हे DRM(Digital Rights Management) काय आहे?

काही दिवसांपुर्वी मी changelog podcast वर डाॅक्टर कोरी डाॅक्टरोव हयांची मुलाखत एेकली.

मुलाखत open source software चा इतिहास आणि  भविष्य  ह्याबद्दल आहे.

त्या पैकी दोन गोष्टींविषयी मी टेक मराठीच्या वाचकांना माहिती करून देऊ इच्छीतो.

कोरी डाॅक्टरोव हे विज्ञानकथा लेखक आहेत.  त्याशिवाय ते Electronic Frontier Foundation (EFF) च्या युरोप विभागाचे माजी संचालक होते (ते अजूनही EFF चे काम करतात) “DRM अर्थात Digital Rights Management ला संपवणे” हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे, असे ते ह्या मुलाखतीत म्हणतात.

प्रथम आपण DRM काय आहे ते समजावून घेऊ.  DRM चा वापर करून, उत्पादक तुम्ही विकत घेतलेल्या वस्तूच्या वापरावर निर्बंध घालू शकतो.  उदाहरणार्थ, तुम्ही विकत घेतलेली गाण्याची CD तुम्ही इतरांना नक्कल (copy) करून देऊ शकत नाही कारण त्यामुळे एका CDची विक्री कमी होऊन उत्पादकाचे नुकसान होते (अशी मूळ कल्पना होती).  मूळ कल्पना piracy ला आळा घालणे अशी होती, परंतु त्याचा गैरवापर होऊ लागला

आधी संगीत आणि  e-booksसाठी असलेली DRM ची संकल्पना आता light bulbs, John Deere Trackers, Baby Monitors आणी cat litter tray मधेही वापरली जात आहे.

DRM च्या (गैर)वापराचे एक उदाहरण म्हणजे, काही वर्षांपूर्वी Amazon ने वाचकांनी विकत घेतलेली Animal Farm आणी Nineteen Eighty Four ही e-books त्यांच्या kindle devices वरून वाचकांच्या परवानगी शिवाय काढून टाकली.  जरी Amazon ने वाचकांना त्याचे पैसे परत केले असले (refund) तरी e-books वाचकांच्या परवानगी शिवाय काढून टाकणे हे कित्येकांना आवडले नाही.

DRM चा गैरवापर निर्मात्यावरसुद्धा कसा उलटू शकतो ह्याचे छान उदाहरण डाॅक्टर डाॅक्टरोव सांगतात.

विसिकॅल्क हा जगातील सर्वप्रथम spreadsheet प्रोग्रॅम (Excel आणि Lotus च्याही आधी) त्या काळी जरी DRM ही संकल्पना त्या नावाने नसली तरी, विसिकॅल्क मधे एक प्रकारचे DRM अस्तिवात होते – जेंव्हा कधी विसिकॅल्क प्रोग्रॅम वापरला जाई, floppy disk वरचा विशिष्ट  (मुद्दाम निर्माण केलेला) बिघाड शोधला जाई – जर असा बिघाड सापडला नाही तर spreadsheet उघडता येत नसे.  पुढे floppy disks चा वापर कमी/बंद झाला तेंव्हा विसिकॅल्कच्या निर्मात्याला त्याच्या स्वत:च्या जुन्या spreadsheets उघडता येईनात 🙂 .

ह्यावर डाॅक्टर डाॅक्टरोव दोन तत्व सुचवतात. DRM  कायदेशीर बाब असल्यामुळे ह्या दोन तत्वांना कायदेशीर मान्यता मिळायला हवी.  प्रसारमाध्यमातून ह्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात असा त्यांचा प्रयत्न आहे

एक : नवीन तंत्रज्ञान निर्माण करताना त्यात अशा सुचना असाव्यात जेणेकरून जेंव्हा तंत्रज्ञान/संगणकाला मालक (owner) आणि आंतरजालावरून (remote party) परस्पर विरोधी सूचना मिळतील, तेंव्हा १००% वेळा मालकाची सूचना पाळली जावी.

हे तत्व राबवले गेले तर Amazon सारख्या कंपन्यांना ग्राहकांनी विकत घेतलेली  e-books परस्पर काढून टाकता येणार नाहीत, John Deere tractor ने जमा केलेली माहिती शेतकरी स्वत:ला हवी तशी वापरू शकेल.

दोन : तंत्रज्ञानाच्या सुरक्षेबाबत माहिती जाहीर करण्याला कायदेशीर मान्यता असावी.

ह्याचा संबंध DRM मोडण्याचा प्रयत्न करण्याशी आहे (निदान अमेरिकेत तरी) कुठल्याही कारणासाठी DRM मोडणे हा गुन्हा असल्यामुळे security research ह्या कारणास्तवसुद्धा DRM ला हात लावता येत नाही. हे तत्व राबवले गेले तर hackers, security loop holes कायदेशीररीत्या जाहीर करू शकतील.

DRM हे कायद्याचे शस्त्र असल्यामुळे त्याला संपवण्यासाठी आपल्याला अधिक चांगले कायद्याचे ज्ञान हवे. हा मुद्दा समजण्यासाठी एक उदाहरण बघूया.

तुम्ही विकत घेतलेल्या वस्तूवर तुमचा पूर्ण हक्क असला पाहिजे  (तत्व १) हा अगदी कॉमन सेन्स आहे. आजकाल आपण CDs च्या ऐवजी MP3 format मधे गाणी ऐकतो, तेंव्हा DRM अबाधित ठेवण्यासाठी MP3 आपल्याला विकण्या (Sale) ऐवजी “वापरायचा हक्क” (License) स्वरूपात देण्यात येतात, कायदेशीररीत्या “मालकी हक्क” विकणाऱ्याकडेच राहतो. त्यामुळे तत्व १ लागू होऊ शकत नाही.

परंतु  डाॅक्टर डाॅक्टरोव मते जर कायदेशीर केस झाली  तर हा मुद्दा टिकणार नाही, कारण जेंव्हा music company कलाकारांशी करार करते, त्या नुसार जर गाणे  कलाकाराचे गाणे विकले गेले तर त्यांना revenue च्या सात टक्के मानधन मिळते , पण जर गाणे License केले गेले तर revenue च्या पन्नास टक्के मानधन मिळते. त्यामुळे itunes सारख्या कंपन्या त्यांच्या हिशेबात हा व्यवहार विक्री असाच दाखवतात.

मात्र DRM ला संपवण्याची लढाई इतकी सोपी असणार नाही  कारण W3C ने HTML5 मध्ये Encrypted Media Extension ह्या नाव खाली DRM ला कायदेशीर मान्यता देण्याचे ठरवले आहे.

DRM च्या विरोधात तुम्ही काय करू शकता ?

  • जर तुम्ही वकील असतात तर अर्थात बरंच काही 🙂
  • जर techie असाल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवा (जन जागृती)

याचसाठी हा लेखाचा प्रपंच!

—–

  1. कोरी डाॅक्टरोव ह्यांच्या बद्दल अधिक माहिती साठी : https://en.wikipedia.org/wiki/Cory_Doctorow
  2. DRM बद्दल अधिक माहिती साठी : https://en.wikipedia.org/wiki/Digital_rights_management
  3. हा लेख ज्यावर आधारित आहे, ती कोरी डाॅक्टरोव  ह्यांची मूळ मुलाखत : https://changelog.com/podcast/221

 

श्री मंदार वझे

 

आपला अभिप्राय, प्रश्न जरूर लिहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *