सेवाभावी संस्था आणि तंत्रज्ञान

सेवाभावी संस्था म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर एक जुनाट कार्यालय, टेक्नॉलॉजीपासून कोसो दूर असलेली आणि माणसांच्या जवळ असणारी संवेदनशील माणसं असं चित्र उभं राहतं. हे काही अंशी खरं आहे पण टेक्नॉलॉजीचा  परीसस्पर्श झाल्यावर काय घडू शकतं, याचं अगदी साधं सोपं उदाहरण या लेखाद्वारे मला मांडायचे आहे.

सेवा सहयोग ही एक सेवाभावी संस्था आहे जी अनेक सामाजिक घटकांसाठी काम करते. सेवासहयोगबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही http://sevasahayog.org येथे क्लिक करा. यातील एक उपक्रम म्हणजे स्कुल किट. यामध्ये एप्रिल एंड ते जून पर्यंत २ महिने साधारण २००-२५० व्हॉलेंटियर्स सहकुटुंब अनेक ठिकाणांहून एकत्र येऊन गेले ७ वर्ष गरजू विद्यार्थ्यांसांठी स्कुल कीटिंग करतात. म्हणजे नेमके काय तर दप्तराची तपासणी करणे, त्यात वह्या, पुस्तके, कंपास बॉक्स भरणे हे सारे व्हॉलेंटियर्स करतात. आणि ही तयार दप्तरे संस्थांपर्यंत पोहचवणे हे कामही व्हॉलेंटियर्सच करतात.

सहाजिकपणे अशा उपक्रमांसाठी डोनेशन हे आलंच. हे डोनेशन गोळा करणे , त्याची यादी कार्यालयात जमा करणे अशी प्रकिया व्हॉलेंटियर्स करत असतात. त्यानंतर आलेल्या यादयांप्रमाणे पावत्या बनवणे आणि त्या देणगीदारांना पोहोचतील असे पाहणे आणि त्याप्रमाणे त्याचा हिशोब लिहिणे हे काम कार्यालयाकडे होते. हे सारेच मॅन्युअल असल्या कारणाने आत्तापर्यंत किती देणगी मिळाली हे पाहणे, एखाद्या डोनरला पावती हवी असेल ती पावती पुस्तकात शोधणे हे एक अतिशय वेळखाऊ काम होते. उदा. कोणाला पावती ई-मेलने हवी असेल तर पावती पुस्तकात पावती लिहायची/केली असेल तर शोधायची, मग स्कॅन करायची मग ई-मेलला अटॅच करायची आणि मग पाठवायची.  म्हणजे एक ई-मेल पाठवणे हे किमान अर्धा तासाचे काम होते.

आता विचार करा ५०० लोकांना अशा पावत्या पाठवायच्या आहेत तर किती कष्ट आणि वेळ जाईल?

सेवा सहयोग मध्ये येणारा मोठा वर्ग हा आय टी क्षेत्राशी निगडित आहेत. त्यांपैकी काही लोकांनी यावर उपाय म्हणून एक प्रयोग केला. १ दिवस काढून काही लोक एकत्र बसले आणि तयार झालं डोनेशन पोर्टल. एक असा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम जिथे ही सर्व प्रक्रिया हाताळणे हे अगदी सोपे केले आहे.

ही प्रक्रिया थोडक्यात सांगायची तर प्रथम विविध व्हॉलेंटियर्सना त्यांची अकाउंट्स काढून दिली जातात. पोर्टल वर लॉग इन केले की तुम्ही गोळा केलेल्या डोनेशनची एन्ट्री तुम्ही त्यात करू शकता, कॅश असो वा चेक. तुम्ही ज्या डोनरकडून पैसे घेतले आहेत त्याला ह्या पोर्टलकडून एक SMS जातो की तुमचे पैसे मिळाले आणि पावती लवकरच मिळेल. म्हणजे याद्या ऑफिसमध्ये आणून द्याव्या लागत नाहीत. आत्ता या क्षणी किती देणगी आली आहे याचा आकडा त्वरीत कळतो. या पोर्टल वर कार्यालयाकडे जमा न केलेली रक्कम दिसत राहते. एकदा आपण पैसे कार्यालयात जमा केले की अकाउंट्स खात्यातर्फे एन्ट्री होते आणि तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम शून्य होते. झाली ना प्रक्रिया सोपी?

आता राहतो प्रश्न पावत्यांचा! मग आणखी एका प्रोग्रॅमद्वारे ह्या याद्या घेऊन ऑनलाईनच ऑटोमॅटिक पावत्या त्या त्या डोनरला इ-मेलने पाठवल्या जातात.  म्हणजे अर्ध्या तासात ५०० पावत्या जातात जिथे एका पावतीला अर्धा तास लागत होता. 🙂

हे सॉफ्टवेअर गेले २ वर्ष वापरले जात आहे. आणि विचार करा हा व्हॉलेंटियर्सचा छोटा प्रयत्न आज किती मॅन आवर्स वाचवतो आहे! शिवाय यामुळे हे सारे पेपरलेस पण झाले म्हणजे दुहेरी फायदा!

म्हणजे या सिस्टममुळे संपूर्णपणे पारदर्शकता तर राखली जातेच त्याशिवाय आठवड्यात एक तास दिला तरी हे काम होऊन जाते. आहे ना हे मस्त?

असेच आणखी एक उदाहरण म्हणजे, नविन येणाऱ्या व्हॉलेंटियर्सची नावे गोळा करणे. वही फिरवणे हे साधे उत्तर असले तरी पुन्हा त्याची यादी एक्सलमध्ये टाईप करणे हे तसे कंटाळवाणे काम.  शिवाय ई-मेल किंवा फोन नं. चुकीचा लिहिला जाणे साहजिक आहे. मग याचे काय करता येईल? उत्तर आहे SMS Gateway वापरणे. आम्ही आलेल्या व्हॉलेंटियर्सना एक SMS एका विशिष्ट क्रमाने एका मोबाईलला पाठवायला सांगतो. SMS Gateway provider कडून ही यादी लगेच मिळते तीही एक्सलमध्ये 🙂 म्हणजे व्हॉलेंटियर्सना हे करणे पण सोपे आणि मजेशीर आहे आणि यादी त्वरीत तयार! आहे ना गंमत?

हे असे अनेक प्रयोग आम्ही सेवा सहयोगमधे करत असतो. सेवा क्षेत्रात देखील तंत्रज्ञान वापरून केलेल्या ह्या छोट्या प्रयत्नाने मोठा फरक पडू शकतो.


सेवा सहयोग टीम

शब्दांकन: पल्लवी कदडी

 

 आपला अभिप्राय, प्रश्न जरूर लिहा.