना जिल्ह्यातील आजचा प्रगतीशील शेतकरी. पण काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. साधारण छोट्या शेतकऱ्यांची जी स्थिती असते तशीच होती. त्यातच एकदा बैल जोडीतील एक बैल अचानक गेला. शेतीची कामे कशी करायची हा प्रश्न समोर उभा होता. दोन बैलांनी सगळी काम करायची पारंपारिक सवय. त्यामुळे प्रश्न फक्त तांत्रिक नव्हता; तो सवयीचा पण होता. पण परिस्थितीशी सामना करणाऱ्या या तरुणाने यातून मार्ग काढला. त्याने एक बैलाने चालणारे वखर बनविले. वखर हे शेतीतील कामाना उपयुक्त अवजार आहे. हे सगळं बनवलं त्याच्या कडील भंगार सामानातून. खरंच गरज ही शोधाची जननी असते. त्यामुळे त्याचाच नाही तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा फायदा झाला. एक बैल असलेले शेतकरीपण अशा यंत्राचा वाप करून वेळेत शेतीची कामे करू लागले. सुनिलनी पुढे अशी २०हून जास्त यंत्रे बनविली.

२०१३ साली टेक फोर सेवा या सेवा कार्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरासंबंधी कॉन्फरन्ससाठी योजक ने अशा जमिनी वरील शास्त्रज्ञांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. आणि काय आश्चर्य!!!! महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अशी नररत्ने मिळाली. स्वतः च्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रयोग करीत, साध्या साध्या गोष्टीतून त्यांनी अवजारे बनविली. बाबाराव जाधवांचे सऱ्या पाडण्याचे अवजार, लक्ष्मण दळवींचे भात लावणी यंत्र, अनिल पटेलांचे मोटार सायकल वरील फवारणी यंत्र, रवींद्र खर्डे यांचे ज्वारी पेरणी यंत्र अशी बरीच यंत्रे होती. असे ४० हून अधिक जण मिळाले. अजूनही असतील. आमचे प्रयत्न कमी पडले. हे सगळे शास्त्रज्ञ आपापल्या परीने, उपलब्ध साहित्यात खऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

असेच एक ७० वर्षाचे तरुण आहेत दादा वाडेकर. ठाणे जिल्ह्यातील वाडा या गावी हे रहातात. यांनी आत्तापर्यंत  ४० हून अधिक अशी यंत्रे बनविली आहेत.  अशा१६ यंत्रांचे एक किट यांनी बनविले आहे जे शेतातील बहुतेक कामे करील.

ही सगळी यंत्रे हातांनी चालवायची आहेत. यात काही विळे वगैरे सारख्या गोष्टी तर खास डावखुऱ्या लोकांसाठी बनविली आहेत.

भारतातील शेती संबंधी तंत्रज्ञान हे एका विशिष्ट व्यवस्थेतून बाहेर येते. याची एक व्यवस्था सरकारने बसविली आहे. पण या व्यवस्थेत अशा जमिनी वरील शास्त्रज्ञाना फार स्थान नाही. असलेच तर यांनी आपली यंत्रे या व्यवस्थेकडून तपासून घ्यावी इतकेच. खरंतर या व्यवस्थेने अशी यंत्र बनवून शेतकऱ्या पर्यंत पोहोचवली पाहिजेत. यंत्रणा काही प्रमाणात अशा यंत्रांचे, अवजारांचे संशोधन करण्या पर्यंतच काम करते. वानगीसाठी मका सोलणी यंत्राचे उदाहरण घेऊ. सगळ्या जनजाती क्षेत्रात मका हे मुख्य पिक आहे. मका सोलून त्याचे दाणे काढणे हे एक मोठे काम महिलांचे असते. हि सोलणी करताना महिलांचे हात रक्ताळून जातात. घरात एक मक्याचे कणीस सोलणे आणि एकरभर शेतातील हजारो कणसे हाताने सोलणे यात फरक आहे. त्यामुळे हाताने सोलायचे मका सोलणी यंत्र हे या महिलांसाठी वरदानच आहे. असे यंत्राचे संशोधन झाले आहे. थोड्या प्रमाणात उपलब्ध आहेत पण संशोधन केंद्रात. गावागावातील ज्या कृषी सेवा केंद्रावर शेतकरी अवलंबून आहेत तिथे मात्र हे मिळत नाही. हे एक उदाहरण आहे. यासंबंधी वेगवेगळे प्रश्न आहेत. संशोधन व्यवस्थेचे आहेत, ज्याला बिझिनेस मोडेल म्हणतात त्याचे आहेत, शासन नीती व तिची प्रत्यक्ष अंमलबजावणीचेही आहेत. हे सगळे सोडवून काम करायचे म्हटले तर पुढचा जन्मच उजाडेल.

शेतकऱ्यांना माफक गुंतवणुकीत यंत्रे मिळावीत यासाठी सरकार एक मोठे मिशन चालवते. एका यंत्र-बँक ला  १० लाख रू पर्यंत अनुदान मिळते. पण त्यात यंत्रे कसली मिळतात? बहुतांश ट्रॅक्टर चलित. याचा छोट्या आणि जनजाती भागातील शेतकऱ्यांना काही उपयोग नाही. म्हणायला आज दूरदूर ट्रक्टर पोहोचलाय पण त्याचा शेतीत किती उपयोग होतो हा प्रश्नच आहे.

मग शेतीतले हे प्रश्न सोडवणार कसे? कारण यांचा कोणी वाली नाहीये. पण काही जण प्रयत्नरत आहेत. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतला एक तरुण सामाजिक उद्योजक नवापूर तालुक्यात छोट्या शेतकऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या यंत्रांसाठीचे बिझिनेस मॉडेल तयार करतो आहे. यासाठी त्याने स्थानिक मुख्य जी पिके आहेत भात व डाळी यासाठीची रचना व प्रयोग सुरु केले आहेत. डिजिटल ग्रीन सारखा इंटरनेट आधारित शिक्षण प्रकल्प  यंत्रांचे व्हिडीओ प्रसारित करीत आहेत. कृषी विज्ञान केंद्रे त्याच्या परीने प्रयत्न करीत आहेत. पण ते पुरेसे नाहीत.

हीच परिस्थिती गाव पातळीवरील प्रक्रिया उद्योगाची आहे. प्रक्रिया उद्योग उभारले गेले पाहिजेत अशी चर्चा सगळीकडे होते. पण चर्चा करताना मॉडेल समोर मेगा फूड पार्क चे असते. मोठ्या प्रकल्पांच्या काही अंगभूत मर्यादा असतात. भारतासारख्या बहुविध देशात त्या अजूनच प्रकर्षाने जाणवतात. पण आपल्याला मोठ्याच एवढ आकर्षण आहे कि छोट काही पटतच नाही. हेच बघा ना. भात हे आपलं एक मुख्य पीक आहे. पण भात पिकवणाऱ्या भागात (पंजाब व आजूबाजूचे सोडून) साधारण १० किमी ते ४५ किमी एवढ्या दूर भात गिरण्या आहेत. गावागावात जे हलर आहेत त्यामध्ये एवढी तूट होते कि त्या पेक्षा दूर गेलेलं बर. पण यात होत काय वेळ, श्रम व मुख्यतः अन्नाची पोषकता सगळं घालवून बसतो. त्यासाठी सध्या काही परदेशी व देशी भात गिरण्या मिळतात. पण यांना आपल्या संशोधन व्यवस्थेची मान्यता नाही. नंदुरबार मधील खांडबारा परिसरात अशा ८-१० गिरण्या उत्तम रीतीने चालत आहेत. महिला बचत गट व जनजाती तरुणांनी यातून घराला रोजगार दिला आहे. त्याच जोडीला आपल्या गावातील प्रत्येकी ८०-१०० महिलांचे श्रम कमी केले, तांदूळ साठविण्या ऐवजी सालाच साठविता येऊ लागली. यातून गावाचा पैसा गावातच राहिला. उरलेला वेळ इतर कामात महिला देऊ लागल्या. या गिरण्या त्यांनी समाजाने दिलेल्या आर्थिक मदतीवर घेतल्या आहेत. ते पैसे परत फेडण्यास पण त्यांनी सुरुवात केळी आहे. यामुळे जनजाती भागात कर्ज फेडत नाहीत हा भ्रम दूर होण्यास पण मदत मिळते आहे. पण उद्या अर्थ पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेला हे दाखवून कर्ज द्या म्हटलं तर मशिनच्या व्यवस्था मान्यतेचा मुद्दा पुढे येईल? म्हणजे येरे माझ्या मागल्या.

त्यामुळे हे प्रश्न सोडविण्यासाठी समाजालाच पुढे यावे लागेल. अशा जमिनीवरील शास्त्रज्ञाना मदत करण्यासाठी समाजाच्या मदतीने चालणारी डिझाईन केंद्रे बनवायला हवी. यातील ज्यांना संशोधनापुढे जाऊन व्यवसाय करायचा आहे त्यांना त्या संबंधी मार्गदर्शन व आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करायला हवी. कृषी प्रक्रिये साठी तरुणांना मदत करणारी व्यवस्था निर्माण करायला हवी. प्रचलित व्यवस्थेला तोड देण्यासाठी व तीच वापर करण्यासाठी या नव उद्योजकांना उभ करण हे या व्यवस्थेच मोठ काम असेल. आज ग्रामीण, जनजाती समाजातील तरुण शहरातील व्यवस्थेतील प्रश्न बघून गावमध्ये राहण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला साथ हवी आहे समाजाची. ती जितकी मिळेल तितका गाव-शहरातील भेद कमी होत जाईल.

कपिल सहस्रबुद्धे,

योजक Center for Research and Strategic Planning for Sustainable Development, पुणे

kapil.sahasrabuddhe@gmail.com

 

 

आपला अभिप्राय, प्रश्न जरूर लिहा.

10 thoughts on “समाजाच्या पुढाकारानेच होईल समुचित कृषी तंत्रज्ञान प्रसार”

 1. उत्तम …..कपिल जी, वस्तुस्थिति दर्शक माण्डणि. असे अनेक छोटे मोठे प्रयोग अन यंत्र निर्मिती कृषी विद्यापीठातून पण होतात, तथापि सर्वदूर या गोष्टींची माहिती व उपलब्धता होत नाही. शासन यंत्रणा या बाबतीत उदासीन आहे. स्थानीक पातलिवर छोटे प्रदर्शन अन विक्री अशा स्वरूपात प्रोत्साहन मिळू शकेल.

 2. Extremely studied and thought provoking article !! Such information should be made available to the Govt. (If not already done). And Govt. should create an environment and markets to sustain and wncourage such entrepreneurs. Excellent read, Kapil !!

 3. छान लेख आहे. प्रेरणा म्हणून आकाशाएवढे दूरचे लतादिदी, अंबानी, धोनी, अमिताभ, बिल गेटस्अशी उदाहरणे निरूपयोगी ठरतात.

 4. सर या जामिनी innovations चे डॉक्यूमेंटेशन करता येईल का?

 5. उपयुक्त विश्लेषण.. सध्याच्या कौशल विकास योजना व मोठया उद्योगांचे सामाजिक दायित्व विभाग यात काही प्रकल्प बांधता येईल असं वाटतं ज्यातून अशी प्रयोगशिलता विकसित व उत्तेजित करता येईल. रुग्ण उपयोगी साहित्य केंद्रा सारखी शेती उपयोगी साहित्य केंद्र नाममात्र शुल्क भरून उपलब्ध व्हावीत असाही प्रयोग होऊ शकतो, गाव पातळीवर छोट्या शेतकर्यांना साहित्य विकत घेऊन वर्ष भारत एकदा उपयोगात आणून उर्वरित वेळेत त्याचा उपयोग अन्य गरजू शेतकर्यांना होऊ शकतो.

 6. शेतकऱ्याची सद्य परिस्थिती, शासनाची अनास्था, स्थानिक तंत्रज्ञ व त्याचे गरजेतून नवनवीन यशस्वी प्रयोग याचे नेमके विवेचन केले आहे. तुम्ही आम्ही सर्वांनी या स्थिनिक प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे, प्रचार प्रसार केला पाहिजे. शेतकरीच आहे संपन्न भारतवर्षाचा पाया.

 7. Marmik lekh kapil. As usual matit haat ghalanaryancha vastavavadi darshan. Avashyak asha kharya shodhanchi garaj vishad karanara !!

 8. सुंदर लेख कपिल,
  या स्थानिक heros व त्यांच्या प्रेरणेचे एक पुस्तकही नवीन शेती उद्योगात शिरू पाहणाऱ्या पिढीला संग्राह्य ठरेल। त्या बरोबरच अशाच लोकांबाबत एक youtube चॅनेल करता येईल। खूप मार्गदर्शक ठरू शकेल। त्या बरोबरच या उद्योजकांना market हि यातुन मिळेल।
  खूप अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *