स्मार्ट माणसंच बनवतील इंडिया डिजिटल

डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी यासंबंधी बराच बोलबाला सध्या चालू आहे. परंतु खरेच काही होत आहे किंवा होणार आहे का या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीयेत.   या दोन्ही उपक्रमातून केवळ काही भव्यदिव्य लगेच होण्याची गरज नाहीये . नागरिकांच्या आयुष्यात छोटे छोटे, थोडे थोडे (इनक्रेमेंटल) बदल जरी घडले तर त्याचा जास्त चांगला परिणाम दिसेल आणि त्यासाठी संबंधित प्रणालीमधील सर्व भागधारकांची (स्टेकहोल्डर्स) पूरक वृत्ती आणि तंत्रज्ञानाचा कल्पक उपयोग यांची  गरज आहे.  

मला वाटतं, मी आणि माझ्या मित्रपरिवारातील अनुभवकथन करत हे जास्त चांगल्या पद्धतीने स्पष्ट करता येईल.

सुमारे सात वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे. माझ्या मित्राची मुलगी जन्माने अमेरिकन नागरिक आहे.  तिच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी तो मुंबईला अमेरिकन वकिलातीमध्ये गेला. भारतात राहून नूतनीकरण करण्याची ही काही पहिली वेळ नव्हती . सर्व कागदपत्रं घेऊन गडी मुलीबरोबर  गेला पुण्याहून. तिथे गेल्यावर त्याला कळलं की काही कागदपत्रांचे नियम बदलले आहेत. पूर्वी त्यांनी वापरलेला एक दस्तऐवज हा जन्मदाखला म्हणून चालणार नव्हता. त्यावर आई-वडलांची नावे नव्हती. त्याच्याकडे मुलीच्या पासपोर्टची वैधता १५-२० दिवसात संपणार होती.  जो दस्त पाहिजे होता तो अमेरिकेतुन वेळेत आणणे हे कळल्यावर तो गळफटला. त्याच्या मुलीकडे भारतीयवंशी नागरिक पत्र (Overseas Citizenship of India – OCI card) आहे. त्यावर आई-वडलांची नावे, जन्मतारीख, ज्यावेळी ते घेतलं तेंव्हाच अमेरिकन पासपोर्ट नंबर सारी माहिती होती. पण अमेरिकन सरकारी कर्मचारी ते पुरावा म्हणून स्वीकारायला तयार नव्हते. त्याची घालमेल नि चिडचिड चालली होती. शेवटी वैतागून म्हणाला ठेवून घ्या तुमच्या देशाची नागरिक तुमच्याकडे. ती अमेरिकन कर्मचारी त्याला म्हणाली की असे काही करण्याची गरज नाही. तुम्हाला हे सर्व दस्त तिच्या जन्मराज्याच्या वेबसाइटद्वारे मिळतील. त्या साईटवर ते कुठे आहेत ते पटकन दाखवलं! हेही  सांगितलं की  त्या दस्ताच्या विनंतीत म्हणा की याची एक प्रत अमेरिकन वकिलातीत पाठवा!! वकिलातीने पासपोर्ट नूतनीकरणाचा अर्ज आणि इतर कागदपत्रांच्या प्रति ठेवून घेतल्या!!! वर हेही सांगितलं की  हा दस्त त्यांना मिळाला कि १० दिवसात पासपोर्ट पुण्याला पाठवला जाईल आणि तसे ई-मेल त्याला पाठवले जाईल!!!!

गडी पुण्याला पोचल्या पोचल्या साईटवर गेला. काही मूलभूत माहिती मागितली होती ती भरली. मुलीचा जन्मनोंदणीचा कागद त्याच्याकडे होता तो, त्याचा स्वतःचा पासपोर्ट आणि मुलीचा पासपोर्ट याच्या स्कॅनड (scanned) कॉपीज  जोडल्या, ६०-६५ डॉलरची फी क्रेडिट कार्डाने भरली. सारा वेळ १ तास! ५ दिवसात वकिलातीचे मेल, त्यानंतर १० दिवसात पासपोर्ट घरी!!

या उलट माझे वडील सुमारे ४ वर्षांपूर्वी गेले. मृत्यूदाखला मिळवण्यासाठी पुणे महानगर पालिकेत ८ वेळा चकरा आणि १० आठवडे लागले. करणं – योग्य माणूस जागेवर नाही आणि कारकुनी चुका.

माझ्या कंपनीच्या कामासाठी मला एक दस्त अमेरिकेत नोटरी करून पाहिजे होता. त्यासाठी पुणे सोडणे अशक्य होते. जेथे त्या दस्ताची गरज होती त्यांनीच माहिती दिली की ऑनलाईन हे काम होऊ शकते! आणि ते तसं झालं.

याउलट तोच मित्र, त्याची तीच मुलगी. ती आता सज्ञान झाली, आता चेहरेपट्टी बदलत नाही म्हणून OCI कार्डावर सध्याच्या पासपोर्टची नोंद करायांची असे ठरवले .OCI  कार्डसंबधी ही खरंतर त्यांच्या वेबसाईटनुसार इतर किरकोळ बाब आहे कारण इतर बदल काहीच नाहीत. हे दोघे हा अर्ज करायला मुंबईला गेले. कारण हा अर्ज प्रत्यक्ष उपस्थित राहून करायचा असतो. तेथे सर्व कागदपत्रांची पडताळणी होते. नवीन OCI कार्ड ४२ दिवसात मिळणे अपेक्षित आहे. ६० दिवसांनंतर पुणे पोलीसांचा याला फोन की  आम्ही चौकशीसाठी येणार आहोत, पण गाडी उपलब्ध नसल्याने कधी ते सांगता येणार नाही. यालाही ज्या दिवशी मी हे लिहतोय त्यादिवशी ४२ पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. ही चौकशी का तर ती प्रत्यक्ष तिथेच राहते का हे पडताळण्यासाठी.

यासाठी वेबकॅमवर कागदपत्रांची पडताळणी करून आणि तर्कशास्त्र वापरून ही प्रक्रिया सोपी आणि कार्यक्षम करता आली असती. या मुलीच्या OCI कार्ड, त्याच्याकशी संबंधित पासपोर्ट, आत्ताचा पासपोर्ट, OCI कार्ड मिळण्याआधी पुणे पोलिसांकडे ती परदेशी नागरिक केलेल्या नोंदीत पत्ता तोच आहे! आणि विनंती पत्ता बदलण्याची नव्हती.

खरं तर भारत जगभर सॉफ्टवेअर तंत्रज्ञ पुरविणारा देश आहे. कदाचित वर उल्लेख केलेल्या प्रणाली करण्यात भारतीय तंत्रज्ञ असण्याची शक्यता दाट आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मध्ये नाविन्यपूर्ण प्रणाली बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. गूगल आणि मायक्रोसॉफ्ट या दोन दादा कंपन्यांचे प्रमुख भारतीय आहेत.  फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या वापरकर्त्यांना सुलभ आणि अब्जावधींचा ई-कॉमर्स व्यवहार करणाऱ्या कंपन्या येथे सुरु होऊ आणि चालू शकतात. याचा अर्थ इंडिया डिजिटल करण्याची क्षमता आहे.

भविष्यरंजक लेखक अल्विन टॉफ्लर याच्या “द थर्ड वेव्ह” या पुस्तकात त्याने लिहले होते की माहिती ज्याच्याकडे तो समर्थ असेल. डिजिटल इंडिया आणि स्मार्ट इंडिया यामुळे हेच साध्य होऊ शकते. आपण प्रत्येक जण समर्थ झालो तरच देश समर्थ होऊ शकतो. मग सांग पाहू केवळ वृत्ती थोडी बदलली आणि तंत्रज्ञानाचा कल्पक वापर केला , म्हणजे माणसं स्मार्ट झाली तर इंडिया डिजिटल आणि शहर/गाव स्मार्ट व्हायला किती वेळ लागेल?

 

श्री प्रशांत मिरजकर

 

आपला अभिप्राय, प्रश्न जरूर लिहा.