संगणन क्षमता: काल, आज आणि उद्या

परवा सकाळचीच गोष्ट – आमचा जुना मित्र गौतम ऊर्फ ‘गौत्या’ फोनवर तणतणत होता, “मुलगा काही गेम्स घरच्या कॉम्प्युटरवर खेळत होता, त्या नीट चालत नव्हत्या. त्याला म्हणे अजून जास्त मेमरी लागणार होती. म्हणून नुकतीच घरच्या PCची मेमरी वाढवून घेतली. आधीची ४ जीबी रॅम होती, ती आता ८ जीबी करून घेतली. तरी ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मात्र ४ जीबीच दाखवतंय! आणि गेम्ससुद्धा तशाच रटाळपणे चालतायत!! काय बोगस माल विकतात आजकाल लेकाचे…” वगैरे वगैरे लाखोली वाहायला लागला. हा गौतम ऊर्फ गौत्या एका कॉलेजात मास्तरकी करतो. कम्प्युटरचा वापर तसा अगदी अलिकडेच काही वर्षांपूर्वी करायला लागलेला, तंत्रज्ञानाचा फारसा परिचय नसलेला, पण ते वापरायची हौस मात्र अतिशय दांडगी असलेला, असा आमचा फार प्रेमळ मित्र! साधारणपणे घोटाळा काय झालेला असू शकतो, त्याचा अंदाज घेऊन त्याला विचारले, “काय रे, तुझी ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहे? आणि किती बिट्सची आहे?”

“विंडोज आहे… आणि किती बिट्सची म्हणजे?” – गौत्या.

आता मात्र घोटाळा काय झालेला होता, त्याची खात्रीच पटली! त्याला म्हटले, “अरे माठ्या, तुला तुझी ऑपरेटिंग सिस्टीम किती बिट्सची आहे ते माहित नाही, आणि मग PCची मेमरी तू कुठल्या आधारावर वाढवायला गेलास?”

आता मात्र तो बुचकळ्यात पडलेला वाटला. म्हणाला, “कुठल्या आधारावर म्हणजे? माझ्या PCच्या मदर बोर्डचे मॅन्युअल वाचले ना. त्यात धडधडीत छापलंय की… ‘Supports upto 32GB RAM’ म्हणून. मग निदान ८ जीबी मेमरी तर त्यात चाललीच पाहिजे ना…”

खरं तर काय चुकीचं होतं गौत्याचं? बिचारा जेवढं समजत होता, त्यानुसार बरोबरच तर बोलत होता की!!

पण मंडळी, आजकाल आपलं साधारणपणे असंच होतं! हे संगणकाचं तंत्रज्ञान आजकाल आपण सगळीकडेच लागतं म्हणून सर्रास वापरतो, पण त्याची पुरती माहिती करून घेत नाही! गौत्याची नेमकी अडचण त्यावेळीच लक्षात आली. त्याला आपली ऑपरेटिंग सिस्टीम किती बिट्सची आहे, ते कसं आणि कुठून समजून घ्यायचं, ते सांगितलं. तर लगेच १५ मिनिटातच पुन्हा त्याचा फोन… “अरे खरंच रे! माझी ऑपरेटिंग सिस्टीम ३२ बिट्सची आहे… आता? ती पूर्ण बदलून ६४ बिट्सची टाकून घ्यावी लागेल का?”

म्हटलं चला, जरा खेचूया याची… त्याला म्हटलं, “छे:, कशाला? त्याच विंडोजवर ३२ बिट्सची विंडोज अजून एकदा टाकून घे… झाली तुझी ऑपरेटिंग सिस्टीम ६४ बिट्सची… खी: खी: खी:…”

तर चिडला ना लगेच! जोक कळाला वाटतं… म्हणाला, “अरे तुझे हे ‘आलिया भट्ट’ छाप विनोद मला नको ऐकवूस. मी आता काय करू ते सांग. तू म्हणत होतास त्यानुसार ६४ बिट्स विंडोज तर टाकून घ्यायला लागेलच असं दिसतंय, ते मी करून घेईनच. पण हे बिट्सचं झेंगट मुळात काय असतंय, ते तरी नीट समजावून सांग.”

मग ही संधी न दवडता त्याला लगेच फर्मावलं, “संध्याकाळी घरी येतो. वहिनींना म्हणाव कॉफीबरोबर मागच्या वेळेसारखी शंकरपाळी असली तरी चालेल! बोलूया निवांत…”

संध्याकाळी हातात गरमागरम कॉफीचा कप, समोर शंकरपाळ्यांची डिश आणि शेजारी ‘ती कॉफी कधी एकदाची संपतेय आणि कधी एकदाचा हा बोलायला तोंड उघडतोय’, अशा आविर्भावात बसलेला गौत्या… आणि मग झाले एकदाचे आमचे प्रवचन सुरू…

“गौत्या, आपल्या कम्प्युटरमध्ये सगळे किचकट, गणिती, प्रचंड क्लिष्ट असे काम करणारा जो मुख्य घटक असतो ना, त्याला ‘प्रोसेसर’ म्हणतात. मुख्य घटक कसला, कॉम्प्युटरच्या युगातला साक्षात् देवच रे तो! आपण त्याला ‘प्रोसेश्वर’ असेही म्हणू शकतो!! पण तो काही एकटाच मनानं काम नाही करू शकत, तर आपल्याला हवी तशी कामे त्याच्याकडून करून घेणारी काहीतरी प्रणाली त्यासोबत असावी लागते. ती झाली त्याची ‘ऑपरेटिंग सिस्टीम’. तुला त्या कॉम्प्युटरवर एकाच वेळी खूप गोष्टी करायच्या असतात. एकीकडे इंटरनेटवर काहीतरी बघायचं असतं – काहीतरी डाऊनलोडला लावून ठेवायचं असतं, तर दुसरीकडे एखाद्या डॉक्युमेंटमध्ये तुझ्या उद्याच्या लेक्चरच्या नोट्स काढायच्या असतात, किंवा प्रेझेन्टेशन बनवायचं असतं. शिवाय ते करताना पार्श्वभूमीवर जितेंद्र अभिषेकींचा ‘कौशी कानडा’ किंवा पंडित जसराजांचा ‘अल्हैय्या बिलावल’ ऐकायचा असतो. या सगळ्या गोष्टी संगणकावर एकाच वेळी इतक्या सुरळीतपणे चालतात कश्या? तर ही सगळी कामे न थकता, न थांबता, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ती ऑपरेटिंग सिस्टिमच करून घेत असते!”

“आपल्या संगणकात हा जो ‘प्रोसेश्वर’ असतो ना, तो एकूण किती मेमरी हाताळू शकेल, ती क्षमता अतिशय प्रचंड असते. आत्ता तुझ्या संगणकात हा जो प्रोसेश्वर आहे ना, तो आहे ‘इंटेल’ कंपनीचा ‘i3 – Dual core’ प्रोसेसर. तो प्रोसेसर एकूण ६४ बिट्समध्ये व्यक्त करावी लागेल, इतकी मोठी मेमरी हाताळू शकतो. म्हणजे २चा ६४वा घात! कर बरं आकडेमोड आणि सांग बरं ती संख्या…”. गौत्यानं डोळेच फिरवले.

“आपल्या नेहमीच्या कामांना इतकी जास्त मेमरी लागत नाही. सध्याची आपली मेमरीची जी गरज असते, ती बऱ्याचदा ३२ बिट्समध्ये व्यक्त होऊ शकेल एवढ्याच संख्येत मावते. म्हणजे केवढी? तर २चा ३२वा घात, अर्थात ४ जीबी! त्यामुळे आपल्या कम्प्युटरमध्ये जास्त मेमरी भरून उगाच कशाला खर्च वाढवा, असा व्यावहारिक विचार करून लोक तेवढीच मेमरी संगणकात ठेवतात. आता ही जी ऑपरेटिंग सिस्टीम असते ना, तिची सुद्धा अशीच मेमरी हाताळायची एक क्षमता असते. ती जर ३२ बिट्स असेल, तर ती जास्तीत जास्त ४ जीबीच मेमरी हाताळू शकणार ना. आता तुला मुलाच्या गेम्ससाठी जर त्याहून जास्त मेमरी बसवून घ्यायची असेल, तर ती बिचारी ऑपरेटिंग सिस्टीम तरी त्याला काय करणार बरं? त्यासाठी तुला ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा ३२ बिट्सपेक्षा जास्त क्षमता असलेलीच टाकून घ्यायला हवी… म्हणजे ६४ बिट्सची!” मी डिशमधले शेवटचे शंकरपाळे तोंडात टाकत म्हटले.

“अच्छा… म्हणजे नुसता प्रोसेसर ताकदवान असून उपयोग नाही, तर ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा त्याची ताकद वापरून घ्यायच्या लायकीची असायला पाहिजे. असंच ना?” अखेरीस गौत्याची ट्यूब पेटली तर एकदाची!!!

“हो. बरोबर!”

“पण काय रे, हे आजकालच लोक एवढी भरमसाठ मेमरी वापरायला लागलेत. पण पूर्वीचे लोक कसे काय भागवत असतील कमी मेमरी आणि लहान प्रोसेसरमध्ये?” पुन्हा एकदा गौत्याची रास्त शंका.

“हो ना… तीसेक वर्षांपूर्वीचे प्रोसेसरच मुळात ३२ बिट्स नव्हते. ते होते केवळ १६ बिट्स संगणन क्षमतेचे! इंटेल कंपनीचे सुरुवातीचे जे १६ बिट्स प्रोसेसर होते ना, ते होते ‘8086’ आणि ‘8088’ या नावांचे. नंतर त्यांनी पुढचा १६ बिट्स प्रोसेसर बाजारात आणला, त्याचे नाव ‘80286’. आणि त्यांची मेमरी हाताळायची क्षमता सुद्धा किती होती माहित आहे का? आकडा सांगितला, तर हसायला लागशील! 8086 आणि 8088 यांची मेमरी क्षमता होती २० बिट्स, म्हणजे २चा २०वा घात. अर्थात फक्त एक एमबी! तर 80286ची होती २४ बिट्स, म्हणजे २चा २४वा घात. अर्थात फक्त १६ एमबी!! पंचवीस-तीस वर्षांपूर्वी हळूहळू ३२ बिट्सचे प्रोसेसर बाजारात यायला लागले. इंटेलने त्यांचा पहिला ३२ बिट्स प्रोसेसर तीस वर्षांपूर्वी बाजारात आणला, त्याचे नाव ‘80386’, किंवा थोडक्यात नुसतेच ‘386’! त्यांची मेमरी हाताळायची क्षमता जरी ३२ बिट्स इतकी असली, तरी लोकांची computingची, म्हणजे संगणनाची गरज मात्र कमी मेमरीतच भागत होती. १ जीबीच्याही आत, म्हणजे १२८ किंवा २५६ एमबी, किंवा अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे ५१२ एमबी, अर्थात अर्धा जीबी! बास!! आणि मग वेगवेगळ्या सोफ्टवेअरची मेमरीची गरजही पुढे वाढत वाढत जाऊन ४ जीबी पर्यंत जाऊन टेकली. त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून आज आपण त्याच्या पुढच्या टप्प्यातील, म्हणजे ६४ बिट्स प्रोसेसर वापरायला लागलो आहोत! आपण सामान्य लोकांपैकी कुणीही कधी त्याची मुद्दाम मागणी केली नाही, ‘माझ्यासाठी ६४ बिट्स प्रोसेसर बनवा हो कुणीतरी’ म्हणून. पण जगरहाटीच्या रेट्यामुळे ते आपोआपच घडत गेले!”

“म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का, की आता यापुढे ६४च्याही दुप्पट, म्हणजे १२८ बिट्सचे संगणक सुद्धा दिसायला लागतील म्हणून…” अरेच्चा, गौत्याचं डोकं आता काळाच्याही पुढं पळायला लागलं की!

“काय माहित!” मी सुस्कारा सोडत म्हणालो. “जेव्हा ३२ बिट्स प्रोसेसर निघाले, तेव्हाच लोक म्हणत होते की, ‘बास! आता यापुढे ही क्षमता पुढची पन्नासेक वर्षे तरी वाढायची काहीच गरज दिसत नाहीये’. पण प्रत्यक्षात मात्र आज ६४ बिट्स प्रोसेसर सगळीकडेच सर्रास दिसतायत! आता यावेळी सुद्धा लोक म्हणत आहेतच, की ‘आता मात्र ही सर्वोच्च मर्यादा येऊन ठेपली आहे. यापुढे मुळात १२८ बिट्स इतकी अवाढव्य मोठी संगणन क्षमता लागतीये कुठे? आणि हवीय तरी कोणाला?’ एका अर्थाने खरं आहे हे. गम्मत म्हणून तुला सांगतो. आमच्या तंत्रज्ञानाच्या जगात ‘डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग’ म्हणजे ‘DSP’ नावाचे एक तंत्रज्ञान आहे. ऐकलंयस कधी? त्यामध्ये वापरले जाणारे काही प्रोसेसर्स आता ६४ बिट्सच्या जोडीने १२८ बिट्सचीही काही निवडक क्लिष्ट गणिते आणि आकडेमोड सहजपणे करणारे असे यायला लागले आहेत! मग आपल्या दैनंदिन कामात सुद्धा ते तसे येणार नाहीत कशावरून? तितकी गरजच नाहीये, ही आत्ताची खरी स्थिती आहेच. पण उद्याची स्थिती बदललेली नसेल कशावरून? फक्त ‘कधी’ हा एकच प्रश्न आहे!”

“दैनंदिन कामात वापरता येतील असे १२८ बिट्स प्रोसेसर बनवायचे जरी कुणी ठरवले ना, तरी ते बनवण्याच्या कामात खूप तांत्रिक अडचणीही आहेत. जसे की, त्याचा आकार केवढा होईल? ते एका चिपवर कसे बसतील? त्याला वीज किती पुरवावी लागेल? त्यातून किमान ५००-६०० तरी कनेक्शन बाहेर काढावी लागतील, ती कशी काढायची? त्यातून उष्णता किती निर्माण होईल? ते गार करायला पंखा केवढा मोठा लागेल? वगैरे वगैरे वगैरे… भविष्यात या गोष्टींवर उपाय निघतीलही कदाचित, पण आज तरी ते अवघड आहे. त्यामुळे असे प्रोसेसर बनवायच्या ऐवजी तंत्रज्ञ आत्ता काय युक्ती करतायत माहित आहे का? ते ३२ बिट्स किंवा आजचे ६४ बिट्सचे एकसारखे अनेक प्रोसेसर एकाच चिपवर बसवून त्यांना समांतर पद्धतीने काम करायला भाग पाडतायत! तुझ्या या कम्प्युटरमधला प्रोसेसर ‘Dual core’ आहे. म्हणजे त्याच्यात एकसारखे असणारे आणि एकसारखे काम करणारे चक्क दोन प्रोसेसर एकत्र बसवले आहेत! जणू एकाच पाटावर जेवायला बसवलेले दोन आवळे-जावळे भाऊच!! या तंत्रज्ञांनी त्याच्याही पुढे जाऊन असेच चार-चार, सहा-सहा किंवा चक्क आठ-आठ सुद्धा जुळे भाऊ एकाच पाटावर जेवायला बसवले आहेत!!! अगदी यशस्वीपणे आणि गुण्या गोविंदाने… आहेस कुठे… थोडक्यात सांगायचे म्हणजे, एकच प्रोसेसर १२८ बिट्सचा वापरण्याऐवजी ६४ बिट्सचे दोन प्रोसेसर वापरायचे. हे म्हणजे कसे आहे, एक चारचाकी गाडी घेऊन तिची सगळी उठाठेव करत बसण्यापेक्षा सरळ दोन दुचाकी गाड्या वापरायच्या! आहे की नाही नामी युक्ती!!” एव्हाना गार झालेला कॉफीचा शेवटचा घोट घेत मी म्हणालो.

“हं… हे म्हणजे फारच क्लिष्ट आहे बुवा तुमचं तंत्रज्ञान” गौत्या उगीचच गंभीर वगैरे झाला. “बरं झालं मी तुझ्या इंजिनिअरिंगला आलो नाही ते. इतकी डोक्याला कल्हई करून घ्यायला आपल्याला नाही बुवा जमत. सध्या मी या कम्प्युटरवर ६४ बिट्सची ऑपरेटिंग सिस्टीम टाकून घेतो. पण पुढे १२८ बिट्सवाले कम्प्युटर जेव्हा निघतील ना, तेव्हा मात्र मला आठवणीने सांग. वाटल्यास पुन्हा एखादा कप कॉफी पाजतो तुला हवं तर. म्हणजे त्यावेळी पुन्हा असा घोटाळा व्हायला नको, नाही का? अगं ए, ऐकलंस का? अजून बशीभर शंकरपाळ्या आण ना जरा इकडे” असं म्हणून गौत्यानं माझ्या मनातली गोष्ट ओळखली आणि आपल्या प्रेमळपणाची पुन्हा एकदा प्रचीती दिली! मग काय… शंकरपाळ्यांची पुन्हा दुसरी डिश आणि पुन्हा दुसऱ्या विषयावर गप्पा!! एक खुसखुशीत, गोड आणि प्रेमळ संध्याकाळ सुफळ संपूर्ण!!!

 

श्री वासुदेव बिडवे

 

आपला अभिप्राय, प्रश्न जरूर लिहा.