इनोवेशन – नवीन दृष्टीकोन

 

वेगवेगळे प्रकल्प राबवताना, product व उत्पादने विकसित करताना आपण इनोवेशन हा शब्द कित्येकदा वापरतो. सध्या राजकीय घोषणांचा मुलभूत भाग बनून राहिलेल्या व अती वापराने गुळगुळीत होत चाललेल्या या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा कधी प्रयत्न होतो तर कधी होत नाही. देशाच्या अर्थ प्रणालीत इनोवेशन नक्कीच मोठी कामगिरी बजाऊ शकेल यात कुणालाच शंका नाही. एकीकडे मोठ मोठ्या घोषणा आहेत तर दुसरीकडे भारतातून एकही जागतिक दर्ज्याची product न तयार झाल्याची खंत आहे. अशा परिस्थितीत इनोवेशनच्या माध्यमातून ही खंत दूर करता येईल का? येत्या दशकात इनोवेशनचा भारतीय औद्योगिक प्रगतीत काय रोल असेल? अशासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. या लेखात आपण इनोवेशन म्हणजे काय? व त्याचा उद्योजकतेमध्ये कसा समर्पक उपयोग करता येईल  याचा मागोवा घेऊ या.

इनोवेशन  संदर्भात अनेक गैरसमज आहेत. कोठलीही गोष्ट वेगळ्या रीतीने करणे याला इनोवेशन समजणारे कित्येक लोक आढळतात. नाविन्य हा इनोवेशनचा आधारभूत भाग असला तरीही फक्त नाविन्य  म्हणजे इनोवेशन नव्हे. नवीन संकल्पना अथवा  idea जी उपयुक्त असेल तिला इनोवेशन म्हणता येईल. पण व्यापक चढाओढ – तांत्रिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर इनोवेशन या शब्दाचा  अर्थही बदलत आहे. माझ्या “knowledge Ocean Strategy” पुस्तकात मी  सांगितल्याप्रमाणे ‘संशोधक हा सोपे प्रोब्लेम्स अवघड पद्धतीने सोडवितो तर इनोवेटर हा अवघड प्रोब्लेम्स सोप्यारीतीने सोडवितो”

जागतिक स्तरावर यशस्वी झालेल्या कंपन्या या सर्वसाधारणपणे इनोवेशनच्या जोरावर राज्य करताना दिसतात. मग google असो वा apple, त्यांनी आपापल्या क्षेत्रात संशोधनांना प्रत्यक्षात उतरवले आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की आपण खऱ्या अर्थाने इनोवेटर  बनण्यासाठी काय करावे? खऱ्या जागतिक दर्ज्याच्या व गेम चेजिंग उत्पादनांसाठी आपण काय करणे आवश्यक आहे? प्रश्न कठीण आहेत पण जागतिक  स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उत्तर शोधणे आवश्यक आहे. या संदर्भात आम्ही जवळ जवळ दोनशे इनोवेटीव कंपन्यांचा अभ्यास केला. अनेक इनोवेटरना भेटलो. त्यातून काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. प्रथमतः इनोवेटर हा खूप चांगला प्रोब्लेम सॉल्वर असावा लागतो. दुसरी महत्वाची बाब म्हणजे इनोवेशन हे साधेपणाचे दुसरे नाव आहे – सगळ्यात  महत्वाची गोष्ट म्हणजे इनोवेशनसाठी गरज असते मनाच्या मोकळेपणाची, विचारांच्या देवाणघेवाणीची व असोसिएशनची. इनोवेशन शिकवता येते. डॉ शिना आय्यंगार यांनी त्यांच्या “Art of Choosing” या पुस्तकात इनोवेशनचे व लर्निंग ची बरीच उदाहरणे दिली आहेत. जर सातत्याने प्रोब्लेम्स सोडवण्याचे शिक्षण – व नवीन मार्ग शोधण्याचे ट्रेनिंग दिले तर त्यांची  इनोवेशन क्षमता विकसित होऊ शकेल. आज गरज आहे ती प्रत्येकात दडलेला इनोवेटर बाहेर आणण्याची, इनोवेशनच्या अनुषंगाने शिक्षण प्रणाली विकसित करण्याची.

इनोवेशनसाठी आवश्यकता असते ती जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याची – व तशी मानसिकता विकसित करण्याची. मनसूखभाई प्रजापती यांनी मातीपासून फ्रीज बनवला. सदर फ्रीजला वीज लागत नाही व हा फ्रीज कुठल्याही प्रकारे अनैसर्गिक उर्जा न वापरता आतील तापमान २० अंशाने कमी ठेवतो. पाणी व माती यांच्या गुणधर्मांचा वापर करून त्यांनी हा आविष्कार घडविला. मनी भौमिक यांनी LASIK चा शोध लावला. ज्यायोगे हजारो तरूण व तरुणींना चष्म्यापासून मुक्ती मिळू शकली. अशा प्रकारच्या अविष्कारांमुळे – व त्यांच्या उपयोगितेमुळे सामाजिक प्रश्न सोडविले जातात व आर्थिक उन्नतीही संभव होते. तळागाळाहतूनही इनोवेशनचे प्रयत्न होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर विशेष इनोवेशन ट्रेनिंगची गरज नाकारता येणार नाही.

युरोपातील वेगवेगळ्या विद्यापीठात बिसनेस  लीडर्स करिता इनोवेशन वर्कशॉप  घेत असताना एकाने मला विचारले – ” इनोवेशन आचरणात आणण्यासाठी ठोस उपाय आहेत का?” – माझे उत्तर एकच होते – “जगाकडे रोज उघड्या डोळ्यांनी बघा, परंपरांचे जोखड झुगारून द्या.” इनोवेशन ही एक सातत्याने करावयाची प्रोसेस आहे. आईनस्टाईनने म्हटल्याप्रमाणे आम्हाला विचार करण्याची पातळी बदलण्याची गरज आहे. शेवटी शिक्षणाचाही उद्देश तोच आहे. विचारांची पातळी बदलू शकणारे आधारभूत शिक्षण अन उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघायचे साहस आम्हा भारतातील प्रोफेशनल्सना इनोवेशनच्या मार्गावर घेऊन जाईल. मग इनोवेशन फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहणार नाही – ते  समाजात असेल, शिक्षणात असेल, विचारात असेल व आचारात असेल. अस झाले तर प्रत्येक गल्लीत मनसूखभाई प्रजापती असतील, Lary Page सारखे आमचेही थेसीस नावोन्मेशशाली प्रोडक्ट्स मध्ये बदलू लागतील – So let us innovate for better world and better India. याचच पहिलं पाउल म्हणजे जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघू या!!

डॉ  पराग कुलकर्णी – PhD DSc

 

 

आपला अभिप्राय, प्रश्न जरूर लिहा.